Monday, May 2, 2016

तुळशीबाग

दिवाळी.. दिवाळी म्हटलं कि शॉपिंग आलीच अन पुण्यात शॉपिंग म्हटलं कि तुळशीबाग अतिआवश्यक.. नाही नाही म्हणजे अगदीच तसं काही नाही पण ते म्हणतात नं प्रथा परंपरा.. म्हणून आपलं तुळशीबाग कंपल्सरी.. 
तर तुळशीबाग म्हटलं कि (अतिउत्साही) बायका.. बायकांचा समुद्र म्हटलं तरी चालेल (मला एक शंका आहे, सकाळी ९.०० वाजताही इथे भरगच्च( ए नो चुकीचा अर्थ) बायका अन रात्री १०.०० वाजताही तितक्याच?? बायका बदलत्या असतात नं कि त्याच ठाण मांडून बसतात?? त्यांची सततची बडबड.. धक्काबुक्की.. घामट वास (त्यात एखादा मोगरा किंवा जुई वैगरे पण असतोच हा).. अन चेहऱ्यावर अजि म्या ब्रम्ह पहिला असा भाव..हे घेऊ का ते घेऊ ( खरंतर इतकं नवीन तिथे काहीच नसतं).. भावावरून आठवलं , ह्या (मुरलेल्या) बायकांचा तुळशीबाग म्हणजे हक्काचा भाव/घासाघीस करण्याचा अड्डा !
मनसोक्त खरेदी करणाऱ्या अन तरी कधीच तृप्त नसलेल्या ह्या बायकांच्या गर्दीत सगळ्यात दुर्लक्षित अन उपेक्षित जीव कोण असतो माहितेय? अहो ह्या बायकांसोबत असलेले पुरुष सदस्य (नवरा,बॉय फ्रेंड, मित्र, भाऊ कोणीही असला तरी तुळशीबागेत हमालच ) सुरुवातीला ह्या गर्दीत आशाळभूत नजरेने 'विंडो शॉपिंग' करणारा हा सदस्य थोड्यावेळातच मात्र दीनवाणा दिसायला लागतो.
मुळात आमच्या तुळशीबागेची रचनाच मुळी चक्रव्युह.. एकदा आत शिरलं कि पूर्ण फिरुनच बाहेर पडायचं अन ह्यात आमचे पुरुष पडले नेमके अभिमन्यु.. ज्या आईच्या गर्भात इथून बाहेर पडायचा मार्ग शिकायचा तीच ह्या मायाजालात रमलेली.. सुरुवातीला चारही बाजूंनी होणारे सुख स्पर्श झेलत तरंगत मध्यावर तर पोहोचतात ते पण तिथे पोहोचल्यावर मात्र गलितगात्र होतात हो ते .. तुळशीबागेतली ती छोटी छोटी दुकानं.. आत असंख्य बायकांची अखंड गर्दी..त्यात दुकानाच्या पायरीवर हा उभा.. एका हातात झोपलेलं मुल दुसऱ्यात पाणी bottol अन दोन पायांच्या मध्ये खरेदीच्या पिशव्या असा तोल सांभाळत हसतमुख चेहऱ्याने उभा... आता मला सांगा अशा परिस्थिती, दुकानातल्या गर्दीत कोपर्यातून हात उंचावून "अहो ,कोणतं कानातलं छान दिसतंय?" असं विचारणाऱ्या बायकोला काय म्हणावं? किंवा नेमक्या त्याच वेळी खांद्यावरच्या बाळाने आई म्हणून भोकाड पसरण्याला योगायोग म्हणावा का? आणि ह्यावर कडी का काय म्हणून पुन्हा त्या गर्दीतून विजयी मुद्रेने येणाऱ्या बायकोने आवडलेलं सगळेच कानातले आणल्यावर नवऱ्याकडून " बघू गं.. खूप सुंदर आहेत हं? " अशी अपेक्षा करावी?( अरेरे!!!! वाईट वाटतं हो )
हा झाला एक प्रकार , पुढची catagory तर अजून भन्नाट.. हाय क्लास, वेल mannerd पण वाट चुकलेली पब्लिक.. हि जमात कशी ओळखावी...तर शोर्ट pant , तसलाच मळका टी, डोक्याला बंधाना, डोळ्याला branded गोगल, पाठीवर स्याक अन डोळ्यात कमालीचे आश्चर्य चकित भाव हि ह्यांची लक्षणं ...मुळात इतक्या कमी किमतीत इतकं सगळं मिळतं ह्यावरच ह्यांचा विश्वास नाही अन म्हणून प्रत्येक वस्तूकडे बॉम्ब असावा अशा संशयित नजरेने बघणारी हि जमात..दुकानात कमी अन ज्यूस च्या दुकानासोमोर जास्त आढळणारी ..पण मूळ स्वभाव इथेही कायमच हा... मुलींना इतक्या स्वस्त भावाची सवय नाही अन तिच्यासोबतच्या मित्राला तिची काळजी करण्यावाचून काही सुचत नाही."baby have some water " पासून सुरु झालेली त्याची गाडी " बेबी, you ok ? its so crowdy here , lets go na " वर कधी जाते त्याचं त्यालाही कळत नाही..
मॉल मधल्या चकचकीत मुलींची सवय असलेला तो त्याच्याही नकळत तुळशीबागेतल्या घामट सुंदरींना बघून न बघितल्यासारखा करायला लागतो.. आणि तरी रस्त्यावरच्या गाड्यातून कानातली गळ्यातली घेताना रमलेली ती बघून त्याचं आश्चर्य काही लपत नाही... एलिअन सारखा काहीतरी भाव घेत पूर्ण वेळ त्या गर्दीत फिरणारा हा प्राणी तिथून बाहेर निघताना मात्र त्यातलाच एक होऊन निघतो.. हो न? अहो हीच तर खासियत आमची. आमच्या तुळशीबागची.. इथे मिळणाऱ्या वस्तू इतर कुठे मिळत नाही असं काही नाही पण इथे मिळणारा अनुभव मात्र दरवेळी नवा असतो..
सणासुदीचा साज लेऊन सजलेली तुळशीबाग म्हणजे साक्षात लक्ष्मीच.. कोणी कितीही नावं ठेवो ह्या गर्दीला पण हि गर्दी म्हणजे चैतन्य असते.. त्या शहराचं.. हो नं? निदान ते अनुभवायला तरी येतंय नं यंदा तुळशीबागेत ?

No comments:

Post a Comment