जीव द्यावास वाटतोय्...
काय येतं मनात हे वाचुन? की हे कोण्या असध्य रोग झालेल्या व्यक्तीचं मनोगत असावं..हो नं.. पण नाही हे आहे आजच्या माझ्या पिढीचं वाक्य.बरेच दिवस हा विशय डोक्यात घोळत होता.आजकालची ही माझी तरुण पिढी इतकी एकाकी का?असं नक्की काय वेगळं शिजत असतं मनात की आम्ही ते सहन नाही करु शकत आणि शेवटाचा विचार करतो?असं काय नेमकं कारण असतं कि आमचे टेंशन आम्ही कोणाशीच वाटुन नाही घेउ शकत? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे असं काय असतं जे आम्हाला सरळ मरण हा एकच रस्ता ठेवतं...
तसं पाहायला गेलं तर हे सगळं थोड्याफ़ार फरकाने आपल्या आई-बाबांच्या काळात पण होतं(आता तुम्ही म्हणाल तो काळ वेगळा होता). घर् आणि ओफिस ते पण सांभाळायचे(अगदी आपल्या सगळ्या अनावश्यक "गरजा" पुरवत)मग आज काय असं बदलयं?
थोडा विचार केला तर लक्षात येतो तो एक महत्वाचा फरक...'तुटलेली घरं'.. आज थोडं आजुबाजुला बघितलं की दिसतात ती परगावात एकटीच राहणारी मुलं.. एकाकी..अस्वथ..अचानक आलेल्या ह्या जबाबदार्या न पेलता येणारी.... आणि खरं सांगायचं तर रोज एका नव्या दिव्यातुन जाणारी..पण म्हणुन जीव संपवणं हा एकच उपाय?
जरा आपल्या पालकांच्या बाजुने विचार केलाय कधी ह्या गोश्टिचा? त्यांचं हे बाळ जे कालपर्यंत कोलेजच्या मौजमस्तीमध्ये गुंग होतं..हसत खेळत होतं.. ते आज अचानक असं गप्प..घुमं..सतत ताणाखाली.. काय होत असेल त्यांच्या काळजाचं? कालपर्यंत कान किटेस्तोवर मोठ्ठ्याने गाणी ऐकणारा आपला मुलगा आज साध्या सुरांनेही हळवा होताना बघितलं की त्यांना धक्का बसणारच.. त्यांचं फक्त एकच मागणं असतं की बाबारे आमच्याशी नको पण कोणाशीतरी बोल..मोकाळा हो...बाप जरा तरी समजु शकतो ही परिस्थीती(बोसची अरेरावी,कामाचं ओझं,ओफिस मधलं पोलिटिक्स..सगळं त्याने पण अनुभवलं असतं) पण आई..ती बिचारी मात्र काळजीने अर्धमेली होते आणि त्यातच रोज पेपरात नवीन बातमी.."आय.टी. कंपनीत गलेलठ्ठ पगारावार काम करणार्या तरुणाची आत्महत्या"...एक क्षण विचार करा काय वाटत असेल त्या माउलीला...असा तरुण पोरगा गमावलेल्या बापाच्या नजरेत कधी बघितलंय..तिथे सापडतो फक्त भकासपणा.. आणि भल्या मोठ्या प्रश्नांचं भेंडोळं.. ज्याची उत्तरं तो उरलेलं सार् आयुष्य शोधत बसतो...प्रत्येक क्षण त्याला एकच प्रश्न सतावतो..माझं कुठे चुकलं माझ्या बाळाला समजुन घेण्यात..अर्ध आयुष्य मुलांना वाढवण्यात घालवायचं आणि उरलेलं त्यांच्या मरणाची कारणं शोधत..हा कुठला न्याय?आता तुम्ही म्हणाल आम्हाला पटतय हे सगळं..पण आम्हाला रोज काय काय भोगावं लागतं हे बाबांना काय सांगणार?सतत समोर राहण्याची धडपड,बोसने सगळ्यांसमोर केलेला पाणऊतारा,कितीही मन लावुन काम केलं तरी हात रिकामाच.. कोणाला अन् काय काय सांगायचं असचं नं..
खरतर आई-बाबा तुम्हाला हे सगळं सांगावं असं खुपदा वाटतं.पण तुम्ही काळजी करता हो..आणि तसं बघितलं तर असं मुद्दाम सांगण्यासारखं पण नसतच काही...असते ती फक्त अनिश्चितता..आणि त्यातुन येणारं हे फ़्रस्ट्रेशन...आता हे सगळं मित्रांशी बोलवं तर आम्ही चार मित्र जगाच्या चार टोकांना..इथे आमच्या साध्या रात्र-दिवसाचा मेळ जुळत नाही तर बोलणार कधी आणि कसे? आता ह्यावर आम्ही एक उपाय शोधलाय तसा...मायाजाल..इंटरनेट..च्याटींग... तुम्हाला वाटतं हा समोरासमोर आमच्याशी दोन शब्द बोलत नाही आणि तिथे तासनतास बोलत काय बसतो.. आणि ह्या गोश्टीचं तुम्हाला कुतुहल कमि आणी रागच जास्त असतो.ः) पण खरं सांगु हे जग आवडतं आम्हाला.(कसलं मेलं हे व्हर्च्युअल जग आवडतं,खरं खरं काहीच नको ह्यांना-इति आई).कारण इथे नसतो अस्तित्वाचा पडदा..नसते भिती गुपितं कोणाला कळायची... फक्त व्यक्त होणं हिच तर गरज असते नं आम्ची? इथे पण मिळतातच कि आम्हाला नविन नाती..अगदी काका,मामापासुन ते ताई, मित्र, यार पर्यंत...आम्हाला कळते हो तुमची काळजी..
पण आमचं जगच इतकं अस्थिर झालयं नं..सतत हलत राहतं सगळं आतपर्यंत...मनाच्या तळापर्यत..जरा कुठे श्वास घ्यायला थांबवं म्हटलं की संपतच सगळं..अन् हरवतो असचं ह्या गर्दीत..आणि मग शोधत बसतो स्वतःला ह्या प्रचंड पसार्यात..आमच्यातलेच काही हा शोध पण घेत नाहीत सरळ संपवतात हे सगळं..हा गोंधळ..काही सापडतात कोण्या बाबाच्या आश्रमात..शांतता शोधत.. अन् काही...अचनक स्वतःच शांत होत जातात..बसतात आभाळाकडे नजर लावुन..

