Wednesday, May 29, 2013

Bayo


बयो..,
          किती अन कशाकशाच भांडवल करशील आता ? प्रत्येक घटनेमागची कारण शोधता शोधता एक दिवस तूच विस्मृतीत गेलेली घटना होशील गं... हे सुख दु:खाचे हिशोब असे नाहीच गं सुटत...उगाच कमावल्या गमावल्याच्या निरगाठी वाढण्याचीच शक्यताच जास्त त्यात...आणि अस अंधारात तरी किती दिवस काढायचे, सवय होईल बघ त्याचीच.. अन मग मुठभर कवडश्याची सुद्धा भीती वाटायला लागेल तुला... ऐकते आहेस न गं? तूच सांग मागून कोणाला काय मिळालायआजवर..अन इथेतर तुझा थेट दावा त्या विधात्याशी.... उत्तर नासलेल्या प्रश्नाचं नशीब का तुला ठावूक नाही बयो? कोश तोडण्यापेक्षा तो जपन अवघड..हो नं? पटतंय नं गं?
          शेवटी तू काय मी काय... संदर्भ बदलले तरी आपली माती एकच गं बयो...तुझी घुसमट कळतेय ती त्याचमुळे... पण तरी आपण वेगळ्या अन वेगळेपण जाणवत ते आला क्षण आपण कसा झेलतो ह्यावरून... मुक्तहस्ते 'तो' देतच असतो..आपली ओंजळ कशाने भरायची हे मात्र तुझ तूच ठरवायचं बयो... करशील एवढं?
--------------------------------------------------------------------------

गं,
          मला बयो म्हणालीस आता तुला काय संबोधु.... सखी, मैत्रीण, आई, माई, ताई, लेक, नात..तू नक्की आहेस तरी कोण ? म्हणून गं.... खूप अनोळखी भासतेस गं आज तू.... कि आज खरीखुरी ओळखतेय तुला? 
          किती अलगद बोलून गेलीस कोश जप म्हणून.. इतकं का सोप्पय गं ते? आणि आजवर वेगळं तरी काय केलंय मी? तेच तर जपत आलेय.. पण त्याच कोशाच्या गच्च बंद दाराआड आताशा घुसमट जाणवते गं... कळत नाही कशाची पण भीती दाटतेच...उत्तर शोधायचा सोस नाहीच गं..अन प्रश्न कारणं शोधण्याचा नाहीच मुळी... पण नेमक चुकलं कुठे हे तर शोधायला हवं नं.. तेच तर करतेय वर्षानुवर्ष.. पुन्हा नव्याने चुकत..
       एक मात्र खरच जाणवतय मला... माझच अनोळखी अस्तित्व.. सहज म्हणून भूतकाळात डोकावायची सुद्धा हिम्मत नाही गं आता.. पाय रुतला तिथेच तर... नुसत्या विचारानेच धडकी भरते

गवसला नाहीच मजला, चेहरा माझा कधीमी कशी होते मलाही आठवावे लागले

आठवतात का गं ह्या ओळी भट्साहेबांच्या....हम्म.. बाकी काय सांगु? तुला कळतच सारं... एकच नं गं आपण... तरी एक सांगु? आलेला प्रत्येक क्षण झेलायचा खूप प्रयत्न केला गं मी ...पण फाटक्या ॐजळिचं प्राक्तन माझं... कसं गं साठवायचं जगणं?
----------------------------------------------------------------------------------

बयो,
          पुढे लिहू कि नाही ह्या संभ्रमात आहे..तुला पटेल की नाही..रुचेल कि नाही. अन मुख्य म्हणजे मला तुझं भोगणं कमी करायचं आहे वाढवायचं नाही..तरी लिहितेय
         तर बयो, तुला माहितेय बयो म्हणजे काय? बयो म्हणजे हाक बाईपणाची.. ती तुला मला वेगळी अशी नाहीच मुळी. ती आहे आपल्यातल्या तिला...स्वत:च बाईपण न उमजलेल्या (किंवा नाकारलेल्या म्हणूया का गं ?) तिला.. म्हणून बयो..
        चल एक गम्मत सांगते तुला... एक नं अट्टल गुन्हेगारी कैदी असतो, जन्मठेपेची शिक्षा झालेला.... खूप वर्ष तुरुंगात राहिल्यानंतर त्याच्या वागणुकीत बराच बदल होतो.. अन म्हणून त्याला सोडून देतात.. पण गेले कित्येक दिवस बाहेरच्या जगाशी संबधच नसलेला तो ह्या गर्दीत भांबावून जातो..स्वच्छ सुर्यप्रकाशाही त्याला दिपवून टाकतो .. जो तो त्याच्याकडे अनोळखी नजरेने बघत असतो.. घरी येतो तर बायको, मुलगा झिडकारतात त्याला... त्याच्यातला बदल, चांगुलपणा सहन नाही होत त्यांना... मग काय.. तो बिचारा कैदी.. हताश निराश पुन्हा तुरुंगाकडे परततो... आहे कि नाही गंमत?हम्म..बयो तुझं तसं होऊ नये म्हणून सांगतेय.. अंधाराची सवय नको गं... अन असं स्वत:च्या कोशात जबरदस्तीने गुरफटत गेलं तर त्याचं सूरवंट तरी कसा गं व्हायचं ?  अगदी उत्तुंग भरारी एका झेपेत नसतेच गं जमत.. पण निदान पंख पसरायला तर शिक...
        कोणाची तरी आई, बहिण, बायको, सून, मुलगी असण्यापेक्षा तुझं बाई असणं जास्त महत्वाचं नाही का गं?फाटक्या ओंजळीच्या बाता करतेस पण त्या सांधाय्चा प्रयत्न तरी कर... जास्तच बोलून गेले का गं? नियती तरी कुठे कमी बोल लावते गं .. ..
-------------------------------------------------------------------------------------

गं,
          काय म्हणू मी तुला ? काय हा वेडेपणा चाललाय ? आणि मीही शतमूर्ख .. हे सगळं वाचतेय.. का ? काय तर म्हणे पंख पसरून उडायला शिक.... भरारी घे.. .. वाचण्याच्या नादात मला पण पटलं गं ते अन म्हटल उघडावे आपलेही पंख ...पण.. वळून पाहता दिसल्या फक्त छाटल्या गेल्यानंतरच्या भळ्भळत्या जखमा...भरारी घ्यायला पंख कुठे गं माझे ? सणसणुन कळ उठली काळजात ... का अश्या खपल्या काढतेस गं ? जिथे जन्मण्याच्याच हक्क नाही तिथे उडण्याचा अधिकार तरी कसा गं असणार हे का ठावूक नाही तुला ? पंख म्हणजे काय हे हि विसरलेय बघ मी आता.... तुला सांगते लहान होते नं तेव्हा खूप स्वप्न होती गं माझी... रंगबिरंगी आकाशात मोकळं उड्ण्याचं हि त्यातलाच एक....निळ्याभोर ढगांआडचं इंद्रधनुष्य आणायचं होतं मला... दादाच्या शाळेच्या पुस्तकात दिसायचं तसं पिवळधम्म उन अन रिमझिमणारा पाउस घ्यायचा होता मिठीत...... पण कसचं काय... जाऊ दे..जे आहे ते असाच स्वीकारलाय मी... बाईपणाची लाज नाही गं सवय झालीय मला आता.... पण तरी एक विचारू?
                  आकाशाचा रंग अजूनही तसाच आहे का गं?निळाभोर अस्मानी?
----------------------------------------------------------------------------------------------------------------

बयो,
          अगं तुला कळतय का, तुझ्या पोस्ट्कार्डाचं आता अंतर्देशीय पत्र झालाय....चला हे हि नसे थोडके... वाट मिळायचीच देरी कि पाझर फुटतोच बघ ... खूप बरं वाटतंय आज..पण तरी अस्वस्थ मन ..तुझे प्रश्न घरं पाडतात गं काळजाला...किती अन काय काय भोग गं हे तुझे..
        खरय तुझं भरारीच्या बाता मारतेय पण पंख कुठेत गं आपल्याकडे? बाईपणच्या जखमाच तर सांभाळतोय जन्मल्यापासून... किती लहान असतानापासून हे संस्कार घडताहेत गं आपल्यावर? मुलीच्या जातीने असं करायचं नाही, तिने इथे जायचं नाही.. सातच्या आत घरात.... कपड्यालत्या पासून ते अगदी खेळ्ण्यापर्यंत हेच ते बाईपण सतत आदळत राहिलं गं अंगाखांद्यावर.... तसं बघायला गेलं तर कमी पण नाही केलं काही..जेवणखाण, कपडेलत्ते, खेळ्भांडी .. अन हो शिक्षण सुद्धा.. लग्नाच्या बाजारात ते महत्वाचं म्हणून... मिळालं नाही ते फक्त माणूस म्हणून जगण्याचं स्वतंत्र्य.... हम्म.. तसंही स्वत:चे हक्क कधी मागितले गं आपण ? त्यात हा हि एक तसाच .. न मिळालेला ...
       कंटाळलिस नं? तेच ते जुनं पुराण ऐकावतेय नं मी? नवीन काय त्यात? ...हम्म.. खरय .. आहे जुनंपुराणं हे पण तरीही ते वर्तमान आहे बयो. अन तेच खुपत .. आजूबाजूला नजर टाकलीस नं तर दिसतील हजारो अश्या बयो आजही .. बंद दाराआड स्वत: ला बंदिस्त करून घेतलेल्या .. अन ह्या अश्या दारावर थाप पडली माझी तर काय होईल गं? स्वत:च्या अस्तित्वाची जाणीव इतकी बोचरी असते का गं?
--------------------------------------------------------------------------------------------------------

गं,
            दरवेळी कसे गं तुला इतके तर्हेतर्हेचे प्रश्न पडतात? बाईमाणसाला नसावी गं इतकी उठाठेव प्रश्नांची... मुळात ह्या प्रश्नांची उत्तर शोधायला आपला परीघ तरी कुठेय हक्काचा? आपण सगळ्या बांधल्या गेलेलो त्या एका केन्द्रबिंदुशी..हम्म ..पण तो मात्र प्रत्येक वळणावर बदलत जातो.. बाप, भाऊ, नवरा, मुलगा झालंच तर नातुसुद्धा... आपला परीघ मात्र त्यांच्या त्रिज्येत....अन मोडायचं म्हट्लं तरी वर्तुळ कुठे गं मोडता येतं... साधं चौकटीबाहेर पाय टाकायची हिम्मत नाही। बाईपणाची त्रिज्या कशी गं वाढवायची?
          तू विचारतेस ह्या बंद कवाडावर तुझी थाप पडली तर काय होईल? माझं काय झालयं ते तर पाहतेच आहेस नं.. तेच होणार.. पहिल्या थापेसारशी जिवाचा थरकाप.. अन दुसर्याच क्षणी आशेचा किरण.. कोणीतरी काढेल बाहेर ह्या अंधार कोठडीतून... मदतीच्या हाताच्या नुसत्या कल्पनेनेच फुलारतो गं जीव.. अस्तीवाची दखल घेतली जाण्याची ती पहिली पायरी... पण त्याचवेळी आठवते तुझ्या कैद्याची गोष्ट... अंधार कोठडीत राहिल्यावर सुर्यप्रकाशाला घाबरणार्या कैद्याची गोष्ट.. आपलं ही तसचं नाही का गं.. रूढी परंपरा,घर कि इज्जत, खानदान का नाम... हे सगळं कैदेहून काय वाईट गं? पाय अडकतो तो इथेच..
       तरी तुला वाटतं मी कारणं देतेय? माझ्या ह्या कैदेला मी स्वत:च ओढवलाय ? मला मुक्त व्हायचाच नाहीये? ... अंधाराची सवय बरी नाही हे का मला पटत नाही गं... पण निदान इथेतरी माझं मीपण गवसतं हाच काय तो आधार.. तूच म्हणाली नं अस्तित्वाची जाणीव बोचरी असते म्हणून? मग ते नसलेलं काय वाईट?
                   भोगले जे दुःख त्याला, सुख म्हणावे लागले
                   एवढे मी भोगिले की मज हसावे लागले
    भट्साहेबांच्या ह्या ओळिपेक्षा वेगळ सांगु तुला? अंधाराच्या काळ्या रंगातही शेवटी बरेच रंग असतात हा शोध लागलाय मला..

Friday, March 22, 2013

आदर.. कितीदा मनापासून अन कितीदा सामाजिक दडपणातून? मुळात आदर हा कमवावा लागतो न.. बरेचदा शारीरिक वर्चस्वाने निर्माण होणारा आदर म्हणजे भीती असावी. अन मानसिक किंवा बौद्धिक आदर? हम्म तो तरी खरा असावा... शाळेत असतांना शिक्षकांचा,मोठ्या व्यक्तीचा आदर करा अस शिकवलं जायचं..पण ह्याच शिक्षकांचा आदर आपण भीतीपोटीच करायचो न....आणि आज त्याच आठवणी नकळत नतमस्तक व्हायला लावतात... आदर डेव्हलाप व्हावा लागतो खरतर नाहीतर उरते फक्त चमचेगिरी....
नात्याचही मोठं विचित्र असतं.. जितकं घट्ट पकडायला जावं तितकं निसटतं जातं..मुठित जीव गुदमरत असावा त्याचाही... कधी कधी वाटतं असं घुसमटण्यापेक्षा मुक्त करावं ह्या नात्याला.. घेउ द्यावा त्यालाही एक मोकळा श्वास...मनाला समजावत जातो मग आपण.. खरतरं एखाद्या गोष्टीची सवय केव्हाही वाईटच.. हो अगदी नात्याचीही.. हे मनही मोठं वेडं असतं.. अश्या जSSSरा दुर गेलेल्या नात्यांची सवयही मोडायला मोठं नाटकं करतं.... आपण सवयीचे गुलाम हेच खरं.. चला मोठ्या प्रयासाने मनाला समजावलं पण की बाबारे आता त्या व्यक्तीची सवय तु मोडायची... पुन्हा नाही असं अडकायचं आता.. तर नेमक्या त्याच हळव्या क्षणी हे हरवलेलं नातं परत येतं.. आणि हसतं आपल्या वेडेपणावर..... म्हणतं आपल्यालाच, वेडाबाई असं कसं गं आपलं नातं बदलणार.. बदलते ती परिस्थिती.. आणि कदाचित वेळही.. पण म्हणुन खरी नाती का अशी दुरावतात... खरं सांगु तेव्हा स्वतःच्याच वेडेपणावर एकाच वेळी रागही येतो अन् हसुही... खर्या खुर्या माणसांशी जोडलेल्या नात्यावरचा विश्वास उडु नये कधी हेच खरं..

भिंगरी

"काय की नुसत्या भटकत असता. आज ह्या शहरात उद्या त्या शहरात.. पायाला भिंगरी लावलीय जशी." इति आज्जी 
"अगं आजी कामं असतात गं, मिटींग साठी जावंच लागतं" मी 
" हो हो माहितेय मोठी कामाची ते.. आमच्यावेळी नव्ह्तं असं" आजी थोडी वैतागून अन थोडी काळजीत निघून गेली.. मला मात्र प्रश्न, कस काय आजीच्या काळात लोकं वर्षानुवर्ष एकाच गावी राहायचे? बाहेरच्या जगात काय चाललय ह्याचं काहीच सोयारसुतुक नसावं त्यांना? दळणवळणाची साधनं कमी होती, प्रसारमाध्यम कमी.. मान्य.. पण उत्सुकता पण कमी? नाही नं? आज आपण अगदी कमी वेळात जगाच्या ह्या टोकावरून त्या टोकावर जातो तरी असे अनेक भाग आहेत जिथपर्यंत माणसाचे पाय पोहचले नाहीत.. त्या भागातल्या लोकांचंही आयष्य असंच असेल मर्यादित? आपल्या पल्याडही एक जिवंत जग आहे ह्याची त्यांना जाणीव असेल? की ते ही आजी-आजोबांच्या काळात वावरत असतील अजूनही? हुश्श.. विचार विचार फक्त विचार..आजीला मात्र आता समजावून सांगावं लागेल ह्या भिंगरी लागल्या पायाची गरज..

देवराई

देवराई ... गर्द हिरव्या झाडांची ...टपटपणार्या थेंबांची.. जाळीतून पाझरणार्या हलक्या ओलसर प्रकाशाची ...देवराई.... सिनेमाचा नायक म्हणतो, आपलं मन सुद्धा एक देवराई असतं...वरवर दिसताना सुटं सुटं पण आत खोलवर मुळाशी एकसंध.... मुळात सिनेमाचा विषय आहे schizophrenia... खर्या आणि आभसी दुनियेच्या सीमेवर रेंगाळत ठेवणारा मनाचा एक विकार... ह्म्म....देवराई म्हणजे पण असचं नं....गर्द हिरव्या छताखाली वसलेलं गंधांचं,रंगांच,स्पर्शांचं आभासी जग.... खर्या खुर्या जीवांना वेडं लावणारं....
कृष्ण वाचताना त्याच्याशी जोडल्या गेलेल्या स्त्रिया मनात नकळत घर करून जातात...राधा,द्रौपदी,कुंती... आणि रुक्मिणी? महाराणी रुक्मिणी..द्वारकेची राणी... कृष्णावर निस्सीम प्रेम करणारी.. भर स्वयंवरातुन पळवून आणलेली रुक्मिणी.... मला नेहमी प्रश्न पडतो की रुक्मिणीला राधेबद्दल काय वाटत असेल? कुतूहल? की असूया? कणखर, यादवराज जिच्या फक्त उल्लेखाने हळवा होतो त्या राधेचं नेमकं काय चित्र असेल रुक्मिणीच्या मनात?

रारंगढांग

रारंगढांग...उंचच उंच, आभाळाला भेदणारा नितळ अवाढव्य कातळ....ह्या हिमालयातल्या रारंगढांगातुन रस्ताबांधणीची कथा म्हणजे रारंगढांगाची कथा... पाहिलं तर साधं सोपं अन पाहीलं तर प्रचंड गुंतागुंत.. हिमालय म्हटलं की, पांढर्या बर्फाने आच्छादलेले शिखर, रो रो आवाज करत वाहणार्या नद्या, अप्रतिम सौंदर्याने नटलेला परिसर, पण हिमालय म्हणजे अजुन बरंच काही .. सततची बदलती हवा, क्षणाक्षणला रंग बदलता लहरी निसर्ग, जीवघेण्या दर्या हा सुद्धा हिमालयच...ह्या अश्या टोकाच्या बदलांचा मानवी मनावर होणारा परीणाम म्हणजे रारंगढांग.. अन ह्या रारंगढांगाला फोडुन त्यातुन मार्ग काढण्याची जिद्द घेऊन ह्या हिमालयात पहिल्यांच आलेला एक सिविलियन ओफ़िसर विश्वनाथ ह्या कथेचा नायक.. सैन्याची शिस्त, अधिकारांची अरेरावी, दरिद्री पण प्रामाणिक तिबेटी कामगार , बेभरवश्या निसर्गाची भीती..सगळ्यांवर मात करत काम पुर्ण करण्याची कहाणी म्हणजे रारंगढांग.. पण ह्या व्यतिरिक्त राहतच काहीतरी, ग्यानचंद म्हणतो तसं " साब ,जब आदमी मर जाता है तो उस का क्या रहता है?... त्या माणसांची राहते फक्त यादगारी.. रस्त्याच्या कडेला फक्त एक सफेद चौथरा..ह्या एका फर्लांगात असे किती तरी चौथरे दिसतील साब..साब हम इतने भी बुजदिल नही। जंग हम ने भी देखी है... पण साहेब लढाईत समोरच्याच्या हातात बंदुक असते तशी आपल्या ही हातात असतेच नं तो तरी मरेल कीवा आपण तरी, पण...पण इथे तर रोजचीच लढाई.. कुठल्या तरी दगडावर तुमचं नाव लिहिलेलं... कुठुन तरी येऊन तो तुमच्या डोक्यावर कोसळेल , बसल्या जागी खेळ खल्लास.. दरडीचं कोसळणं , लण्ड स्लाईड, ब्रेक फ़ेल..काहीही होउ शकतं... एखाद्या वळणावर म्रुत्यु तुमची वाट बघत उभा असेल..पटकन गाडीत चढेल, तुमच्या बाजुला बसेल ,काहीवेळ प्रवास चालु राहिल अन पटकन तो म्हणेल," चलो दोस्त, टाईम खत्म हो गया" आणि मग काय उरतं मागे? चबुतरा...सतलजच्या काठाशी?"