कागदावर लिहिण्याची सवय तशी आता तुटण्यातच जमा... हे असं लिहिताना नं मागे सुटत जाणारा प्रत्येक शब्द न शब्द गोठत जातो.. तो बदलता येत नाही.. सोबतच गोठतात त्याचे अर्थ, संदर्भ, अन त्या क्षणाच्या आठवणीसुद्धा.. हवाबंद डब्यात बंद केल्यागत.. त्यांचं ताजेपण हे असं बाहेरून दिसत असतं.. पण पुन्हा मागे जाऊन अनुभवता मात्र येत नाही..किंवा हवं तसं बदलताही येत नाही.. आहे हे असं आहे हे स्वीकारावं लागतच.. नाही म्हणायला खाडाखोड हा पर्याय आहेच म्हणा.. पण तेही ठिगळ लावण्यासारख... कितीही आपलं म्हटलं तरी उपरं... एकसंधता मोडली कि अस्वस्थता येणारच... मग ते लिखाण असो कि नातं... लय सांभाळता यायला हवी नं..
........................................................................................
काय नाकारत असतो आपण हे कधी कधी आपल्यालाच कळू नये रे..कारण ते तेवढ्यावरच थांबत नाही... आणि कारणांचा शोध असा न कळून संपत नाही... नाकारणं तेवढं आपलं आपल्यापुरता.. आपण आखलेलं... कारणांची सक्ती नसलेलं
...........................................................................................
कोरडं होत जातो रे आपण.. आपल्याही नकळत.. इतके कोरडे कि कधीकाळी आपणही भळभळायचो यावर आपलाही विश्वास बसू नये..पण म्हणून का हे असं एका रात्रीतून होतं? अचानक? नाही रे... हि सुद्धा एक प्रोसेस च.... फक्त विरुध्द दिशेने नेणारी.. कशाचाच काही न वाटण्याची प्रोसेस... कुठल्याच शब्दाला, घटनेला, ..व्यक्तीला react न होण्याची प्रोसेस... कोरडं होण्याची प्रोसेस... अरे पण हे आपण मान्य करतो का? कोडगेपणाचा मुखवटा अन हे असं आतून कोरडं होणं खूप फरक असतो रे.. आटत जातो आपण... सुरुवात अगदी एका क्षणाला अन शेवटही एका क्षणातच... प्रवास मात्र क्षणाचा नसतो न..पण खरंतर आटणं हा शब्दही चुकलाच नं रे.. कारण त्यासाठी मुळात प्रवाही असावं लागतं.. नदीसारखं.. अन आपला तर इथे डोह झालेला . तळ हरवलेला.. कि गवसलाय रे..आत्ता.. नेमका तळ .... ओल हरवलेला... कोरडा तळ...
...................................................................................................
|
Sunday, October 11, 2015
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment