Sunday, May 18, 2014

लहानपणी खेळता खेळता नेहमीच मी चिडून म्हणायची,"थांब, तुझं घर आता उन्हातच बांधू" ... तू तेव्हाही फक्त हसायचास अन् आज इतक्या वर्षांनी भेटल्यावरही हसलासच.... तुझ्या अंगाखांद्यावर ओघळणार्या लख्ख उन्हाच्या खुणा मात्र आता स्पष्ट जाणवत होत्या.... पण हरवलेल्या तुला भेटून मी मात्र खूप हरखले होते रे ...अन् तू...तू  निरखत होतास माझं सावलीचं सुख...माझ्या थेट नजरेला टाळता टाळता स्वतःच्या डोळ्यांत मला शक्य तितकं साठवण्याचा प्रयत्न सुरु होता तुझा... किती वेळ...किती काळ...देव जाणे तसंच उभं होतो दोघेही....."ए चल नं माझ्या घरी जाउ  उन्हं तापलीत रे "- खरंतर तुझ्या लख्ख डोळ्यातला दाह अजूनही सहन न होउन विचारलं मी अन नेमकं तेच  उमगून उत्तरलेला तू " वेडाबाई, कधी गं पाहिलस सावलीतल्या उन्हाला ? अजूनही नाहीच का गं कळलं तुला? "
तेव्हापासून कासावीस जीव...... नको तो शाप फळल्यासारखा...

No comments:

Post a Comment