Friday, March 22, 2013

प्रिय मित्रा,

प्रिय मित्रा,
खरंतर लाडक्या म्हणणार होती, पण तुझ्या बाजूच्या 'तीचे' अन माझ्या बाजूच्या त्याचे वटारलेले डोळे आठवले आणि प्रिय वरच थांबले.. हो हो तुझ्या डोळ्यात दिसतेय मला उत्सुकता, आता पत्रात बित्रात वगैरे काय लिहितेय हि पोरगी? पण खरंतर तुला कळलय माझ्या मनातलं.. हे पत्र वगैरे फक्त सगळं तपासून चाचपून बघण्याचा जरिया रे .. 
हम्म.. तर कधीपासूनची ओळख आपली? बालवाडी( हो तेव्हा तेच होतं नं)? की ५वि तली रे ? बघ आता तर आठवत पण नाही.. हो पण एक आठवण मात्र ताजी आहे हं अजून.. एक नवीनच फ्याड काढलं होतं आपल्या हेड बाईंनी, काय तर म्हणे एक मुलगा आणि एक मुलगी असे एका बेंचवर बसा त्यामुळे मुलं दंगा कमी करतील( यड्च्याप इय्डीया).. अन तू आलास नं माझ्या बाजूला. आम्हा मुलीचा ग्रुप चार टोकाला चार असा विभागाला गेला त्यामुळे नाईलाजनेच तुझ्याशी बोलणं आलं.. बाईचं डोकं सोलीड हं.. खरच वर्ग काही दिवस शांत होता.. पण त्या काही दिवसात मला मात्र मित्र मिळाला.. आजवरच्या माझ्या नात्यांच्या परिभाषेत एक नवीन नातं....परीक्षा अभ्यास ह्या चक्रात कधी १०वी आली कळलंच नाही... शाळा सुटणार ह्या हूरहुरीसोबतच आता हे मित्र मैत्रिणी असे रोज भेटणार नाहीत ह्याची घालमेल जास्त होती हो नं ?...
शाळा संपली अन कोलेज आलं.. पहिल्या दिवशी तू नव्हतासच सोबत माझ्या...थोडी घाबरेली मी वर्गात शिरले अन सेनिओर्स च्या रगींग ची आयती बळी ठरले अगदी रडायला टेकले होते रे त्या प्रकाराने...अन तू दिसलास.. नव्या चेहर्यात नवा मित्र.. तुझ्यासारखाच... हायसं वाटणं म्हणे काय ते कळलं मला त्या दिवशी..इतक्या बेमालूमपणे मला सोडवलसं त्या तडाख्यातून..मानलं बोस तुला..
"नवा चेहरा, नवा तू.. तरी असा कसा रे अगदी ओळखीचा?" पहिल्याच भेटीत क्याण्टिन मध्ये मी तुला विचारलं.. तू हसलास खळखळुन, अन म्हणालास "अगं सखे, मित्राची ओळख अशी नव्याने थोडीच होते? हा आता चेहरे अनेक भेटतील पुढेही पण मी सोबत असणारच" .. हम्म. तेही खरच म्हणा...तो बराच काही बोलत होता मी मात्र त्या सखीमधेच घुटमळलेली .. नाळ इथेही जोडली होतीच म्हणायची..
हो ..हा हा म्हणता तेही वळण आलाच आपल्या नात्याला... प्रेम.. कोलेज मध्ये अवतीभवती इतक्या जोड्या बघत होती न कि वाटायचं माझ्यापण प्रेमात पडावं की कोणी.. तुला सांगितलं नाही कधी पण मला नं तो आवडायचा.... त्यानेपण माझ्या प्रेमात पडावं म्हणुन काय काय केलं रे मी.. आता हसायला येतं पण तेव्हा तुझा राग यायचा तुला काहीच कसं कळत नाही म्हणुन.. कित्येक दिवस आपण बोललोच नव्हतो रे तेव्हा... मग माझी चिडचिड, त्रागा, अन हा राग काढायचा तरी कोणावर? तू तर नव्हतासच.. अन
अन तेव्हाच माझी ती अगदी खास मैत्रीण ( हो खासच.. हसू नकोस असा) मला म्हणाली अग तू त्याच्याच प्रेमात पडली आहेस.. म्हणजे तुझ्या हं.. काहितरीच काय ? अस्सं डोकं सट्कलं होतं नं.. उगाच आपलं तिला लेक्चर दिलं दोस्ती दोस्ती होती है असं काही नाही आमच्यात.. ब्ला ब्ला ब्ला.. पण खरं सांगायचं तर दोन मिनिट्स मीपण चरकलेच.. खरचं प्रेमात बिमात तर नाही नं पडले तुझ्या.. अन नेमका त्यादिवशी संध्याकाळी तू घरी आलास देवदास बनून..तुझा पडलेला चेहरा अन मी हसतेय वेड्यासारखी .. तुला सांगितलं होतं तरी तू आपला तिच्या मागे.... हसू नाहीतर काय करू.. दुपारचं भूत एव्हाना उतरलं होतंच .. त्यामुळे माझं हसू दाबत कसबसं तुला हसतं केलं.. गंमतच होती रे ती एकुण.. तुझ्या पहिल्या प्रेमभंगाची ( अजूनही हसू येतंय मला)... प्रेमबीम करण्या इतपत मोठे झालो होतो म्हणजे आपण.. मजाच आहे रे..
बघता बघता कोलेज संपलं, नोकर्या लागल्या.. भेटणं कमीच होत गेलं हळुहळु .... हो पण गरजेच्या वेळी हक्काची हाक मात्र तुलाच मारली नेहमी.. घरी लग्नाचे विषय व्हायला लागले.... त्यातूनच हा माझा नवरा निवडला.. कसली धाक धुक होती मनात.. तुझं मत घ्यावं तर तू तिकडे परदेशात.. (तेही गरजेचं होतं म्हणा).. पण तरी मला तू तेव्हा हवा होतास रे.. लग्नात आलास म्हणा अन ह्यांच्या सोबतच्या पहिल्याच भेटीत मला कानात सांगितलास.. सखे सुखी राहा बाळा.. नातं किती चटकन बदललंस रे.. अख्ख्या लग्नात राबराब राब्लास ... अन त्यानंतर मात्र माझ्या संसारतुन अलगद बाजूला झालास( असं तुलाच वाटायचं हं.. कारण आमच्या पहिल्याच भेटीत मी ह्यांना अट घातली होती तुझ्या मैत्रीची.. ) दिवस सरले .. तुही घरवाला झाला .. तुझी तीही तशी छान आहे रे.. स्वीकारलं मला सहज तुझी मैत्रीण म्हणून... गुरफटलो एकंदरीतच ह्या सगळ्या व्यापात..
आता उत्तरार्धात मात्र तुझी वरचेव?र आठवण येते रे ... तुला फोन करून न बोलताच ठेवून देते ते ह्यामुळेच...तुला कळतयं नं रे... तशी सुखी आहे रे मी ... नवरा अगदी लाखांत एक .. सगळे लाड पुरवतो , मुलं हुशार आणि गुणी ( मोठा यु.एस. ला असतो म्हट्लं)... माझा जोब, माझं घर, माझे लोकं .. ह्या सगळ्या माझेपणात छान रमलेय.. पण.. हम्म "हा पण मोठा वाईट गं वेडाबाई, नसतं ह्यात गुंतायचं" हेच म्हणालास नं आत्ता मनातल्या मनात ?..नाही रे सुटत हा पण.. सगळं असुनही नेमकं हरवल्याची जाणीव होतेय.. असं सुख चारही बाजूंनी ओसंडुन आलं नं की श्वास गुदमरतोय माझा ..तुझं होतं का रे असं कधी ? सुखाची अलर्जी झालेय का रे मला? भिती वाटतेय मला.. तुलातरी कळतेय नं रे ही भिती? ..कारण काळ सरकला ,चेहरे बदलले, तसा प्रत्येक वळणावर तू नव्या रुपात भेटतच आलास मला ..त्याच नात्याने.. मित्राच्या नात्याने .. कधी आधाराला, तरी कधी सावरण्याला तुझी सोबत होतीच... हक्काची सोबत...हो नं?
बघ असं होतं हल्ली माझं ..आपलीच रडकी कहाणी सांगत बसली.. तू कसा आहेस?, घरी कसे आहेत विचारलं पण नाही.. रागावणार नसशील तर अजून एक विचारू? जितका सहज तू मित्र झालास तशी मी तुझी मैत्रीण झाली का रे? इतका सगळा फाफट्पसारा लिहिला.. हा सल लिहायला मात्र तळ गाठावा लागला..

तशी उत्तराची घाई नाही.. अपेक्षा तर नाहीच नाही.. पण तरी.. वाट बघतेय..तुझ्या हाकेची

तुझी सखी..

No comments:

Post a Comment