तुझ्यातलं वेगळेपण तुला स्वतःलाच शोधायला हवंय नं ....कोणी सांगून किंवा दाखवून वेगळेपण नाही रे सिद्ध करता येत... फार फारतर गर्दीतनं बाजूला काढतील लोकं तुला,पण त्याने वेगळेपण नाही तर फक्त एकटेपण सिद्ध होतं,हे का ठाउक नाही तुला? म्हणून सांगतेय घे शोध स्वतःचा.... निदान तुझं तुला तरी उमगु दे तू आहेस तरी कोण ते....एकदा का हे कळलं नं की बघ भर गर्दीतही दिसतील तुला असे असंख्य अवलिये... तुझ्यासारखे... वेगळेपण जपणारे....
............................... .........
समांतर रस्त्यांवर चालताना एकमेकांना टाळता येत नाहीच रे तसंही.... मग तरीसुद्धा एकाच मार्गाने एकत्र चालण्याचा हा तुझा अट्टाहास नेमका कशासाठी रे ? पायवाटांचे शाप का तुला माहीत नाही? एकत्र नाही एकापाठोपाठ असावं लागतं रे तिथे, कोणीतरी एक सतत मागे राहणारच...उरलं सुरलं सावरत... नेमकं हेच नकोय रे मला.फरफटत तुझा पाठलाग करणं ...आयुष्यभर अन् तसंही दिसत राहूच रे आपण एकमेकांना.कायम.अगदी नकोनकोसे होईपर्यंत भेटणं मात्र टाळूयात का रे दोन समांतर रेषांचा प्रवास सारखा असला तरी शेवट एक नसतो नं तसंच आहे आपलं असं समज हवं तर
.............
ध्यानीमनी नसताना अचानक समोर उभा ठाकलेल्या एखाद्या अलवार ओल्या क्षणासारखा होतास तू भिरभिरत्या नजरेने थेट काळजाचा ठाव घेणारा खोल खोल उतरत तळ ढवळणारा अन् काही कळायच्या आत सावरायचाही अवकाश न देता अलगद निसटून गेलेला कधीही परतून न येण्यासाठी
.......................
Friday, April 25, 2014
Suchel te
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment