Tuesday, August 28, 2012

रितेपण

कशी ही अवस्था 
कुणाला कळावी
कुणाला पुसावी 
कुणी उत्तरावी..
(संदिप खरे)
मुसळधार पावसातलं हे असं अव्यक्त अस्वस्थ साचलेपण....बघ नं भर दुपारचा तो असा कोसळतोय अन् माझा मात्र प्रयत्न एकवटण्याचा... असलेलं..नसलेलं.. सारं सारं....वहावत जाण्याला जणू अचानक ब्रेक लागावा तसं झालयं....
वाटेवर ह्या भविश
्याच्या
हवाहवासा सोबती भुतकाळ
डोळ्यात स्वप्न जिंकण्याची
मनी रेंगाळतो गतकाळ
रोजचं एक रुटीन... सकाळपासुन संध्याकाळ.. अन् त्यानंतरची रात्र...पण ह्या दोहोंच्या मधली ही मावळण?... अनामिक हुरहुरीची ही सायंकाळची वेळ मात्र उतरत जाते..साचत जाते मनात......आणि आपण सोडतो एक निःश्वास ह्या वाढलेल्या साचलेपणासाठी..की रितेपणासाठी रे?
वरवरचे भारलेपण
खरा रिकामाच गं गाभारा
डोकव तिथे जरा खोल
ऐक रितेपणाचा हुंदका
उगाचच आपलं मनात एक खुळ.. भर गर्दीत आपण एकटं असण्याचं.... लहानपणापासुनचे सखे अचानक ह्या गर्दीत जणु हरवुन गेलेले... पण जगाची रित गं कशी विसरायची? वाहत राहा.. थांबला तो संपला.. अन् माझं तर हे असं.. साचलेपण.... वेड्यागत सरल्या क्षणांना पुन्हा जगण्याची धडपड.... वरवर सगळं सामान्या..रुटिन जगणं.. अन् आत मात्र धगधगता ज्वालामुखी...थंडावण्याची वाट बघत...

"पाउसवेळा"

छपराआडुन कोसळणारा पागोळ्यांचा पाउस....
बरसुन बरसुन थकलेला अन् मग डबक्यात पहुड्लेला पाउस...
मातकट लाल पाण्यातल्या कागदी होड्यांमधला पाउस...
गच्च काळ्या रातीचा फ़क्त कानांनी झेललेला पाउस...
उनाड भटकत्या वार्याच्या ओल्या स्पर्शातला पाउस...
.
.
.
ह्या आणि अश्या असंख्य "पाउसवेळा" अगदी घट्ट जपल्यात उराशी..
..
पाउस हरवला तर रे????

Tuesday, June 12, 2012

वर्तुळ

प्रत्येक वाकल्या रेषेचं वर्तुळ होत नाही हेच खरं.. कितिही गोल गोल फिरलं तरी वळणांचं वर्तुळ थोडचं होतं.. वर्तुळास लागतो एक् मध्यबिंदु.. त्याला आपल्याशी जखडुन ठेवणारा..वरवर दिसते ती परिघाची एकनिष्ठता..केंद्रबिंपाशी जपलेल तिचा प्रामिणिकपणा.. की ह्या सगळ्यांच्या आड लपलेली असते लाचारी? पण जेव्हा वर्तुळाचं अस्तित्वच मुळात कंद्रबिंदुमुळे तेव्हा कसली आलीय मजबुरी?तसंही वर्तुळाची त्रिज्या काय किंवा व्यास काय.. वर्तुळाची सारी अंतरं येउन थांबतात ती केंद्राशीच..
खरतरं वर्तुळ म्हणजे तरी काय रे? असंख्या भल्या बुर्या बिंदुंचाच नं तो समुह.. पण मान मात्र केंद्राचाच.. कारण जगण्याचं हे वर्तुळ पुरं करायचं तर परिघावरच्या प्रत्येक थेंबाला झुकावं हे लागतचं.. प्रत्येकाचा कोन निराळा... अढळ मात्र फक्त एकच.. केंद्रबिंदु..नाही म्हणायला अनेकदा विचारांची भलीमोठी रांग येते हे वर्तुळ विस्कटायला.... कधी कधी विभागतं ते ही.. पण हे सारं क्षणिक... कारण परिघाचं अन् केंद्राचं नातंच मुळी अस्तित्वाला धरून..... विस्कटण्याच्या नेमक्या क्षणाला सापडतो एक नवा केंद्रबिंदु.. नव्या परिघाच्या शोधात.. अन् होतो पुन्हा एक जन्म नव्या वर्तुळाचा..
नक्की कुठल्या रे वळणावरची भेट आपली?
एका बाजुला जीव दडपवणारी दरी..अन् दुसरीकडे उरावर येणारा उंचच उंच काळा कातळ..आणि मी? मी ह्या दोहोंच्या अगदी मधोमध... स्रुष्टीच्या आसवांत नखशिखांत भिजलेली... अन् तुही तसाच... ओलाचिंब..त्या घनगंभिर श्रावणसरीत तसाच आनंदाने बहरणारा... तुझ्यामाझ्यातला फरक काय तो इतकाच.. आसवांचा अन् श्रावणसरीचा...
ओंजळी भरभरून मोत्यासारखी सुख ओतलीस माझ्या पदरात ..मी मात्र अनभिध्न्य .. ह्या सार्यापासून दूर .. माझ्याच कोशात बंदिस्त ... स्वखुशीने .. तू मात्र रित्या ओंजळी पुन्हा पुन्हा भरून घेण्यात गर्क...मी खिडकी पल्याडच्या त्या मुक्त आभाळात हरवलेपण शोधणारी .... स्वतःच्या दु:खाना कुरवाळत..नशिबाला दोष देत भकास नजरेने श्वास मोजणारी ...गमावलास तर तू हि होतस माझ्यासकट बरच काही ....पण...तू दिलेल्या सुखाने ओसंडून वाहत्या पदराकडे बघितलाच नाही रे मी कधी .... तू मात्र माझ्या मागेच ... नाही आधारासाठी नाही ... तू द्यायचास फक्त आश्वासक सोबत.. . माझ्या मीपणाच्या कोशाला कधी चुकुनही नाही दुखावालास तू ....लढायचं तर मलाच होत .. पण तू ढाल बनलास माझी .. इतका आपला असूनही नेहमी माझ्या डोळ्यातलं परकेपण कस रे साहलस? मुक्त तर कधीच झालास तू.. पण आजही माझ्यासाठी हि स्वखुशीची कैद का? कि तुला उमगलीय माझी शेवटची ओढ?कारण आताशा मला दिसते कधी कधी तुझी नजर सर्वस्व हरलेली... आणि पुन्हा तुझे तेच प्रयत्न माझ्यासकट नियतीवर मात करण्याचे...

जन्मगाव...

जवळपास 6-7 वर्ष झालीत आता घरापासुन दुर येउन.. आधी शिक्षण,मग नोकरी... चालायचचं..कुछ पाने के लिये कुछ खोना भी तो पडता ही है.. पण इतक्या वर्षांनंतर आजही जेव्हा घरुन निघते तेव्हा माझ्यातलं काहीतरी मागेच रहिल्याचं जाणवतं... गावाची हद्द ओलांडताना मागे वळुन पाहणं मी सहसा टाळते.. उगाच पाय अडखळला तर... पण पुदच्याच वळणावर हटकुन मागे बघितलं जातं.. डोळाभरुन हे माझं हक्काचं गाव मनात भरुन घेण्यासाठी....लहानपणी आजी सांगायची आपली नाळ जोडली असते गं आपल्या गावाशी.... तेव्हा काही कळायचं नाही... वाटायचं असं कसं मलातर आजीच्या गावी यायची किती घाई असते..कधी एकदा सुट्ट्या लागतात अन् मी आजोळी जाते असं व्हायचं.. मग माझी नाळ आजीच्या गावाशी जुळायला हवी नं.. पण सुट्या संपताना मनाला लागलेली घराची ओढ तेव्हा लक्षातच आली नाही... खरं सांगायचं तर तशी सगळीच शहरं सारखी.. पण प्रत्येकाच्या मनात स्वतःच्या गावाचं एक खास स्थान..निमित्त काहीही असो.. पण गाव सोडताना मनाची अशी काही कालवाकालव होते नं..मनावर प्रचंड दडपण... एक भिती.. असुरक्षितता.. उभं जग जणु खायला उठलयं..
तसं तर आजवर मला भेटलेल्या प्रत्येक गावानं मला आपलसं केलयं.. मला रमवलयं...नंदुरबारने माझं बालपण जपलं, नागपुरने मला माझ्या पायावर उभं केलं, अन् पुण्याने पोट्यापाण्याला लावलं... खरचं खुप दिलयं ह्या शहरांनी आजवर... पण तरिही जन्मगावाची ओढ तशीच... अन् गाव सोडतानाची दरवेळीची रितेपणाची जाणिवही सवयीची.. तरीही नवी..

Sunday, May 6, 2012

सरत्या काळानुसार लोकं बदलतात,त्यांच्यांशी जोडलेली नात्यांची समिकरणं बदलतात... भावना बदलतात... आणि खरच हा बदल एक अविभाज्य भाग बनत जातो आपल्या जगण्याचा..आपण ही सवयीचे गुलाम..स्वीकरतो हे सारे बदल... रोजचाच दिवस उगवतो अन् तसाच मावळतो...आपण पुढे सरकत राहतो..पण अचानक एक दिवस स्वतःलाच स्वतःची ओळख अनोळखी भासते..त्या नेमक्या क्षणाला बदलांची सवय झालेलं आपलं मन हा बदल मात्र स्वीकारायला तयार नसतं... आपल्या आप्तांकडुन जेव्हा ह्या बदलाला नाकारलं जातं तेव्हा खरतरं मुळापासुन हादरतो आपण.. आणि त्याच सुन्न मनस्थितीत विचारत बसतो स्वतःलाच.. नेमकं कुठल्या वळणावर हरवलं ते माझं हवंहवसं मीपण.. खरखुरं.. मुखवट्याशिवायचं... अन् मग सुरु होतो तो हा शोध.. भविष्याच्या वाटेवर चालताना भुतकाळात डोकावुन हरवलेलं गवसतयं का ते शोधायचा अविरत चालणारा खेळ.. तुम्हा आम्हा सार्यांचाच...