आयुष्याकडे बघण्याचा अन्गल जरा बदलला की आपणच आपल्यासाठी आखलेल्या जगण्याच्या चौकटीसुध्दा खरच बदलतात का? कदाचित फ़क्त हे कोन बदलतात.. चौकट काही सुटत नाही.. बंधनं झुगारण्याच्या नादात उलट कधीतरी मुक्त होण्यापेक्षा घुसमटच वाढते.कोणी म्हणतं जगणं हे चौकट नसुन वर्तुळ आहे पण त्या वर्तुळालाही अर्थ तेव्हाच जेव्हा त्याचा केंद्रबिंदु स्थिर असतो.. इथे तर नेमकं तेच हरवलयं..परिघ तरी कसा शोधायचं मग? कधीतरी वाटतं की ह्या सगळ्याचाही काही अंत असेलच.. एकदा भरारी घेतली की क्षितीजपर्यंतचं अवघं मोकळ आकाश माझच.. पण क्षितीज काय किंवा आकाश काय..दोन्ही आभासीच नं.. खोट्या गोष्टींचा खर्या जगण्याला दिलासा कसा मिळेल? आपल्याही नकळत लहानपणापासुन आपण बांधत असतो स्वतःचं मीपण एका चौकटीत... आणि मोठं होता होता विसरत जातो त्या चौकटीचे नियम.. मग अशा एखाद्या वळणावर ही चौकट टोचायला लागते.. मनाला दिसतं ते शुन्याचं रिंगणं.. पण म्हणुन चौकट मोडायचीच का?इतकं साधंसोपं असतं का गं सगळं? चौकट काय किंवा वर्तुळ काय... सीमारेषा आल्याच नं.. त्याच झुगारायचा प्रयत्न असतो..आणि शेवटी जर एक चौकट तोडताना दुसर्या चौकटीत अडकणार असु तर पहिली काय वाईट? आता फक्त त्या आभाळाचीही चौकट व्ह्ययला नको म्हणजे मिळवलं..किती प्रश्न ह्या सार्या अनुत्तरीत प्रश्नांची कधीतरी सुंदर वीण होईल.. कदाचित कधीतरी आपलंच आपल्याला हसु येईल.. पण आत्ताचं काय? पण आत्ताचं काय?नुसतं लढत राहायचं? तसं लढण्याला ना नाहीच माझी.. पण श्वासाचीही उसंत नको का ? कारण इथे जो तो शर्यतीत जगण्याच्या... जरा थांबुन जगण्याचा आनंद घ्यायचाही हक्क नाहि का? मला तर वाटतय.. कदाचित ह्या शर्यती जिंकण्याच्या नादात ध्येयही आपल्याला कळणार नाही... कदाचित ते कधिच गाठलं असेलही..एकदा क्षणभर थांबुन मागे वळुन बघायला हवं..भुतकाळात डोकावलं की मला कधी कधी हेवा वाटतो.. त्या प्रत्येक बर्या-वाईट क्षणांचा... कारण त्या हरेक क्षणाची भली-बुरी का होईना पण एक आठवण असते.. आणि असं भुतकाळात रमताना अचानक जाणवतं.. अरेच्चा हा आजचा क्षणही उद्याचा भुतकाळच की.. ह्या नुकत्याच जन्मलेल्या क्षणाचीही एक ताजी आठवण आपल्याही नकळत आपण बनवतोच नं... त्या नुसत्या विचारानेही नवा जोम येतो.. आणि मनं उत्साहानं नव्या आठवणी जमवायला सुरु करतं.. उद्याच्या भुतकाळासाठी वर्तमानाच्या आठवणी बनवणंच तर उरतं नं आपल्या हाती?
No comments:
Post a Comment