Friday, May 4, 2012

.निकाल दिन

१ मे... महाराष्ट्र दिन... कामगार दिन.. माझ्यासाठी मात्र अजून एक खास आठवण..निकाल दिन... शाळेत असताना परीक्षा संपली कि आम्ही उंडारायला मोकळे... भर उन्हात खेळायचं, आंब्याचा रस, मलई कुल्फी , सापशिडी, अस काय काय आठवत उन्हाळ्याची सुट्टी म्हटल कि... ह्या सगळ्यात भीती फक्त निकालाची...रोज १० वाजेपर्यंत लोळत पडलेलो आम्ही निकालाच्या दिवशी मात्र पहाटेपासूनच जागे... मनातल्या मनात देवाचा धावा..रात्री स्वप्नातदिसलेले आपलेच सोडवलेले पेपर.. गेल्या पूर्ण सुट्टीत साध्या विशायांचे नावही विसरले असताना , स्वप्नात हे दिसतच कस हे आजही न उमगलेलं... रोज आईचा ओरडा खाईपर्यंत जागचे न हलणारे आम्ही आजच्या दिवशी मात्र गपगुमान शाळेत जायची तयारी करायचो.. आणि मग आईच्या डोळ्यातली काळजी आणि बाबांच्या नजरेतली जरब चुकवत आमची स्वारी शक्य तितक्या लवकर शाळेत हजर... आज एकाच दिवशी शाळेतल चित्र पालटलेल असायचं... तमाम मुल शांत, बडबड न करता गप्प .... अन तमाम शिक्षक.. मस्तीच्या मूडमध्ये... अब आया उंट पहाड के निचे....असा काहीसा मिश्कील भाव...प्रार्थना, रांगा, मोठ्या बाईंच भाषण ( उपदेश)..ह्या सगळ्या सोपस्कारानंतर निकाल.... पास नापास.. एका मार्काची चढाओढ ..काही आनंदी तर काही पडलेले चेहरे... पण एकूणच सुटकेचा निश्वास.. आणि मनात चाहूल पुढच्या वर्गाची...
इतकी वर्ष लोटली... पण अजूनही निकाल पाठ सोडत नाही....प्रश्न निराळे... उत्तर वेगळी... शाळा कधीच सुटली ... हुरहुरत्या मनात निकालाची वाट मात्र अजूनही...

Saturday, March 24, 2012

जागतिक महिला दिन

राहुन राहुन आज एक विचार मनात येतोय.. जागतिक महिला दिन.. वर्षभर ज्या स्त्रीला अबला,दुय्यम म्हणुन वागवायचं आज एक दिवस तिचं गुणगान.. आणि हा एक दिवस तरी कोणासाठी हो..फक्त् तुमच्या आमच्या सारख्या उच्च मध्यम वर्गातल्या महिलांचा.. कारण हातावर पोट असणार्या मजुर बायकांना असले थेरं परवडणारे नाहीत आणि गडगंज श्रीमंत बायकांना असल्या दिवसांचं सोयरसुतक नाही... आणि आपण तरी काय असं करतो खास? बाप,भाउ,नवरा, मित्र ह्यांच्या आजचा दिवस मिळणार्या कौतुकाच्या नजरा झेलायच्या.. जरा आजचा दिवस तुमचा म्हणत सेल च्या नावाखाली शोपिंग करायची... आणि..आणि अजुन काय? काहीच नाही.. तुम्ही म्हणाल एक मुलगी असुन असं का बोलतेय? आणि तु असं काय गं वेगळं करते? तर खरच सांगते मीपण तुमच्यातलीच एक.. पण आज सकाळी ताईच्या एक मेसेजने विचार करायला भाग पाडलं...खरच जरा विसावुयात आपण सगळ्याजणी ह्या वळणावर... वर्षभर नुसती धावपळ असतेच नं मागे मग आज थोडावेळ माझा. माझ्या हक्काचा..काय करायचं आजच्या दिवसात? अगदी जे मनात येईल ते.. एखादी राहुन गेलेली गोष्ट... अर्धवट राहिलेली आवड..गप्पा-टप्पा स्वतःच्याच स्वतःशी..करुयात आजपासुन एक नवी सुरुवात...जसं जमेल तसं पण नियमितपणे आपला आपल्यासाठीचा वेळ काढण्याची सुरुवात... तसा एक क्षणही पुरेसा असतो नं गं सखे आपल्याला आपला हक्काचा? जरा सारुयात आपला आपणच हा कोश..आणि डोकाउ जरा ह्या जगात.. कोण जाणे आपल्यातच लपल्या असतील कित्येक लता, कल्पना, आणि अश्या कित्येक... कोणाला दाखवुन देण्यासाठी नाही गं काही.. हे सगळं फक्त माझं माझ्यासाठी... मग कराल नं एवढं? द्याल नं दुसर्यांना झोकलेल्या आयुश्यातला फक्त एक क्षण स्वतःच्या विसाव्यासाठी? 

आभाळ

माझ्या गावातलं हे स्वच्छ मोकळं आभाळ..असंख्य तार्यांनी गच्च भरलेलं ..टिमटिमणारे..लुकलुकणारे... काही आपल्याच मस्तीत आपल्याच तेजाने चमकणारे.. अन् काही ह्या मस्तवाल तार्यांच्या खाली मिणमिणणारे... पण मला मात्र हे सगळे सारखेच वाटतात.. हे सगळे तारे नं बोलत असतात आपल्याशी..त्यांचं हे लुकलुकणं काहितरी सांगत असतं आपल्याला..काहीतरी खास..मनातलं..जरा कान देउन ऐकलं नं की कळतात त्यांच्या कथा..त्यांच्या व्यथा...ह्या एकाकी रात्री ज्यांना खायला उठतात त्यांनी बोलावं ह्या चांदण्यांशी..ह्या खुळ्या ऐकत्तात सगळ्यांची गार्हाणी ..आणि देतात साथ ह्या रात्रीला..बघा जमलं तर..एका रात्री तरी ह्या वेड्या चांदण्यांशी बोलुन बघा..खुप् खुप् मोकळं वाटतं..त्या खुल्या आभाळासारखं.. 

Friday, March 2, 2012

असचं काहीसं..

आयुष्याकडे बघण्याचा अन्गल जरा बदलला की आपणच आपल्यासाठी आखलेल्या जगण्याच्या चौकटीसुध्दा खरच बदलतात का? कदाचित फ़क्त हे कोन बदलतात.. चौकट काही सुटत नाही.. बंधनं झुगारण्याच्या नादात उलट कधीतरी  मुक्त होण्यापेक्षा घुसमटच वाढते.कोणी म्हणतं जगणं हे चौकट नसुन वर्तुळ आहे पण त्या वर्तुळालाही अर्थ तेव्हाच जेव्हा त्याचा केंद्रबिंदु स्थिर असतो.. इथे तर नेमकं तेच हरवलयं..परिघ तरी कसा  शोधायचं मग? कधीतरी वाटतं की ह्या सगळ्याचाही काही अंत असेलच.. एकदा भरारी घेतली की क्षितीजपर्यंतचं अवघं मोकळ आकाश माझच.. पण क्षितीज काय किंवा आकाश काय..दोन्ही आभासीच नं.. खोट्या गोष्टींचा खर्या जगण्याला दिलासा कसा मिळेल? आपल्याही नकळत लहानपणापासुन आपण बांधत असतो स्वतःचं मीपण एका चौकटीत... आणि मोठं होता होता विसरत जातो त्या चौकटीचे नियम.. मग अशा एखाद्या वळणावर ही चौकट टोचायला लागते.. मनाला दिसतं ते शुन्याचं रिंगणं.. पण म्हणुन चौकट मोडायचीच का?इतकं साधंसोपं असतं का गं सगळं? चौकट काय किंवा वर्तुळ काय... सीमारेषा आल्याच नं.. त्याच झुगारायचा प्रयत्न असतो..आणि शेवटी जर एक चौकट तोडताना दुसर्या चौकटीत अडकणार असु तर पहिली काय वाईट? आता फक्त त्या आभाळाचीही चौकट व्ह्ययला नको म्हणजे मिळवलं..किती प्रश्न  ह्या सार्या अनुत्तरीत प्रश्नांची कधीतरी सुंदर वीण होईल.. कदाचित कधीतरी आपलंच आपल्याला हसु येईल.. पण आत्ताचं काय? पण आत्ताचं काय?नुसतं लढत राहायचं? तसं लढण्याला ना नाहीच माझी.. पण श्वासाचीही उसंत नको का ? कारण इथे जो तो शर्यतीत जगण्याच्या... जरा थांबुन जगण्याचा आनंद घ्यायचाही हक्क नाहि का? मला तर वाटतय.. कदाचित ह्या शर्यती जिंकण्याच्या नादात ध्येयही आपल्याला कळणार नाही... कदाचित ते कधिच गाठलं असेलही..एकदा क्षणभर थांबुन मागे वळुन बघायला हवं..भुतकाळात डोकावलं की मला कधी कधी हेवा वाटतो.. त्या प्रत्येक बर्या-वाईट क्षणांचा... कारण त्या हरेक क्षणाची भली-बुरी का होईना पण एक आठवण असते.. आणि असं भुतकाळात रमताना अचानक जाणवतं.. अरेच्चा हा आजचा क्षणही उद्याचा भुतकाळच की.. ह्या नुकत्याच जन्मलेल्या क्षणाचीही एक ताजी आठवण आपल्याही नकळत आपण बनवतोच नं... त्या नुसत्या विचारानेही नवा जोम येतो.. आणि मनं उत्साहानं नव्या आठवणी जमवायला सुरु करतं.. उद्याच्या भुतकाळासाठी वर्तमानाच्या आठवणी बनवणंच तर उरतं नं आपल्या हाती?

Saturday, February 25, 2012

हळवेपण

आताशा हे हळवेपण वरचेवरच छळायला लागलय...काही काळ-वेळ न बघाता मन उगाच अस्वस्थ..नकोनकोशी ती हुरहुर...आणि मग निर्णयाची ओढ..की शोध रे शेवटाचा? हे असं काही झालं नं की माझ्याही नकळत ओलावतात डोळ्यांच्या कडा..आणि फुरफुरणारं नाकं.. अगदीच रडायला वैगरे नाही रे येत तसं.. पण दिवसभर हा पाठलाग चुकवला तरी रात्री उशी भिजतेच...जराशीच हं...कारणांचा शोध अजुनही चालुच आहे..हो आणि आरोप-प्रत्यारोपांचा खेळही..पण कसं कोण जाणे  ही वेडी संध्याकाळ उतरायला लागली नं की मलाच कळत जातं हा शोध...हा खेळ.. काही खरा नाही..खरंच काही असेल तर ते असतं फक्त एकटेपण..भरल्या घरातलं..गर्दीतलं..माझ्यातल्या मलाच खाणारं हे एकटेपण..हे एकटेपणही मोठं विचित्र रे..एकटं मुळी येताच येत नाही ह्याला...सोबतीला असतात असंख्य आठवणी, तुझ्या-माझ्या क्षणांच्या,विसरलेल्या त्या अलवार स्पर्शांच्या,अन् कधी कधी तर न बोललेल्या त्या मुक्या अबोल्याच्याही...आतापर्यंत सावरलेला हा खोटा खोटा मनाचा डोलारा कोसळतोच रे मग..अन् मग अवचित कधीतरी बांध फुटतो मनाचा..चढ्त्या रात्री मग उशाला असतो एकाकी चंद्र..चांदण्या रात्रीतही एकटा..अगदी आपल्यासारखा..की फक्त माझ्यासारखा... तुझा शोध तर अजुनही चालुच नं रे... जाउ दे कशाला पुन्हा तेच वाद..तेच प्रश्न...उत्तरं नसलेली..तसेही  आताशा तुझे प्रश्नच बदलले सगळे.. तरी एक शेवट्चं... आजकाल हा हळवेपणा तुलाही छळतो का रे?

Thursday, February 16, 2012

मनाचा खेळ

कधी कधी आपण स्वतःबद्दलच अनेक भ्रामक कल्पना करुन घेतो. मी सुंदर्, मी गुणी ते अगदी मी स्वर्थी, मी वाईटही.. अश्या टोकाच्या विचारांनी खरतर आपण आपल्यालाच गोंजारत असतो. आणि त्यला नेत असतो एका वेगळ्या जगात तेपण अगदी दुसर्या टोकाच्या जगात...खरतर काय् मिळतं ह्या सगळ्यातुन? मुळात मनाला असं फसवायचं का? कदाचित सतत समोर येणार्या प्रश्नांमधुन तेव्ढीच उसंत..पण ही खरच विश्रांती असते का? की असतो एक थांबा विरंगुळ्याचा पुढच्या अनेक संकटांना तोंड द्यायला ताकद आजमावायचा थांबा... म्हणजे आतापर्यंतचे सगळे प्रश्न संपले असं नाही नं होत.. मग त्या अनुत्तरीत प्रश्नांचं काय?मनाला असं भुलवुन प्रश्न थोडीच संपतात न त्यांची उकल होते... हे सगळं राहतच मनाच्या तळाशी नेहमी साचलेल्या चिवट शेवाळा सारखं.. आजही मागे वळुन पाहिलं तर दिसतो विविधरंगांनी नटलेला भुतकाळ.... काळा रंग अगदीच नावाला बाकी सगळ कसं रंगबेरंगी..स्वतःच्याच मस्तीत रमलेला भुतकाळ..आणि समोर बघितलं की दिसतो मिट्ट् काळोखाचा भविष्यकाळ..वर्तमानात इतकं झटुनही भविष्य इतकं अंधारं कसं..पुन्हा प्रश्नच... सगळा गुंता होत जातो..ह्या समाजाचा, ह्या माणसांच्या गर्दिचा, ह्या प्रश्नांचा अन त्यांच्या न् सापडलेल्या उत्तरांचाही.. मग ह्या अशा आड्वळणावर थकतच मन् ..तसे त्याला मिळतात अनेक संकेत..भविष्याचे..भुतकाळाशी जोडलेल्या वर्तमानाचे आणि मग सुरु होतो पुन्हा खेळ ह्या संकेताचा पाठलागचा अन त्यातच ह्या वेड्या मनाला गोंजारण्याचा....
कधी कधी आपण स्वतःबद्दलच अनेक भ्रामक कल्पना करुन घेतो. मी सुंदर्, मी गुणी ते अगदी मी स्वर्थी, मी वाईटही.. अश्या टोकाच्या विचारांनी खरतर आपण आपल्यालाच गोंजारत असतो. आणि त्यला नेत असतो एका वेगळ्या जगात तेपण अगदी दुसर्या टोकाच्या जगात...खरतर काय् मिळतं ह्या सगळ्यातुन? मुळात मनाला असं फसवायचं का? कदाचित सतत समोर येणार्या प्रश्नांमधुन तेव्ढीच उसंत..पण ही खरच विश्रांती असते का? की असतो एक थांबा विरंगुळ्याचा पुढच्या अनेक संकटांना तोंड द्यायला ताकद आजमावायचा थांबा... म्हणजे आतापर्यंतचे सगळे प्रश्न संपले असं नाही नं होत.. मग त्या अनुत्तरीत प्रश्नांचं काय?मनाला असं भुलवुन प्रश्न थोडीच संपतात न त्यांची उकल होते... हे सगळं राहतच मनाच्या तळाशी नेहमी साचलेल्या चिवट शेवाळा सारखं.. आजही मागे वळुन पाहिलं तर दिसतो विविधरंगांनी नटलेला भुतकाळ.... काळा रंग अगदीच नावाला बाकी सगळ कसं रंगबेरंगी..स्वतःच्याच मस्तीत रमलेला भुतकाळ..आणि समोर बघितलं की दिसतो मिट्ट् काळोखाचा भविष्यकाळ..वर्तमानात इतकं झटुनही भविष्य इतकं अंधारं कसं..पुन्हा प्रश्नच... सगळा गुंता होत जातो..ह्या समाजाचा, ह्या माणसांच्या गर्दिचा, ह्या प्रश्नांचा अन त्यांच्या न् सापडलेल्या उत्तरांचाही.. मग ह्या अशा आड्वळणावर थकतच मन् ..तसे त्याला मिळतात अनेक संकेत..भविष्याचे..भुतकाळाशी जोडलेल्या वर्तमानाचे आणि मग सुरु होतो पुन्हा खेळ ह्या संकेताचा पाठलागचा अन त्यातच ह्या वेड्या मनाला गोंजारण्याचा....