Sunday, February 1, 2015

दिवसाच्या प्रवासाने दमलेली... भारलेली.. समाधानी सांजवेळ... ओंजळभर उन घेऊन उंबऱ्यात उभी... तिष्ठत.. याचकाच्या वेशात... काय हवं असतं तिला ? रात्रीपुरता आसरा ? कदाचित हो.. पण आसरा तिला स्वतः साठी नाही तर त्या ओंजळभर उन्हासाठी हवा असतो. दिवसभरातले कवडसे वेचून भरलेली ओंजळ तिची तिला निरांजनात रिती करायची असते अन कवड्श्यांनी उजळलेल्या निरंजन ज्योतीत क्षणभर रेंगाळत विरून जायचं असतं रे तिला. पहाटेची स्वप्न पूर्ण करता उंबरठ्याशी ताटकळलेली हिसांज तेवढी न विसरता घरात घे..

दोस्ता ,आपण भेटतो...खूप दिवसांनी खूप बोलतो.. विषय असो नसो.. बोलणं थांबत नाही... अधून मधून डोकावत असते शांतता.. दोन शब्दांमधली... अंदाज घेत असते ती दोघांचा.. दोघांनाही पडलेल्या प्रश्नांचा.. अन वाट बघत असते प्रश्नांच्या उत्तरांचा.. आणि आपण..आपण नेमकं त्यांना विळखा घालून तिथेच आजूबाजूला घुटमळत बसतो. वेळ सरत असते , आपल्या गप्पा अजून रंगत असतात.. पण शेवटी निरोप घ्यायचा असतोच नं...
तुझी पाठ वळण्याच्या नेमक्या क्षणी कसाबसा कुजबुजलेल्या त्या अडखळत्या प्रश्नांची नेटकी उत्तरं तुझ्या आश्वासक नजरेतून गवसायला हा महत्वाचा शेवट गाठावा लागतोच हो नं ?

आज शेवटी एकदाची लायब्ररीची मेंबरशिप क्लोज केली... गेले काही महिने प्रचंड 
बिझी गेलेत.. तरी वाचायला वेळ काढायचाच ह्या जिद्दीने लायब्ररी सुरु 
होतीच..आणि त्याच अट्टाहासाने मीन पुस्तकं पण बदलून आणत होती..पण काल 
पुस्तकांवर धूळ बघितली अन निश्चय केलाच.. तसा तो गेल्या चार महिन्यात दोनदा 
झाला होता हे पण लक्षात आलं.. कसं होतं नं मोठ्या धीराने मी ठरवते कि बस आता 
बंद कराची लायब्ररी.. आई बाबांना वेळ देत येत नाहीये आणि चालली पुस्तकं
वाचायला..सगळं संपवून टाकायचं ह्या रागातच लायब्ररीत पोहोचायचे अन.. तिथे
पोहोचले कि माझा राग मावळायचा.. पुस्तकांचं विश्व.. तो वास.. स्पर्श.. हजारो
पुस्तकं.. त्यांचे वेगवेगळे विषय.. भाषा.. रंग.. मुखपृष्ठ.. आहाहाहा.. खेचून
घ्यायचे स्वत:कडे.. आणि माझा निर्धार.. लायब्ररी बंद करायचा..नकळत गळून
पडायचा..अन मी मेंबरशिप रिन्यू करून मी बाहेर यायचे..
आज मात्र संपवलं सगळं.. अतिशयोक्ती वाटेल कदाचित पण लायब्ररीतून
बाहेर पडताना भरून आलं होतं... मागे वळून एकदा त्या पुस्तकांकडे बघायचा मोह
कसाबसा आवरला मी आणि बाहेर पडले तिथून.. माझ्यातला एक खूप महत्वाचा भाग तिथेच
मागे ठेऊन.. लवकरच परतून येण्यासाठी.. कदाचित...

No comments:

Post a Comment