Wednesday, July 23, 2014

paaus paaus

रात्रीचा हा मुसळधार पाउस नुसता ऐकायचा असतो रे ... मनभर पांघरुन घ्यायची असते त्याची लय.. त्याचे सूर...त्याचे बोल....त्याची कुजबुज...कणकण साठवायचा असतो त्याचा ..श्वासाश्वासात..पण तरी टाळायचं असतं ते फक्त त्याला बघणं...मध्यरात्रीच्या काळ्याकुट्ट अंधारातला व्याकुळलेला पाउस... कुठल्यातरी अनामिक ओढीने घुसमटलेला पाउस... सरळसोट सरीमधे गुंतलेला पाउस...असं म्हणतात की ह्या पावसाच्या डोळ्यात एक वेडा आरसा असतो.. ऐन मध्यरात्री हा पाउस उशाशी आला नं कि म्हणे प्रतिबिंब दिसतं.त्यात .. पावसाचंच .. फक्त मनातल्या पावसाचं ... 

म्हणून म्हट्लं हा पाउस फक्त ऐकायचा.. मनसोक्त... त्याला बघणं मात्र टाळायचं... जमेल तुला?

.....................................................................................................................................................................................................
शोध घ्यायचाच म्हटलं की मग हवं नको सारंच उकरलं जाणार बघ पुन्हा एकदा..ते टाळून कसं चालणार बयो..मागे वळून बघणं म्हणूनच तितकसं सोपं नसतं नं गं..असंख्य वाटा दिसतात पाठमोरं वळताना.. काही वाटांवर अर्थातच असतात आपल्या पायांचे ठसे पण काही टाळलेल्या वाटा आजही खुणावत असतातच नं....त्यांना दुर्लक्षणं जमणार आहे का तुला ? भुतकाळातल्या संदर्भांचा शोध जरुर घे गं तुझ्या आजच्या असण्याचं स्पष्टीकरण आहे त्यात पण जितकं खोल खोल जाशील तितकी तिथेच रुजत जाशील ह्याचं भान मात्र असू दे..

........................................................................................................................................................................................................................

"कसं असतं नं प्रत्येक नात्यात नं एक जण स्थिर हवाच रे... तरच तर दुसरा त्याच्याभोवती नि:संकोच एक नातं विणू शकतो मुक्तपणे... एक comfortable अंतरावर..space म्हणूया हवं तर त्याला....केंद्रबिंदू ते परिघापर्यंतच्या त्रिज्येची space.. हि space तशी बरीच लवचिक रे पण एक क्षण येतोच असा कि जराशी ताणली किंवा सैलावली कि उसवत जातं रे नात्याचं ,वर्तुळ.... सुलगत जातो एक एक बंध... मागे उरल्या वेड्यावाकड्या नागमोडी गुंत्याला मग नातं तरी कसं रे म्हणायचं? म्हणून हवा असतो एक स्थायी कोपरा नेमकं अंतर जपणारा...." ती बोलत होती अविरत... तिच्या त्याच्या नात्यातल्या त्या अचल केंद्राशी...एका श्वासाच्या अंतरावरून...

..........................................................................................................................................................................................................................
काचेच्या त्या पल्याड करकचून बांधलेल्या ढगांच्या उसवणीतून झिरपत असतो अखंड पाउस... खिडकीवर, छपरांवर..पानांवर फांद्यांवर पसरल्या असतात असंख्य वेड्या ओंजळी... पाउस झेलणार्या...अन् काचेच्या ह्या पल्याड धूरकटल्या खिडकीत विणलं जात असते एक नातं माझं ...तूझ्यातल्या पावसाशी...एक सुलट एक उलट..नव्या वीणीचे नवीन नाते..पावसाच्या साक्षीने

.........................................................................................................................................................................................................................

काही गाणी काही सुरावटी वेड्याच असतात नाही.. एखादा साधासाच प्रसंग तर कधी एखादी खासमखास कुणीतरी नकळत विणत जातात त्यांच्या सुरात.. मग भर गर्दीत अगदी कुठूनही नेमक्या कानावर येतात अन् अख्ख्या पब्लिकच्या नजरेत वेडपट ठरवतात रे ..नकळत उमटलेलं एक निसटतं हलकं स्माइल..एक लाजलेली पापणी..उगाचच एक उसासा..तर कधी एक ओघळता थेंब.... अन् सुखावलेलं एक बावरं मन..खरंच येडीच असतात रे काही गाणी .स्थळाकाळाचं भान सोडलेली...

......................................................................................................................................................................................................................


No comments:

Post a Comment