Sunday, February 1, 2015

मोठ्या मोठ्या स्वप्नांची डेड लाईन.. अन लहान लहान स्वप्नांची एक्सपायरी डेट...नेहमीच अदृश....

भर थंडीत गर्द धुक्यापल्याड साठलेलं हे काळंभोर मळभ बघितलं नं कि मला हटकून तू आठवतोस.... खूप खूप दाटून आलेलं असतानाही, कोसळण्यासाठी श्रावणाचं निमित्त शोधणार्या भर ग्रीष्मातल्या वळीव सरीसारखा....

मुरत चाललय गं नातं आता. अवास्तव फापट पसाऱ्यातून नेमकेपणाकडची वाटचाल सुरु झालीय. एकेक टप्पा. अनोळखी.. ओळखी... भीती... अपेक्षा.. विश्वास. ओलांडत जातोय हि एक एक वळणं. सहज होत चाललोय. जाणवतंय नं बयो..

नवीन वर्षाच्या नव्या कोर्या डायरीत पहिल्या पानावर लिहिण्याचा आनंद मला थेट शाळेत घेऊन जातो... स्वतःचं नाव तिथे लिहिताना वळणदार अक्षराचा अगदी कळस गाठला जायचा... आजकाल मात्र सगळं टाईप करण्याचा जमाना... हातात पेन फक्त सही ठोकण्यासाठी.. पण पहिल्या कोऱ्या पानावर लिहिण्याची हौस अजूनही तशीच... वेडं वाकडं अक्षर.. शब्दांवर टोप्या घालायचा कंटाळा... क्ष ज्ञ कसा रे लिहितात... जोडाक्षर लिहिताना तर हमखास मराठीच्या बाई आठवतात. ...ह्यावर्षी नं ओर्गनाइज राहू जरा म्हणत नीट अधोरेखित केलेले मुद्दे नकळत स्वच्छतेचे ५ मार्क देऊन जातात नं तेव्हा जाणवतं....काही सवयी उगाच सुटल्यात.. कधीकाळी ज्या भिनल्या होत्या आपल्यात त्या आता पहिल्या पानापुरतच उरतात. अन डायरीच्या शिल्लक पानांवर नव्या सवयींचे ठसे उमटतात..


नेमिची येतो पावसाळाच्या धर्तीवर नेमिची तर येतं नवीन वर्ष.. त्यात काय एवढं.. 
३६५ दिवस संपले कि झालं.. आलं पुढचं वर्ष.. एक अंक बदलला.. मोठ्ठं काय नं 
त्यात.. पण असं नसतं राजेहो.. इतकं साधं सोपं नसतं ते... आज रात्री १२.०० वाजून पुढे सरकलेला काटा एक अख्खं वर्ष मागे टाकून पुढे निघाला असतो..गम्मत नाही.. काय मिळवलं काय गमावलं वैगरे असू द्या हो पण उणेपुरे ३६५ दिवस आपण चक्क नीट तरून आलो ह्याचं आश्चर्य नाही वाटत ? कौतुक नाही वाटत प्रत्येक दिवस भरभरून जगण्याचं..चांगलं वाईट दुय्यम ठरतं हो अश्यावेळी.. फार लवकर गेलं नं हे वर्ष... असं हटकुन दरवर्षी वाटतं.. बरंच काही राहून गेलेलं असतं तरी जडवलेली झोळी सुखावतेच नं... आपण जसं पाहू तसंच वर्ष दिसतं आपल्याला... समाधान मात्र दरवर्षी वाढतंच. हो नं?

आज नं एक गंमत झाली. सांगू? रोजच्या सारखी मी माझ्या गाडीवर ऑफिसला चालले होते. माझ्याच धुंदीत. मस्त थंडी अन कानात आवडती गाणी. मज्जानी लाईफ. गर्दी नव्हतीच नं. हा तर झालं असं कि एका वळणावर एका बुलेट्ने मला ओवरटेक केलं. त्याचा मालक बुलेटला साजेसाच होता म्हणून मीपण मोठ्या मनाने घाबरून त्याचा ओवरटेक माफ केला . पण इतकं करूनही त्याची बुलेट काही बुंगाट समोर गेली नाही. हळूहळू चालवत होता तो अगदी माझ्या रथासमोर." च्यामारी काय कटकट आहे". असं म्हणत मी गाडी बाजूला घालणार इतक्यात. इतक्यात त्या मालकाच्या हातावरून एक लहानसा चेहरा डोकावला. निरागस अन खट्याळ. कसं हरवलं तुला असा काहीसा भाव. वाकुल्या दाखवत खिदळत होती ती लालचुटुक ड्रेस मधली गोरीपान पोर. आता मात्र मलाही जोर चढला मी स्पीड जर रेज केली आणि प्यारेलल आली तिच्या तर चिमुरडी लगेच बिलगली बापाला. ५मिन असाच खेळ चालला होता. कधी ती पुढे तर कधी मी. ती समोर गेली कि खळखळून हसायची अन मी जरा पुढे गेली कि बापाच्या पोटावर गुद्दे मारत त्याला चीथ्वायची. धमाल मजा. त्यांच्या वळणावर वळताना मात्र गोड हसून बाय केलं लेकीनी एका फ्लाइंग कीस सकट. अन बापानेपण मान वळवत डोळ्यातूनच थ्यांक्स म्हटलं. लेकीसाठी तिचा सुपरम्यान बाबा जिंकला होता अन माझ्या झोळीत एक समाधानी दिवस पडला होता.

No comments:

Post a Comment