खरेपणाची प्रत्येकाची व्याख्या वेगळी असते ना बयो... म्हणजे बघ पुढची दिशा सापडेपर्यंत तुझ्या घरात रेंगाळतेय मी हे माझं खरं ,पण जगाच्या मते मी तुझ्या घरावर हक्क सांगतेय.. हेही त्यांच्यासाठीचं खरं आहेच ना...कोणाच्या घरावर खरंच असा हक्क सांगत येत असेल का गं? म्हणजे त्या वास्तू वर गाजवता येत असेलही कदाचित पण घर?? ते तर तुझं च असले न कायम.... नक्की हसशील हे वाचून आणि म्हणशील, अगं तुझं माझं असं काही वेगळं असतं का... आणि इथवरच्या प्रवासात इतकं सारं गमवल्यावर अजून कशा कशावर हक्क सांगायचं सोस उरेल का गं.. नकोच ते.. हे घर म्हणजे फक्त आसरा..काही क्षणाची विश्रांती.. भिरभिरल्या मनाला वाटेला लागेपर्यंतचा थांबा एक.. इथे कायमचा मुक्काम कोणाचा नाही.. जिथे उद्याचा भरोसा नाही तिथे कसल्या ग हक्काच्या बाता... बघ तुझ्या घरात अगदी तुझ्यासारखं बोलायला लागले.. तुझ्यासारखं लिहायला लागले.. आस एकच.. कधीतरी तू परतून आल्यावर माझ्या ह्या असण्याला तुझा स्पर्श व्हावा.. तू म्हणायचीस बघ... रिकाम्या वास्तुतही शब्द असतात आवाज असतात... सूर असतात.. ऐकणारा फक्त एक कान हवा....
अरे हो तुला सांगायचं राहिलंच काल पहाटेस जाग आली ती मधुर सुरांनी..अगदी जवळ आपल्या अंगणात कोणीतरी अवीट भक्तीने गात होत बहुदा.. सुरुवातीला जरा गडबडले, घाबरले सुध्दा म्हणजे बघ ना मी इथे तुझ्या आडोशाला इतके वेळा आले की आता नाही म्हणाले तरी हा परिसर ,शेजार ओळखीचा झालाय. आणि त्यापैकी आजवर असं इतकं आत कोणीच आलं नव्हतं..अंगणाची वेस सहसा कोणी ओलांडली नाही हो नं?म्हणून तर गोंधळलेल्या मनाची नीट उस्तवार करायला तुझ्या घरी कायमच एकांत मिळत आलाय आणि आज पहिल्यांदा हा आवाज... आवरून बाहेर आले आणि समोर दिसला तो.. पोरसवदा किंवा त्याहीपेक्षा लहानसा तो.. आणि कानावर आली त्याची हाक.." माऊली"..
माऊली घाबरु नका पहाटेसच आलोय.. तुमच्यासारखाच मीपण एक वाटसरू.. माऊलींच्या घराचा आसरा घ्यायला आलोय... गंमत वाटली बघ मला... म्हंजे बघ ना मघशी तुला हक्काच्या गोष्टी सांगत होते आणि हा आला तुझ्या.. माझ्या बयोच्या आणि त्याच्या माऊलीच्या घरावर हक्क सांगायला... हसूच आलं एकदम तसा तोही हसला.. निर्मळ हसू... म्हणतो कसा, माऊली वाट दिसेल तिथे माझा मार्ग, आभळातल्या देवावर श्रद्धा आणि त्याच्याच कृपेने ही भटकंती.. हा उत्सुकतेचा प्रवास...वहीवाटेचा मार्ग आहेच हा मार्ग हरवला तर मग तोवर नवे मार्ग शोधायला काय हरकत.. माऊली प्रवाही असायला हवं जगणं हो नं.... नाविन्याची ओढ असायला हवी.. विसावा हवा प्रवासात मान्य पण त्यालाही वेळेचं बंधन हवं माऊली.. कौतुक वाटलं गं आणि नकळत तुलना ही आली मनात... हो स्वत :शीच तुलना...
सकाळ झालीय बयो आता... निघायला हवं आता... विसावा संपवून नवी वाट शोधायला हवी आता... उत्सुकतेेची पाऊलवाट... येतेस??