Wednesday, July 23, 2014

आपल्या आजूबाजुला वावरणारे नं असंख्य ओळखीचे चेहरे असतात पण सालं बर्याच चेहर्यांशी कधीच connect होता येत नाही असं का? कितीही प्रयत्न करा नशीबाचं no network..किंवा 'आपण ज्या व्यक्तीशी संपर्क करु इच्छिता ती संपर्क क्षेत्राच्या बाहेर आहे' 
अशा चेहर्यांना खरंच ओळखीचं म्हणायचं?

..........................................................................................................................

Emotional bin... हो बीनच कारण ह्यात सगळं टाकून विसरुन जायचं असतं रे सगळं..जगण्याच्या हरेक टप्प्यावर हवी असते रे अशी एक emotinal bin जी त्या क्षणांचे कुठलेही निकष न लावता फक्त ऐकून घेईल आपलं म्हणणं...रडावंसं वाटताना खांदा होईल, मजेत असताना उत्सुर्त टाळी होईल,काळजीतला धीराचा हात होईल अशी bin...मान्य आहे कधीतरी लाथाडलीही जाईल पण नाकारली नाही आणि हो कुठलाही सल्ला न देण्याचा एकअलिखित नियमही असेल ,जमेल तुला? कळतंय रे मला कुठल्याही नात्याच्या पल्याडचं आहे हे आणि त्यामुळेच धूसरही.. म्हणूनच विचारतेय, जमेल तुला अलिप्त राहूनही असं खोलवर रुजणं ? नक्की जमेल का रे तुला कोणातरीसाठी हक्काची emotional bin होणं आयुष्यभरासाठी?

..............................................................................................................................

जितकं खोल खोल शिरावं ह्या मिट्ट काळ्या अंधारात तितकं दरवेळी काहीतरी नवीन गवसतंच....प्रत्येक ठेच नवीन ...

...............................................................................................................................
भर मे महीन्यात अचानक अंधारुन आलेल्या काळ्याभोर संध्याकाळी...ओल्या मातीच्या गंधात...मुसळधार पावसात...ओल्याचिंब पानाफुलात...तू चक्क आठवलाच नाहीस रे मला...अगदी कडाड् वीज चमकली तरी... पावसाच्या मार्यात वारा घुसमटला तरी आणि हो गच्च भरुन आलेलं आभाळ न बरसताच टाळून गेलं तरीही....नाहीच आठवलास रे तू ...बरोबर म्हणाला होतास तू ...वाटलं होतं तेव्हढं कठीण नाहीय हे खरंच.... फक्त ओसरलेल्या पावसानंतर पानापानातून ओघळणार्या थेंबसरींना नाही रे अजून टाळता येत तेव्हढं मात्र सांगून जा....जमेल तुला?
......................................................................................................................................

लिहीणं ,वाचणं ह्यासारख्या व्यक्त होण्याला वयाचं परिमाण का लावावं? म्हणजे तुम्ही लहान असाल (कळत्या वयातही हं..कारण कोणानकोणापेक्षा तुम्ही नेहमीच लहान असतातच) तर तुम्ही हलकं फुलकंच लिहावं/ वाचावं .... जरा काही गंभीर विचार मांडला की अकाली प्रौढत्वाचे लेबल लागलेच म्हणून समजा... असं बंधन का? आणि जर चुकून तुम्ही मोठे असाल अन् चुकून जरा मजेशीर लिहीलं तर लगेच तुम्ही थिल्लर...का बुवा? मुळात तुमचं लिहीणं किंवा वाचणं हे तुमच्या व्यक्तीमत्वाचा फक्त भाग असावा पुर्ण व्यक्तिमत्त्व नाही नं ? मग तरी लोकं निष्कर्षाची घाई का करतात ?

.........................................................................................................................................

बस रडता यायला हवं यार... अगदी मोठ्या मोठ्याने... धाय मोकलून का काय ते...सगळं मोकळं व्हायला हवं वरचेवर ... मोठे झालो नं(वयाने हं ) कि साला हाच लोचा होतो... समजूतदार का काय ते व्हावं लागतं... डर के आगे जीत है वैगरे स्वत:लाच सांगावं लागतं.. पण यार ती भीती असतेच नं मनात कुठेतरी दडवलेली.. लोकांसमोर वाघ असलेले आपण स्वत:समोरच शेळी होऊन जातो रे खरतर .. पण ते अक्सेप्ट करायचं नसतं आपल्याला... सतत बजावत असतो मी वाघ आहे... का? कशासाठी?... स्वत:शीच प्रामाणिक नाही का राहता येत यार..आणि वाईट म्हणजे हे खुपत पण नाही.. कशाचाच फरक पडू नं देण्याची इतकी सवय?...बरं हे झालं भितीचं... पण खूप मेहनत करून..अगदी जी-जान एक करून जेव्हा लढतो नं आपण आणि तरी साला हरतोच ... तेव्हा रे काय होतं... येतं रडायला?हो येतंच.. फक्त ते मान्य करायचं नसतं... लोकांसमोर नाही निदान एकटं असताना तरी? पण नाही... नाहीच रडता येत.. इतके कोरडे झालो तरी कधी रे? बाहेर पडत नाही आणि आत सहन होत नाही... घुसमटतयं.. धुमसतंय आतल्या आत... ज्वालामुखी होत चाललाय रे तुझा ... पण तरी रडायचं मात्र नाहीच ... मोकळं व्हायचचं नाही... हा कसला रे हेका मना तुझा? सांगशील?

........................................................................................................
इतके वर्ष गर्दीला फक्त टाळतच आलीस सखे तू...कोण जाणे नेमकं काय बोचायचं तुला, पणअगदी चार माणसांची सोबतही तुला असह्य व्हायचीच .... स्वतःच्याही नकळत विणत गेलीस तू एक कोष तुझ्याचभोवती...इतका घट्ट कोष की उजेडाची एक तिरीपही तुझ्यापर्यंत पोहचायला एक युग उलटावं लागलं ....नेमकं काय साध्य केलंस नाही विचारणार मी किंवा असं का हेही नाहीच समजून घ्यायचं मला पण तरी एक सांगशील?
एकांत अन् एकटेपणातलं अंतर तुलातरी पार करता आलं का गं?

........................................................................................................................

ध्यानीमनी नसताना अचानक समोर उभा ठाकलेल्या एखाद्या अलवार ओल्या क्षणासारखा होतास..तू ....भिरभिरत्या नजरेने थेट काळजाचा ठाव घेणारा...खोल खोल उतरत धसमुसळेपणाने मनाचा तळ ढवळणारा...अन् कोणाला काही कळायच्या आत,सावरायचाही अवकाश न देता अलगद निसटून गेलेला...तू...त्या क्षणासारखा...कधीही परतून न येणारा तू...

..........................................................................................................................

एकसारखी गर्दी... कसलाच चेहरा मोहरा नसलेली... ओळख नसलेली... अन ह्या भरगच्च गर्दीत चटकन डोळ्यात भरणारा (कि खुपणारा रे)..अगदी माझ्यासारखाच असलेला तू... शारीरिक म्हण किंवा मानसिक म्हण ... परिमाण कुठलेही असलेत तरी odd man outच नं आपण...जगाच्या दृष्टिने.. 
खुपलं का रे तुलाही आपलं हे जगावेगळेपण..एकदातरी ?

...................................................................................................

वेगवेगळ्या फ्रेम्स मधून आयुष्य खरंच वेगळं दिसतं रे...पण त्यासाठी प्रत्येक फ्रेम चाचपडून तर बघायला हवी न...कधी कधी एखादी लहानशी फ्रेमासुद्धा अख्खं जगणं व्यापून शिल्लक उरतेच कि ... हो नं?

.....................................................................................

समांतर रस्त्यांवर चालताना एकमेकांना टाळता येत नाहीच रे तसंही.... मग तरीसुद्धा एकाच मार्गाने एकत्र चालण्याचा हा तुझा अट्टाहास नेमका कशासाठी रे ? पायवाटांचे शाप का तुला माहीत नाही? एकत्र नाही एकापाठोपाठ असावं लागतं रे तिथे, कोणीतरी एक सतत मागे राहणारच...उरलं सुरलं सावरत... नेमकं हेच... हेच नकोय रे मला....फरफटणं...आयुष्यभर.... तुझा पाठलाग करत...अन् तसंही दिसत राहूच रे आपण एकमेकांना.कायम....अगदी नकोनकोसे होईपर्यंत....भेटणं मात्र टाळूयात का रे? दोन समांतर रेषांचा प्रवास सारखा असला तरी शेवट एक नसतो नं...तसंच आहे आपलं...असं समज हवं तर...

.........................................................................................

परवा कोणीतरी म्हणालं मला," काय गं तू पावसाळी पहाट अनुभवतेस..हिवाळ्यातली धुक्यातली पहाट लिहितेस.. मग उन्हाळ्यानेच गं काय घोडं मारलं तुझं? त्यावर पण लिही कि" अन माझ्या लक्षात आलं कि खरच, उन्हाळ्यावर नाहीच लिहिलं कधी... तर उन्हाळा...उन्हाळा म्हणजे सुट्ट्या..उन्हाळा म्हणजे धमाल..मस्ती...उन्हाळा म्हणजे नो अभ्यास नो शाळा ... पण उन्हाळ्यातली पहाट? जे बघितलंच नाही ते लिहीणार तरी कसं हो? नाही म्हणायला लहान असताना गच्चीत झोपायचो तेव्हाची पहाट आठवते थोडी थोडी ती अशी ...रात्री उशीरापर्यंत गप्पा मारता मारता आम्हा बच्चे कंपनीचा कधीतरी २-३ वाजता डोळा लागायचा..वारं तेव्हाही गरमच असायचं...पण दिवसभर आमच्या धुडगुसीला वैतागलेल्या मोठ्या माणसांकडे बघून झोपायचो आम्ही ...मग कधीतरी गाढ झोपेत अलगद एक गार झुळूक जाणवायची... कधी मध्यरात्री उमललेल्या मोगर्याचा मादक गंध तर कधी शेजारच्या आंब्याच्या मोहराचा मधाळ गंध असायचा त्याला... झोप चाळवायला अगदी पुरेसा असायचा तो गंध..तेव्हाही...किलकिल्या डोळ्यांनी वर बघितलं की समोर दिसायचं निळंशार आभाळ...अथांग पसरलेलं...काही क्षण कळायचंच नाही की नेमकं आपण आहोत तरी कुठे...पण आजुबाजूची मोठ्या माणसांची रिकामी अंथरुणं दिसली की समजायचं....पहाट झाली..पहाटे उठले वैगरे नाही कधी पण गच्चीवरचं ते निळं आभाळ निरखत बसायला मजा यायची....डोळे निवायचे त्या रंगात हे मात्र खरं..

........................................................................................................................................................................

No comments:

Post a Comment