Friday, December 12, 2014

आज नं हे चांदणं कुशीत घेऊन झोप... एक एक लख्ख चांदणी कुरुवाळताना तुझं तुला जाणवेल त्यांचं वेगळेपण.. आभाळात सगळ्या सारख्याच दिसतात नं रे. पण इथे मात्र एकेक चांदणी आपली ओळख नव्याने करून देणारी... प्रत्येकीची लुकलुक वेगळी अन त्यातून ती गुजगोष्टींची चढाओढ... तू गुरफट्शील ह्यात हमखास.. गालातल्या गालात हासत गंमत बघशील चांदण्यांची.. एक चांदणी मात्र जरा रुसली असेल बघ.. कोपर्यात बसून मुद्दामच डोळ्याच्या कडेने बघत असेल तुला.. तुझं लक्ष वेधायचा प्रयत्न करेल...हिरमुसेल... दुखावेल.. पण उठून तुझ्याकडे येणार नाही. नेमक्या अश्यावेळी तू मात्र ह्या राजहंसी चांदणीला तुझ्या तळहातावर स्थान दे..ओघळू दे.. बागडू दे...स्वतःच वेगळेपण तिला मिठीत नाही तर तुझ्या मुठीत मिरवू दे... अन ती अशी मग्न असताना अजून एक कर डोळ्यांच्या समोर धर तळवा तुझा अन चांदणी तुझ्या पापणीत विसावू दे..आज रात्री करशील तिच हे एक स्वप्न पूर्ण ?
...........................................................................
एका क्षणाला अचानक तू एकदम अनोळखी वाटायला लागतोस. परकेपण लपेटून कोणी एक मुखवटा आपल्याला न्याहाळ्तोय असं काहीसं. नखशिखांत थरथरते रे मी. त्या एका क्षणात माझी मीच कळते मला नव्याने. तुझ्या मदतीशिवाय भेटते स्वतःला .कोऱ्या पाटी सारखी. खरं सांगायचं तर तुझ्या डोळ्यातलं अनोळखीपण मला माझी ओळख घडवून देतं
.......................................................................
आज खूप दिवसांनी मीपण निवांत टेरेस वर होते... उन्हाची एकच तिरीप टेरेसच्या कड्याला.. हवेत आजच जाणवलेला हलका गारवा.. हवाहवासा.. आणि हातात नवंकोरं ताजं पुस्तक.. दुपारच्या जेवणाची हलकीशी सुस्ती तरी दर पानागणिक गुंतवत नेणारी लेखिकेची गोष्ट. हळूहळू आतआत सरकत जाणारा उन्हाचा पट्टाच काय तो वेळ सांगणारा.... गार पावलांना उब देणारा. एक अख्खी दुपार घरी अनुभवली. सवयच नाही नं. मस्त असते अरे हि दुपार... सुस्तावलेली... थंडावलेली...पाय पसरून निवांत पहुडलेली
....................................................................
संध्याकाळ.. दिवेलागण.... अंधार पडायला लागला कि आईची लगबग... हात पाय धुवा, साडी नीट करा, केसावरून एक हात फिरवायचा आणि आई ताजीतवानी.. आणि तिच्यासोबत अख्ख घरसुद्धा. जरा वेळातच देवघरासमोर नीट मांडी घालून आई समई उजळत असते. घरभर दिव्यांचा लख्ख प्रकाश पण ह्या समईच तेज औरच...त्या प्रकाशात धुपाची असंख्य वलयं... आभाळाकडे विरत जाणारी अन पाठोपाठ आईचा विलक्षण तेजस्वी आवाज....शुभंकरोती कल्याणं आरोग्यं धन संपदाम...
......................................................................

अंधाराची एकेक पाकळी उलगडत उमलावा असाही एक फुलपाखरू दिवस... प्रसन्नतेच्या उंबरठ्यातून नाविन्याच दान होऊ पाहणारा.. नकोनाकोश्या संदर्भातून हवेहवेसे बंध जोडणारा दिवस...
............................................
किमान स्वतःच्या आयुष्यातल्या तरी सगळ्या निर्णयांची पूर्ण जबाबदारी स्वतःला घेता आली , तर जगणं बरचसं सुरळीत होईल का गं बयो....
............................................
उगवतीच्या माथ्यावर लाल केशरी रंगपंचमीत न्हालेल्या पहाटेच्या डोळ्यात हमखास काजळ् रेघ ओढणारा सल असतो गं बयो . तिच्या गोऱ्यापान पावलांना माखलेला सोनसळी उन्हाचा रंगच सांगत असतो , सटवाइच्या रुपात तिच्या बेधुंद नाचण्याने कित्येकांची भविष्य अशीच चिरडली असतात तिने..
..............................................
साधारण ६०-७० वर्षाच्या आपल्या सरासरी आयुष्यात किमान हजारभर तरी लोकांना भेटतो नं आपण.. त्यातले शे-दोनशे आपल्याला ओळखायला लागतात किंवा आपण तरी ओळखतो.. त्या शे-दोनशे मधले किमान ५० आपले नातेवाईक असतात.. रक्ताच्या नात्याने किंवा अपरिहार्यपणे समाजाच्या चौकटीत राहण्यासाठी लादलेल्या नात्याने तरी..पण असतात ते.. वेगवेगळ्या टप्प्यावर भेटलेले..असो तर आता उरले किती? १००-१५०.. त्या उरलेल्या १००-१५० लोकांपैकी आपण खरतर सगळ्यांनाच ओळखत असतोच.. पण नातं... असतंच का? असणं गरजेचं असतंच का? 
बयो मानलेली नाती हि इथे जन्म घेत असतील का गं? हवीहवीशी.. हवी तशी customized केलेली नाती.. आपली म्हटलेली.. आपुलकीची नाती..मनापासून मनापर्यंत रुजलेली मानलेली नाती..
....................................
हक्क. बयो हे हक्क प्रकरण मोठं कठीण गं . एखाद्या गोष्टीवर, जागेवर अगदीच गेला बाजार अगदीच चुकून एखाद्या व्यक्तीवर हक्क असणं अन हाच हक्क मुद्दाम जगाला दाखवून देणं ह्यातून त्या त्या वस्तूची जागेची अन अगदी व्यक्तीचीसुद्धा किंमत ठरते. ह्या हक्काची जाणीव असणे अन तो गाजवणे. खूप फरक पडतो गं
..................................................
एकेक गाठ हळुवार उलगडत जाता मोकळं होत जावं अलवार जपलेलं स्वत्व.. तशी सुटी सुटी होत जातात माणसं... मीपणाच्या शोधात
......................................................
अनवट वाटांवरचा हा प्रवास अचानक असा मुक्कामाला पोहोचतो. हवं ते सारं असं नेमकं समोर उभं. आनंद समाधान अन जिंकल्याची विलक्षण धुंदी. मागे वळून आपण काय दिव्य पार केलंय हे बघण्याच्या मोहात पडणारा हा क्षण. खरंतर इथेच शेवट हवा नं.तृप्त क्षणाला अंत. पण नाही हि सुरुवात असते. असंख्य अस्वस्थ हुरहुरत्या क्षणांची . अरे आता पुढे काय हा प्रश्न मुक्कामाचं ठिकाण आल्या आल्याच पडलेला असतो नं. अनवट वाट पुन्हा हाक मारतेच. एका आवर्तनाच्या पूर्णतेला दुसर्याची नांदी. प्रवास अविरत सुरूच
..........................................................
बदल.. हो बदलेल हेही कधीतरी ह्या एका विचारानेच तर प्रत्येक पाउल टाकत असतोच नं आपण.. जात असतो पुढे पुढे सतत .. आपल्याही नकळत.. ओलांडत असतो एक एक वळण.. हवंसं.. नकोसं.. कधी अनवधानाने मिळतो क्षण आनंदाचा.. तर कधी ठाऊक असतो काळ दुःखाचं... तरी..तरी प्रवास सुरूच..कुठपर्यंत? आपणच बदललो आहोत नखशिखांत हे कळेपर्यंत...
हे रे नेमक्या कुठल्या वळणावर कळतं? सांगशील?
............................................................
पहाटेच्या धुक्यातून हलकं हलकं पाझरणारं शुभ्र कोवळं ऊन... पाकळी पाकळीने उमलावा दिवस तसं दाणेदार किरणातून पसरलेलं.. आखीव रेखीव ऊन....हे उन नं कुरुवळत असतं स्वप्नांना...बळ देत असतं ती स्वप्न जगायला... एकटक भिडव कधी नजर त्या उन्हाशी.. सृष्टीचा कण अन कण सामावून लाघवी हसेल बघ ते.... तेच काय ते वरदान असतं रे बाकी ग्रहणाचे शाप तर त्यालाही आहेतच....
.........................................................