Monday, May 2, 2016

अशी एक टळटळीत निवांत दुपार.. काम नसलेली..रिकामी..एखादा बस स्टोप बघायचा.. सहसा गर्दी नसलेला..आणि बसायचं तिथे...दांड्याला रेलून..समोरचा तुरळक गर्दीचा रस्ता न्याहाळत..रस्त्यापल्याड्च्या इराणी हॉटेलचा दुष्ट सुस्त मालक.. पोर्यांवर ओरडणारा...त्यापल्याड कोलेजची एक दोन जोडपी.. एकमेकात गुंग.. कोपर्यावरून वळणारी हिशोब करून घरी निघालेली भाजीवाली मावशी.. पोरांना घरी ठेऊन शोप्पिंग ला निघालेल्या टापटीप तयार गृहिणी.. एक न दोन...तुरळक गर्दीतली नमुनेदार लोकं..मजा असते रे त्यांना असं एका कडेने बघणं.. अरे हो त्यात तुझ्यासारखाही असतो बरं एखादा...एक मिटिंग आटोपून दुसर्या मीटिंग साठी पळणारा...पण मधल्या वेळात .. "च्यामारी, आता पुन्हा तो गर्दीचा प्रवास "म्हणत वैतागत टपरीवर एक कटिंग मारणारा...एखाद्या टकाटक आजी असतात भजनी मंडळाला जाणार्या..रस्त्याच्या कडेने पुटपुटत पण लगबगीनी पावलं उचलणाऱ्या.. तरतरीत आजी.. आणि एक आजोबा पण.. आजीपाठोपाठ घराबाहेर पडलेले.. निवांत..आपल्यासारखेच.. तेही त्या बस स्टोप वर येतात..सहज बाजूला येउन बसतात आपल्या .. "काय रे पोरांनो, काही काम धाम नाही का ?"अस दटावून विचारणारे.. पण खरतरं आयुष्यभर जोब केला असतो नं त्यांनी ..या मोकळ्या दुपारची लज्जत त्यांना नीटच कळलेली असते.. त्यामुळे आपण असे मोकळे बघून असूया वाटणारच.. आपल्या उत्तरावर मात्र जम खुश होतात हं ते "ऑफिस तर रोजच असतं हो आजोबा .. अशी निवांत दुपार अभावानेच कधीतरी मिळते.. हो नं "...इतरवेळी दहा प्रश्न विचारणारे.. शंभर चौकशा करणारे हे अनोळखी आजोबा आता मात्र गप्प तिथून निघून जातात..आपण पुन्हा तिथेच.. रस्ता न्याहाळत..एकही शब्द न बोलता अखंड बोलत असतो आपण.. सतत.. दुपारच्या भाजक्या उन्हात आपल्याशीच संवाद सुरु.. पण कशाच्या तरी सुगंधाने माझी तंद्री मात्र चाळवते.. कसला बरं हा सुगंध.. हा मोगरा.. नाही ...जाई.. नाही रे हा ताज्या गुलाबाचा...संध्याकाळी गजरे विकणाऱ्या मावशी बस स्टोपच्या मागच्या सावलीत गजरे विणत कधी आल्या कळालेलं हि नसतं नं..त्यांची ती तल्लीनता.. एकाग्रता..कामातली लय.. एकेक फुल गुंफतानाची काळजी अन गजर्याची गाठ मारताना चेहऱ्यावरचं सुख.. जगाशी काही देणं घेणं नसत त्यांना.. त्यांचं विश्व त्या फुलांमध्ये..अन आपलंहि...मनभरून फुलांचा टवटवीतपणा अन श्वासात त्यांचा गंध भरून आपण पुन्हा पूर्वरत... ताजे तवाने .. रिकाम्या दुपारची झोळी हवी तशी भरल्याच्या समाधानात

........................................................................................................................................
मधुनच आठवतं काही.. तळाचा गाळ पुन्हा ओठांवर आणणारं.. अलगद भिजते पापणी अन् ओघळतेच एखादी सर.. खरंतर तेव्हा कोणीच नको असतं ... कारणं विचारणारं ... अनामिक ओझं उतरवत हलके होत असतो आपण..हळुवार... आभाळाच्या गाण्यांचा सुर मिळावा अन् नेमका समेवर ठसा उमटावा तशी थांबते सर.. अवचित..आवर्तन पुर्ण करणारी..
.....................................................................................................................................

No comments:

Post a Comment