लाल पिवळ्या भिंतींची ,
थेंब थेंब गळत्या छपरांची
चिंब ओल्या शेंबड्या पोरांची
अन कातावलेल्या आयांची
.
.
अस्वस्थ चिखल वस्ती....
एका रात्रीत उगवणारी
दुसर्या रात्रीत विझणारी
अन तरी सवयीचीच भासणारी
जुन्या जाणत्या रस्त्यांवरची
.
.
.पावसाळी वस्ती...
भर पावसाळी पहाटे
निद्रीस्त रस्त्याच्या कडेला तेव्ह्ढी जाग
दाराशीच निर्धास्त पहुडलेली
कळकटल्या चेहर्यावरची गोंडस 'निरागसता'
काळ्याकुट्ट आभाळाला छेदत जाणारी
खरपुस खमंग धुरांची 'वलयं'
उगवत्या दिवसाच्या चिंतेने
तारटावलेले लाल डोळे आणि..
आणि तीन आडोश्यात
स्वत:ला लपवणारी तरी डोकावणारी लाज
.
.
.....अन....
.....अन...
नेमकं निरागसता, धूर, चिंता टाळत
फक्त ह्या लाजेच्या शोधात
रस्त्याच्या 'त्या' टोकावरची
हपापलेली वस्ती.....ह्म्म....सभ्य वस्ती...
No comments:
Post a Comment