Friday, December 12, 2014

आज नं हे चांदणं कुशीत घेऊन झोप... एक एक लख्ख चांदणी कुरुवाळताना तुझं तुला जाणवेल त्यांचं वेगळेपण.. आभाळात सगळ्या सारख्याच दिसतात नं रे. पण इथे मात्र एकेक चांदणी आपली ओळख नव्याने करून देणारी... प्रत्येकीची लुकलुक वेगळी अन त्यातून ती गुजगोष्टींची चढाओढ... तू गुरफट्शील ह्यात हमखास.. गालातल्या गालात हासत गंमत बघशील चांदण्यांची.. एक चांदणी मात्र जरा रुसली असेल बघ.. कोपर्यात बसून मुद्दामच डोळ्याच्या कडेने बघत असेल तुला.. तुझं लक्ष वेधायचा प्रयत्न करेल...हिरमुसेल... दुखावेल.. पण उठून तुझ्याकडे येणार नाही. नेमक्या अश्यावेळी तू मात्र ह्या राजहंसी चांदणीला तुझ्या तळहातावर स्थान दे..ओघळू दे.. बागडू दे...स्वतःच वेगळेपण तिला मिठीत नाही तर तुझ्या मुठीत मिरवू दे... अन ती अशी मग्न असताना अजून एक कर डोळ्यांच्या समोर धर तळवा तुझा अन चांदणी तुझ्या पापणीत विसावू दे..आज रात्री करशील तिच हे एक स्वप्न पूर्ण ?
...........................................................................
एका क्षणाला अचानक तू एकदम अनोळखी वाटायला लागतोस. परकेपण लपेटून कोणी एक मुखवटा आपल्याला न्याहाळ्तोय असं काहीसं. नखशिखांत थरथरते रे मी. त्या एका क्षणात माझी मीच कळते मला नव्याने. तुझ्या मदतीशिवाय भेटते स्वतःला .कोऱ्या पाटी सारखी. खरं सांगायचं तर तुझ्या डोळ्यातलं अनोळखीपण मला माझी ओळख घडवून देतं
.......................................................................
आज खूप दिवसांनी मीपण निवांत टेरेस वर होते... उन्हाची एकच तिरीप टेरेसच्या कड्याला.. हवेत आजच जाणवलेला हलका गारवा.. हवाहवासा.. आणि हातात नवंकोरं ताजं पुस्तक.. दुपारच्या जेवणाची हलकीशी सुस्ती तरी दर पानागणिक गुंतवत नेणारी लेखिकेची गोष्ट. हळूहळू आतआत सरकत जाणारा उन्हाचा पट्टाच काय तो वेळ सांगणारा.... गार पावलांना उब देणारा. एक अख्खी दुपार घरी अनुभवली. सवयच नाही नं. मस्त असते अरे हि दुपार... सुस्तावलेली... थंडावलेली...पाय पसरून निवांत पहुडलेली
....................................................................
संध्याकाळ.. दिवेलागण.... अंधार पडायला लागला कि आईची लगबग... हात पाय धुवा, साडी नीट करा, केसावरून एक हात फिरवायचा आणि आई ताजीतवानी.. आणि तिच्यासोबत अख्ख घरसुद्धा. जरा वेळातच देवघरासमोर नीट मांडी घालून आई समई उजळत असते. घरभर दिव्यांचा लख्ख प्रकाश पण ह्या समईच तेज औरच...त्या प्रकाशात धुपाची असंख्य वलयं... आभाळाकडे विरत जाणारी अन पाठोपाठ आईचा विलक्षण तेजस्वी आवाज....शुभंकरोती कल्याणं आरोग्यं धन संपदाम...
......................................................................

अंधाराची एकेक पाकळी उलगडत उमलावा असाही एक फुलपाखरू दिवस... प्रसन्नतेच्या उंबरठ्यातून नाविन्याच दान होऊ पाहणारा.. नकोनाकोश्या संदर्भातून हवेहवेसे बंध जोडणारा दिवस...
............................................
किमान स्वतःच्या आयुष्यातल्या तरी सगळ्या निर्णयांची पूर्ण जबाबदारी स्वतःला घेता आली , तर जगणं बरचसं सुरळीत होईल का गं बयो....
............................................
उगवतीच्या माथ्यावर लाल केशरी रंगपंचमीत न्हालेल्या पहाटेच्या डोळ्यात हमखास काजळ् रेघ ओढणारा सल असतो गं बयो . तिच्या गोऱ्यापान पावलांना माखलेला सोनसळी उन्हाचा रंगच सांगत असतो , सटवाइच्या रुपात तिच्या बेधुंद नाचण्याने कित्येकांची भविष्य अशीच चिरडली असतात तिने..
..............................................
साधारण ६०-७० वर्षाच्या आपल्या सरासरी आयुष्यात किमान हजारभर तरी लोकांना भेटतो नं आपण.. त्यातले शे-दोनशे आपल्याला ओळखायला लागतात किंवा आपण तरी ओळखतो.. त्या शे-दोनशे मधले किमान ५० आपले नातेवाईक असतात.. रक्ताच्या नात्याने किंवा अपरिहार्यपणे समाजाच्या चौकटीत राहण्यासाठी लादलेल्या नात्याने तरी..पण असतात ते.. वेगवेगळ्या टप्प्यावर भेटलेले..असो तर आता उरले किती? १००-१५०.. त्या उरलेल्या १००-१५० लोकांपैकी आपण खरतर सगळ्यांनाच ओळखत असतोच.. पण नातं... असतंच का? असणं गरजेचं असतंच का? 
बयो मानलेली नाती हि इथे जन्म घेत असतील का गं? हवीहवीशी.. हवी तशी customized केलेली नाती.. आपली म्हटलेली.. आपुलकीची नाती..मनापासून मनापर्यंत रुजलेली मानलेली नाती..
....................................
हक्क. बयो हे हक्क प्रकरण मोठं कठीण गं . एखाद्या गोष्टीवर, जागेवर अगदीच गेला बाजार अगदीच चुकून एखाद्या व्यक्तीवर हक्क असणं अन हाच हक्क मुद्दाम जगाला दाखवून देणं ह्यातून त्या त्या वस्तूची जागेची अन अगदी व्यक्तीचीसुद्धा किंमत ठरते. ह्या हक्काची जाणीव असणे अन तो गाजवणे. खूप फरक पडतो गं
..................................................
एकेक गाठ हळुवार उलगडत जाता मोकळं होत जावं अलवार जपलेलं स्वत्व.. तशी सुटी सुटी होत जातात माणसं... मीपणाच्या शोधात
......................................................
अनवट वाटांवरचा हा प्रवास अचानक असा मुक्कामाला पोहोचतो. हवं ते सारं असं नेमकं समोर उभं. आनंद समाधान अन जिंकल्याची विलक्षण धुंदी. मागे वळून आपण काय दिव्य पार केलंय हे बघण्याच्या मोहात पडणारा हा क्षण. खरंतर इथेच शेवट हवा नं.तृप्त क्षणाला अंत. पण नाही हि सुरुवात असते. असंख्य अस्वस्थ हुरहुरत्या क्षणांची . अरे आता पुढे काय हा प्रश्न मुक्कामाचं ठिकाण आल्या आल्याच पडलेला असतो नं. अनवट वाट पुन्हा हाक मारतेच. एका आवर्तनाच्या पूर्णतेला दुसर्याची नांदी. प्रवास अविरत सुरूच
..........................................................
बदल.. हो बदलेल हेही कधीतरी ह्या एका विचारानेच तर प्रत्येक पाउल टाकत असतोच नं आपण.. जात असतो पुढे पुढे सतत .. आपल्याही नकळत.. ओलांडत असतो एक एक वळण.. हवंसं.. नकोसं.. कधी अनवधानाने मिळतो क्षण आनंदाचा.. तर कधी ठाऊक असतो काळ दुःखाचं... तरी..तरी प्रवास सुरूच..कुठपर्यंत? आपणच बदललो आहोत नखशिखांत हे कळेपर्यंत...
हे रे नेमक्या कुठल्या वळणावर कळतं? सांगशील?
............................................................
पहाटेच्या धुक्यातून हलकं हलकं पाझरणारं शुभ्र कोवळं ऊन... पाकळी पाकळीने उमलावा दिवस तसं दाणेदार किरणातून पसरलेलं.. आखीव रेखीव ऊन....हे उन नं कुरुवळत असतं स्वप्नांना...बळ देत असतं ती स्वप्न जगायला... एकटक भिडव कधी नजर त्या उन्हाशी.. सृष्टीचा कण अन कण सामावून लाघवी हसेल बघ ते.... तेच काय ते वरदान असतं रे बाकी ग्रहणाचे शाप तर त्यालाही आहेतच....
.........................................................

Thursday, November 13, 2014

अंधाराचं साम्राज्य सुरु होण्याआधी अन् प्रकाशाचा खेळ संपल्यानंतरची उष्टावलेली वेळ.. मावळतीची.. का कोण जाणे संध्याकाळ कधी कोरी वाटत नाही.. कोणा अज्ञाताच्या पावलांचे ठसे सतत जाणवत राहातात पण दिसत मात्र नाही... तरी सुरु होतो शोध... अदृश्य पाऊलवाटेवरचा..
...........................................................
आडूनआडून जाणवणार्या आपल्याच जाणीवा कोणीतरी लख्ख करुन जाव्या अन् जुनेच आपण नव्याने स्वतःला भेटावं असं काहीसं
...............................................
स्वतःकडे नेणारा प्रवास नेहमीच इतका त्रासदायक असतो नं..परीघ वाढवण्याच्या नादात टाळलेलं इथेच असतं नं विखुरलेलं..काही सल.. काही दुखरे कोपरे नव्याने खुणावत असतात तर कधी एखादी गोड आठवण अन् एखादाच हळवा क्षण पायाशी घुटमळत असतो... तितकंसं सोपं नसतं नं हे असे बंध तोडणं... आणि चल परतीचे हे सारे दोर कापले नाहीत तरी जितकं आत आत उतरत जाऊ स्वतःमध्ये तितका गर्द काळोख वेढायला लागतोच..एका क्षणाला येउन मात्र हे सारं थांबतं.. बंद दारापुढे हे मीपण ठप्प होतं.. विचारला जातो जाब परतून येण्याचा , जगाने झिडकारण्याचा, हवेहवेसे टाळून येण्याचा... मीपणाचे मौन इथेही कायम... बंद दारापुढे हे अवघडलेलं आजही..परतीचा प्रवास दमवतो खरा...
...........................................................
एक सकाळ अशीही स्वतःमध्ये रमलेली..जुन्याच एका सुरामध्ये नव्याने रेंगाळलेली.. एक गिरकी स्वतःभोवती अलगद समेवर नेणारी अन् हळूच चोरटी एक नजर सभोवतालची तंद्री न्याहाळणारी.. खळखळून हसणार्या ह्या क्षणाला हे असं निरागसतेचं मुक्त वरदान...प्रसन्नतेच्या काठावरची ही एक लाडावलेली सकाळ.. अशीही..
................................................
स्वप्नं नं काचेसारखी असतात.. स्वच्छ नितळ.. रंग भरुन बरबटवतो ते आपण... नाजूक असतात बिचारी म्हणून अंधारात दडतात.. आणि आपण मात्र त्यांना प्रकाशाकडे खेचतो.. काय तर म्हणे स्वप्नं जागवायचीत..पुर्ण करायचीत... स्वप्नांना सोसवेल तरी का रे ही फरफट.. जीवघेणी...
.................................................................
एक सुरेल नांदी सतत वाजत असते खोल खोल.. मनाच्या तळाशी..पडदा बाजूला झालेला असतो अन् हवं ते नाटक वठवण्यासाठी मुखवटाही तयार..नव्या नाटकाचे नवे चेहरे नव्या प्रेक्षकांसाठी सज्ज...नांदी मात्र तीच.. Pure..
.....................................................................
वहीमधलं जोडपान...शिवणीवरचं.. अगदी मधोमध...सहज सुटं होणारं..तसा असतो एक दिवस..सहज सुटा सुटा होणारा..मागचे पुढचे संदर्भ नसलेला तरी त्यांच्याच जातकुळीचा...ठराविक रेघोट्यांचा.. क्वचित कोरा कोरा..रंगाचे पंख लावून भिरभिरणारा.. नवे स्वप्न गोंदून घेणारा... स्वच्छंदी दिवस...
............................................................................
रात्रीच्या अंधारात पेरलेल्या गोंडस स्वप्नांचा माग काढत नव्या पाउलवाटा रेखणारी स्वप्नाळू सकाळ
..............................................................
कितीही पारदर्शी असलो तरी दरवेळी तळ गाठता येतोच असं नाही नं..तसचं असतं ओळखीचं..

इथे घरी आले नं की एक मज्जा असते.. म्हणजे पुण्याला,नागपूरला कुठेही असले नं की मी 'रुचिरा कुळकर्णी'असते.. ओळख वैगरे असते का ती माहीत नाही पण इथे यवतमाळला आली नं की मी अचानक फक्त आणि फक्त बाबांची मुलगी असते.. किमान अर्ध शहर तरी त्यांना ओळखतं आणि मला त्यांची मुलगी म्हणूनही..कुठल्याही कामासाठी, खरेदीसाठी बाहेर पडलं की ही जी ओळख देतात नं लोक.. world's best feeling असतं ते.. हीच ओळख जपायची असते नं.. आयुष्यभर लहानच असल्याची जाणीव करुन देणारी ओळख...
.................................................................
रोज नवीन अनुभव..रोज नवीन भेटीगाठी.. रोजचा दिवस तसाही नवीन असतोच नं.. तरी एखादा दिवस असाही असतो स्वतःला तपासून बघण्याचा.. एखाद्या प्रसंगाला, व्यक्तीला , अडचणीला किंवा आनंदी सोहळ्याला आपण कसं सामोरं जातो हे आपल्याही नकळत आपण तपासत असतो.. काही तर्क आपले आपणच बांधलेले आपल्याच वागण्याचे.. कधी चुकतात अडखळतात.. पण जेव्हा अगदी बरोबर येतात नं तेव्हा जग जिंकल्यासारखं वाटतं.. स्वतःवर पुन्हा स्वतःचा ताबा मिळवल्यासारखं..किंवा एखाद्या परीक्षेत पहीलं आल्यासारखं... :) :)... Some surprises are too good and life is full of them
................................................................
कुणासाठी तरी हक्काचं एक आभाळ होता यावं ह्यासारखं भाग्य नाही... निळंभोर आभाळ.. कुठेही असलीस तरी मी असेलच.. ताठ मानेने वर बघ मी आहेच हा दिलासा देणारं... जरा उदास असता पिंजारल्या ढगांचे चित्रविचित्र आकार बनवून खळखळून हसवणारं...हो कधीतरी भरुनही येणारं आणि पावसाची सोबत देत त्यात मोकळं करणारं काळंभोर आभाळ.. प्रत्येक छटा निराळी प्रत्येक अदा निराळी असणारं.. कवेत घेता न येणारं तरी मनात साठवलेलं आभाळ... हक्काचं
.................................................................
विझणं असं अचानक नसतं कधीच.. Process असते ती एक.. कधी स्वतःलाच उमगलेली तर कधी लादली गेलेली... अविरत धगधगणारं अग्निहोत्र होणं नसतंच सगळ्यांच्या नशीबी पण विझणं मात्र टळत नाही.. एक ठिणगी तशी असतेच कायम.. पेटलेली..पण प्रत्येकीचाच वणवा नाही नं होत.. प्रत्येकीचं वेगळेपण अधोरेखित करतोच हा वणवा.. हो पण हे विझणं मात्र समान पातळीवर आणतं सगळ्यांनाच.. म्हटलं नं process असते ती.. दुर्लक्ष ही सुरुवात असणारी
...................................................................
जीव लावणं... किती विचित्र असतो नं हा प्रकार.. ओळख, सवय, नातं.. एकेक टप्पा पार करत करत अलगद जीव जडण्याचा हा टप्पा कधी पार होतो कळतही नाही नं.. हे खरं pure..व्हर्जिन.. भौतिकतेच्या नियमांच्या पार गेलेलं.. स्वत्वाचीही अपेक्षा नसलेलं.. जीव लावणं..जीव गुंतणं..
.............................................................
ह्या मातकट पायवाटा नं भरकटणार्याच असतात.. चकव्यासारख्या.. मागे वळून जुन्या खुणा चाचपडाव्या तर रस्ता रेंगाळतो अन् नव्या स्वप्नांच्या गंधाचा माग ठेवावा तर हमखास चुकामुक... गंधाळल्या वाटांचे मोह तसेही बरे नाही रे.
............................................................

" आजकालच्या घरांना उंबरा का नसतो गं.. दाराशी आलेला कोणीही आगंतूक सरळ माजघरात डोकावलेला नाही आवडत मला. चार भिंतीतला गोंधळ असा जगाला दाखवू नये कोणी.." तिचे पाणीदार पण काजळरेष हरवलेले डोळे टाळत बोलत होता तो..
...........................................................
सकाळची कोवळी उन्हं नं मला एखाद्या अल्लड मुलीसारखी वाटतात.. सळसळती..उत्साही ...,दुपार होता होता मात्र उन्हं सवाष्ण होतात... तेजस्वी.. अन् मावळतीला.. मावळतीला हीच उन्हं गरत्या प्रौढेगत भासतात.. समजूतदार थकवा ल्यालेली..
पण ग्रहणकाळातली उन्हं बघितलीस तू कधी? मला नं एका वेश्येसारखी वाटतात ती.. काळ्या सुर्यबिंबाच्या आड लपलेली.. अस्पृश्य.. अख्ख्या जगाने टाळलेली तरी चोरुन बघितली जाणारी ग्रहणातली उष्टी उन्हं ...
............................................................
साखरझोपेतले अस्पष्ट भास .. अन् चाहूलींच्या जाळ्यातून अलवार बिलगलेली ती नेमकी चाहूल....इतकी की पापणीवरची थरथरही सुखावून जावी... पहाटेच्या ह्या नितळ क्षणाला अश्या असंख्य आठवणींचे गोड संदर्भ देउन जाणारा ओल्या पापणीवरचा तुझा ओला स्पर्श.. मोरपिशी स्वप्नस्पर्श...
........................................................
अगदी खोलवर रुजलेला तोच जुना सल.. जुनाच.. अजूनही तसाच ठसठसता.. खूप खूप सुखात असलं कि हि अशी काजळाची तीट होऊन जागणारा...लख्ख बोचरा सल..
.............................................................
स्तब्ध तळ्याच्या देहावर उठणार्या अलवार तरंगांसारखंही असतं एक नातं .. एका क्षणी थेट काळजात घुसणारं .. ह्या वलयांना जन्म देणार्या खड्यासारखं .. अन् दुसर्याच क्षणी हे सल शिवत पुर्वरत होणारं ... असून नसल्यासारखं क्षणभंगूर तरंगांचं नातं..
..............................................................
गच्चीवर होते.. अंधारी रात्र.. गच्चीपण त्यातच हरवलेली..माझी गच्ची..एकेक कानाकोपरा ठाउक असलेली माझी सख्खी मैत्रीण.. आणि वर..वर काळंभोर एकसंध आभाळ..नजर जाईल तिथपर्यंत त्याचा काळा रंग एकसारखा.. पण त्याला छेद द्यायला आज आभाळात अजून काही होतं हं.. फटाक्यांची रोषणाई.. रंगबेरंगी प्रकाश.. आधी आवाज अन् त्यापाठोपाठ लख्ख आभाळाचा एक तुकडा.. दिवाळीत काहीच अंधारात राहात नाही नं..
................................................
रोज..हो अगदी रोज नवनव्या प्रकाशात न्हाउन निघत असतो नं आपण.. किती ते प्रकार, किती त्यांचे रंग, हरेकाची आगळी आभा नाही का? तरी .. तरी दिवाळीच्या अंधार्या रात्री एकच पणती अशी काही उजळवते की त्याला तोड नाही..आणि गम्मत माहीतेय त्या इवल्या पणतीला कधी कळलंच नाही अरे तिने नक्की कुठे प्रकाश पेरलाय.. ह्या दिवाळीत किमान एकदा ह्या लहानशा पणतीच्या प्रकाशाने घेशील ओंजळ भरुन? अंधार कदाचित दूर जाईल..
..............................................
दिवाळी.. सण दिव्यांचा..प्रकाशाचा.. आनंदाचा.. नाव असलेल्या नात्यांचा.. नाव नसलेल्या नात्यांसाठीचा..भरभरुन जगणार्या जिवंत मनांचा उत्सव दिवाळी..
........................................
अधिकार...किंवा सोप्प्या शब्दात ताबा म्हणूयात हवं तर... तो असायला हवं खरंतर..कशावर? मनावर?त्याच्या भरकटण्यावर ,त्याच्या react होण्यावर..अन् त्याच्या असण्यावर...कारण हाच ताबा सुटणं नेहमी अडचणीत आणतं हो नं.. मला माहीतेय तु म्हणशील इतकं का ते सोप्पं आहे? पण वेड्या म्हणूनच तुला जमतंय तितकं जप म्हणतेय..नाहीतर माझी सोबत आहेच नं.. तोल सुटलेल्या किंवा भरकटलेल्या तुला सावरायला,तुझं तुपण तुझ्याच ओंजळीत द्यायला... सोबत त्यासाठीच हवी असते हो नं..
........................................................
आपल्या 'असण्याची' कारणं जेव्हा स्वतःलाच द्यावी लागतात नं खरंतर तिथेच संपतं 'मीपण'..
आपली ओळख आता एका अशा वळणावर येउन पोहोचलीय नं की , मला आपलं उगाच वाटायला लागलंय तुला ओळखायला वैगरे लागलीय मी.. तुझ्या असण्याची ,नसण्याची, हसण्याची, रुसाण्याची सवय झालीय म्हणा मला... पण सवय म्हणजे ओळख नाही नं.. माझ्या अश्या बालिश प्रश्नांची..कधी उत्तरांची.. अखंड बडबड्या झर्याची.,,बरेचदा अडखळलेल्या मौनाची (अन् त्यानंतर येणार्या हळव्या हुंकाराची)...तशी सवय तर तुलाही आहेच... पण म्हणून तुही मला ओळखतोस असं नाहीच नं वाटत तुला... मग...
हो पण ह्या वळणावरुन पुढे जाता जाता तु असशील रेंगाळता माझ्यात कायम..ही खात्री असणं एवढीच ओळख पुरेल नं..जन्मभर...
.........................................................................
जगाशी शेकडो नात्यांनी जोडलेलो असतो आपण.. स्वतःशी जोडणारा दुवा कसा रे सांधायचा.
...........................................................................
सोसवेल तेव्हढंच वेडं असावं गं बयो... निसटलेल्या एक एक क्षणाचं हसं व्हायला नाहीतरी वेळ लागत नाहीच हो नं
............................................................
असं पाठीमागून येउन तुला दचकवायचा कितीही प्रयत्न केला नं तरी कसं कोण जाणे तुला चाहूल लागायचीच आणि तुझ्या बंद पापणीवर माझा तळवा धरला की मला जाणवायची ती तुझ्या स्वप्नांची थरथर...तुला सांगू अलिकडे ह्या स्वप्नात नं मला माझा भास व्हायचा अन् त्या जाणीवेसरशी तळवा अलगद मोरपिशी व्हायचा ....तुझ्या पापण्या सोडवताना इथे माझी पापणी नकळत झुकायची अन् वेड्यागत होकारांची गुपितं बंद पापणी बोलून जायची..

नशीबाला असं पाठमोरं गाठू नकोस बयो आजी नेहमी सांगायची...ती असताना काही कळलं नाही अन् आता कळलं तर पुढचं सांगायला तु नाही
..................................................................
गर्भार रात्र वांझोटी स्वप्न रुजवून अशी वेशीवर अवघडलेली अन् दिवसाची देणी अजूनही न फेडता आलेली.... सांग कोणाचं असणं लांबवू?
................................................................
कशाची रे इतकी भीती वाटते तुला? सतत तुझ्या त्या नितळ डोळ्यात काहीतरी लपवण्याचे भाव... नाही म्हणजे काही चोरी-चपाटी नक्कीच नाही..तुझ्यासारख्या पापभीरू जीवाला ते शक्यही नाही म्हणा ..माहितेय मला ते ..पण हे काहीतरी निराळंय...म्हणजे तुझ्यात कोणी डोकावू नये म्हणून नजर चोरल्यासारखं.. तुझ्याही नकळत मिटत जातोस तू तेव्हा... इतकं कि मी तरी तुला खरच ओळखते हे मी माझं मलाच सांगु शकत नाही...सलतं रे ते... ओळख पुसली जाणं..
ऐक नं तुझे हे भीतीचे कोश वाटून घेऊयात का रे?... नव्याने ओळख होईल नं... कदाचित..
ऐकतोय नं??
...............................................................
पुन्हा रात्र.. पुन्हा प्रवास..हा प्रवास नं वाटून घेता येत नाही.. किंबहुना वाटून घ्यायचाच नसतो.. एका रेषेत जाणारे रस्ते अन् त्यावर भराकटणारे मन.. खर्या अर्थाने निवांत.. दिवासा कसं अवतीभवती भुलवणारा परीसर असतो.. रंग असतात आवाज असतात ... पण रात्री? रात्र एकसमान असते.. अंधारी.. नजर जाईल तिथवर एकसंध पसरलेली अन् म्हणूनच मनाला एकवटणारी.. खरंतर अनुभवयाची गोष्ट ही.. सांगूनही न कळणारी.. ठरवूनही वाटून घेता न येणारी... अंधाराची रात्र..
काही गाणी कधीही ऐकली कि काळजात प्रचंड उलथापालथ घडवतात.. काही ठराविक संदर्भ असावेच असा काही अट्टाहास नसतो त्यांचा तरी दरवेळी एक नवा अर्थ लागतो अन आभाळ दाटून येतं..
चिठ्ठी ना कोइ संदेस .. 
हे असच एक गाणं... काहीही न सांगता अचानक कोणी पुढे निघून जाणं अन माघारी उरलेल्याला एक ठसठसता सल देऊन जाणं.. अशक्य घुसमटायला करतं...त्याची जातानाची ती एकमेव आर्त हाक आपल्याला ऐकू कशी आली नाही.. हा जो गिल्ट असतो नं तो कसा बारा सांभाळता येत असेल आयुष्यभर... 
एक आह भरी होगी, हम ने ना सूनी होगी
जाते जाते तुम ने आवाज तो दी होगी 
हर वक्त यही हैं गम उस वक्त कहा थे हम कहा तुम चले गए
......................................................................................
स्वप्नं पाहणं कितीही सुंदर आणि हवसं वाटलं तरी बंद पापणी आडची रात्र कायमस्वरूपी नकोच नं.... गोठलेल्या स्वप्नांना वास्तवाचं भान देणारी सकाळ अशी जागं करते आताशा
..........................................................................................
पहाटेच्या ह्या नितळ प्रहरी अवचित जाग येते... आजूबाजूला निरव शांतता अन त्यातच मिसळलेले आरतीचे अस्पष्ट सूर ...हवेत एक ओलसर गंध पारिजात ल्यालेला अन त्याच्या एका झुळूकेसरशी देह नखशीकांत मोहोरलेला.. अन् त्या क्षणाची ती हवीशी लाज लेऊन अलगद कुशीवर वळणार तितक्यात जाणवलेलं तुझं अस्तित्व.. मला बिलगलेलं... त्या घटकेची निरागस शांतता तुझ्या चेहऱ्यावर दाटलेली... विस्कटलेल्या केसांच्या आडून कपाळावर एक समाधानी रेघ ओढलेली.. बंद पापणीमागे असंख्य स्वप्नांची चलबिचल अन कोण जाणे कशाने पण ओठांवर उमललेलं अस्फुट हसू... ह्या क्षणाचा तू वेगळाच असतो रे.. लख्ख आरशासारखा तरी दरवेळी नव्याने उलगडणारा... 
पहाटेच्या ह्या भारावल्या क्षणाची एकदा द्रुष्ट काढावी का रे?
...............................................................................................
नुकत्याच न्हालेल्या नितळ शुभ्र डोळ्यांच्या पाणीदार किनारी काजळाची दाट रेघ ओढताना आताशा जाणवते एक अनामिक थरथर... पापणीच्या पल्याडच्या स्वप्नांच्या गावाला कोणी काजळाची वेस घालावी तसा हुरहुरतो जीव... अन नेमकं त्याच वेळी आराश्या मधल्या माझ्याच प्रतिबिंबात मला तुझा भास होतो.... इतका जवळून असतो तो आभास कि.. एका क्षणी लक्कन चुकतो ठोका.. खोल काळजाचा.. तुला कळणारा... हो नं.. 

कित्येक दिवसांनी काल पुन्हा काजळ रेखाताना पाणावले रे मी
...............................................................................................
पौर्णिमेच्या रात्री गावाबाहेरच्या त्या रस्त्यालगतच्या माळरानी गेला आहेस का रे कधी? एकात एक गुंतत गेलेली ती सपाट जमीन चांदण्यात न्हाहून निघताना निरखून कधी पाहिलंयस ? हवेत पसरलेला हलका गारवा.. हवाहवासा.. लपेटून घेणारा अन आजूबाजूला पसरलेली ती नीरव शांतता इतकी कि तिला तडा द्यायला झाडाच्या पानांची साधी सळसळ सुद्धा नाही..अवघं वातावरण असं भारलेलं...दैवत्व लाभलेलं... ह्या अश्या माळरानी गवताळ जमिनीच्या कुशीत शिरून हे चांदण्याचं आभाळ मला एकदा तुझ्या डोळ्यात निरखायचं आहे रे..इथे भेट तू ..असाच इतकाच..नेमका

Saturday, September 27, 2014

अधमरीसी आँखोंतले पनपते अनगिनत जिंदादिल ख्वाब,,.. कुछ तो अधुरा रह गया हैं शायद है ना?
................................
ओळखीच्या पुढे पण नात्याच्या अल्याड घुटमळलेल्या एका नव्या  वळणावरचे  जुनेच आपण …. तसं तर मागे वळून पुन्हा ते अनोळखीपणा ही नकोय अन पुढे सरसावायचा धीर येईल इतका विश्वासही नाही अजून आपल्यात हो नं ….असं कसं हे  विचित्र अवघडलेपण वागवत रोज नव्याने  सामोरं जातोय नं आपण…. तरी हे वळण सरावं असं मात्र  वाटत नाहीये ….एक  मैलाचा दगड असावं असं वाटतंय हे वळण… यदाकदाचित पुढे नातं गुंफलं गेलंच नं तर पुन्हा कधीतरी मागे वळून बघताना हाताशी येणार्या काही खास क्षणांना जपून ठेवणारं हे हळवं वळण… विसावू का रे इथे… क्षणभर
.................................................
प्रवास म्हटलं की सोबत आलीच...अन् सोबत म्हटली की गुंतणं आलं..मग ह्या गुंत्याला नात्याचं नाव आलं..नातं म्हटलं की अपेक्षा आल्या..अपेक्षाभंग आला.. तुटणं आलं.. सगळा
प्रवास एकट्यानेच केला तर नाही का रे चालणार?

....................................................................
अंधार चाचपडायला लावतो अन् प्रकाश समोर उभं करतो हे "मी"पणाचे कोंदण
......................................................
स्वप्नांचं नं एक वय असतं.. कधी काही क्षणांचं तर कधी काही जन्मांचं सुद्धा.. तुला माहीतेय काही स्वप्न तर अगदी गर्भातच जीव सोडतात.. पण म्हणून स्वप्नं बघायचीच नाहीत असं तर नाही नं ?
.....................................................

किती किती ठिकाणी उसवलेलो असतो रे आपण, एकही जागा एकसंध नाही... निमित्ताला कधी एक साधा ओरखडा तर कधी एखादाच पण जीवाघेणा वार...उसवून जातो खोलवरचं सारं काही.. घट्ट आवळून जपलेलं..आपल्याही नकळत मग पाझरत जातो आपण त्या लहानमोठ्या उसवणीतून.. रिते होत जातो..कोणाला कळेल न कळेल ह्या बेताने... पण कळतंच काहींना..हे उसवणं ..पाझरणं..सावरणं.. अन् सुरु होतो अट्टाहास ह्या उसवणी झाकण्याचा ..त्याच बेढब ठिगळांनी वरवर सारं सांधायचा.. जमेल का रे?
की पुन्हा एक नवा जन्म नवा सोहळा.. उसवण्याचा.. पाझरण्याचा.. सावरण्याचा....

.......................
दोन तीरांवर दोघे आपण... तरी रोज भेटतो रे .. नाही स्वप्न वैगरे नसतं ते..तू असण्याची खात्री असते..तासंतास बोलूनही तुझ्यावर न लादलं जाण्याची..रिती होत जाते रे रोज नव्याने.. पुन्हा पुन्हा भरुन येण्यासाठी..तुला जाणवत असतं रे न सांगितलेलंही.. न घडलेलंही..आपल्या नात्याला नाव नको म्हणायचे ते याचसाठी.. निरागसता कुठल्या रे नात्यात गुंफायची.. असेच राहूया का अनामिक
.......................................
जरा निवांत झालो की एकेक बोच कशी लख्ख होत जाते...उजळून निघते... अगदी जुन्या पुराण्या संदर्भासहीत... मग आपल्याही नकळत देत जातं मन स्पष्टीकरण ,त्या प्रत्येक घावाला गोंजारण्याचं ... त्याला कुरवाळण्याचं... त्रास तर तेव्हाही होतच असतो नं , हव्याहव्याश्या संदर्भात नको ते गुंफलं जात असताना...उघडा होत असतो एकेक सल आठवणींना लगडलेला... कधी सुखावणारा,.. तर कधी....जीवघेणा...गुंतलो होतो एकमेकात तेव्हा नव्हतं का रे असं काही,..सुटी झाले अन् रिती झाले बघ अशी
..............................................
सांज, संध्याकाळ, मावळण काहीही म्हटलं तरी फारसा फरक काही पडत नाही.... उरात अनामिक हुरहुर अन् डोळ्यात खळ्ळकन पाणी हे नातं आजही बदलत नाही .... गर्भार रात्र अजूनही तशीच वांझोटी स्वप्न ओटीत रुजवून वेशीवर अवघडलेली अन् दिवसाची काही देणी आजही न फेडता आलेली....ह्या दोन्हींमधली ही मावळण टाळायला सांग नेमकं कोणाचं असणं लांबवू?
...............................................
कधीतरी अशीच गर्दीतुन चालता चालता त्याच्याशी टक्कर झाली..ओशाळं हसू देउन पावलांची नजरानजर झाली...लक्षात राहण्यासारखा चेहरा नव्हता तसा पण हो दिलखुलास हसू होतं त्याच्याकडे..ते तेव्हढं अचूक लक्षात राहीलं..त्याने जोडलेल्या प्रत्येक नात्याचा TRP असलेलं हे मनमोकळं हास्य..खरतरं तिथेच जिंकलं होतं त्याने..मैत्री व्हायला ओळख वैगरे सोपस्कार त्याच्यासाठी नव्हतेच कधी.. योगायोगाने नव्हे तर ठरवून भेटत राहीला तो..क्वचितच कारणाने.. निखळ गप्पा हेच काय ते कारण... एक दिवस तुझ्यासोबत तो आला.. तुझा मित्र म्हणून ओळख झाली..अन् माझी मैत्रीण म्हणून..सुरवातीच्या अवघडालेपणातून दोघंही गप्पच.. तू मात्र आखंड वाहता.. आम्हाला ओढलंसंच.. बघता बघता आमच्यातही जन्माला आलंच नातं.. अन् गूंतत गेलो त्यातच.. इतकं की तूझं आलगद आमच्यातून बाजूला जाणं जाणवलंही नाही.. नाही तू होतासच आजूबाजूला..नवी नाती विणत..तरी कळण्याइतपत अंतरावर... का हे असं हा प्रश्न मात्र तेव्हा पडलाच नाही.. आजतरी पडतोय का माहीत नाही...हो पण काल पुन्हा जोरदार अडखळले कोणालातरी अन् कानावर ओळखीचं काहीतरी आलं म्हणून हरखले इतकंच
....................................................................
तुला एक सांगू का? बघ हं हसशील नाहीतर ... तू बोलत असतोस नं काहीबाही... महत्वाचं.. बिनमहत्वाचं ..अगदी काहीही.. पण बोलत असतोस नं, तेंव्हाच सुचत असतं बघ मलाही काहीतरी.. सांगण्यासारखं ... न सांगण्यासरखं... अगदी काठोकाठ शिगेवर असतं मन... रितेपणाच्या ओढीत ... पण तरी तुला मात्र थांबवावंसं नाही रे वाटत...तुझा ओघ नाहीच तोडवत...अन नेमकं कसं काय कोण जाणे, 'मी' कळून तू अचानक गप्प होतोस.. अन म्हणतोस... "बोल, ऐकतोय मी.."

आपल्या नात्याला ह्यापेक्षा वेगळं कसं रे मांडायचं... तू म्हणतोस त्याला pure white पण मला मात्र रंगांचे थवे दिसतात त्यात... हरखायला होतं तिथे मला... हरवायला होतं.. कारण खात्री असते तू हरवू देणार नाही ह्याची... मनसोक्त बागडावसं वाटतं.. नाचावंसं वाटतं...गुणगुणावंसं वाटतं.. कशाचीही तमा न बाळगता जगावसं वाटतं... कारण दिल्या घेतल्या श्वासांचा हिशोब आपल्यात कधीच नाही.. तू व्हर्जिन म्हणालास नं ह्या नात्याला... ते असं समजलं मला...

एका अदृश्य अंतरावरून झोकून देतोय दोघाही सर्वस्व ह्या नात्यात.. अंतरं असली तरी सुरक्षिततेची गरज नसलेलं ... आपसूक जपलेलं... तरी एकमेकांना सावरू शकू ह्या विश्वासाचं...

नात्याचं पावित्र्य ह्या विश्वासावरच ठरतं नं रे...
.

Wednesday, September 10, 2014

अधिकार...किंवा सोप्प्या शब्दात ताबा म्हणूयात हवं तर... तो असायला हवं खरंतर..कशावर? मनावर?त्याच्या भरकटण्यावर ,त्याच्या react होण्यावर..अन् त्याच्या असण्यावर...कारण हाच ताबा सुटणं नेहमी अडचणीत आणतं हो नं.. मला माहीतेय तु म्हणशील इतकं का ते सोप्पं आहे? पण वेड्या म्हणूनच तुला जमतंय तितकं जप म्हणतेय..नाहीतर तुझी सोबत आहेच नं.. तोल सुटलेल्या किंवा भरकटलेल्या तुला सावरायला,तुझं तुपण तुझ्या ओंजळीत द्यायला... सोबत त्यासाठीच हवी असते हो नं...
...........................................................................
गुंता जुनाच रे ...अन् ठरल्यासारखं त्याचं स्थिर टोक तुझ्याच हातात..पण मी खुळ्यासारखी खेळत बसते त्या गुंत्याशी..अन् स्वतःच अडकते त्यात...तुझ्यासाठीच सोडवायचं असतं सगळं आणि तरी गुंतवायचं असतं तुला त्यात.. पण बघ नं नाहीच जमलं ते कधी..तु मात्र नेहमीच ह्या गुंत्याबाहेर..खळाळत्या झर्यासारखा..निखळ.. नितळ..प्रवाही..मग तुझा गुंता कसा होणार..काही गोष्टी कधी कळल्याच नाही नं रे मला....
.............................................................................
आठवणीत असं ठरवून नाहीच रे डोकावता येत..ठरवून आठवलं की त्याचा तपशील होतो
...............................................................................
खोल खोल तळाशी पक्क ठाउक असतं आपल्याला आपण कोण ते...आपल्या जगण्याचे नियम तिथे आपणच असतात कोरलेले..अन् इमानेइतबारे आपण ते पाळतही असतो..अगदी न चुकता..पण कुठल्यातरी एका वळणावर ह्या खोल तळाशी लक्कन काहीतरी हलतं..एक झुळूक होऊन कोणीतरी त्या तळाचा ताबा घेतं..आपल्याही नकळत..आपलेच नियम आपल्यापुरतं मग बदलत जातात..त्या झूळकेचा ताल श्वासांची लय ठरवतं..काळजाच्या ठोक्यावरही जाणवतं मग त्याचं अधिराज्य..सवयीची होत जाते ती एक एक खोलवरची जखम अन् त्यावरचा उताराही ...भिनत असतं कोणीतरी रंध्रारंध्रात..हवीहवीशी नशा जणू..ह्या धुंदीवर स्वार होउन मध्यावर येता येता मात्र काचत जातं सगळं..हव्याहव्याश्या उसास्यांचं ठेचाळणं, गुदमरणं..ठरवून टाळलं जातं मग सारं...हवसं..नकोसं..सारंच...तेव्हा कुठे हरवलेल्या त्या मीपणाची जाणीव अचानक लख्ख होत जाते..तळ गाठायची..कोष जपायची घाई होते..अन् खोडलेल्या जून्या नियमांचा खडबड्या स्पर्शावर अलगद नवे मीपण कोरले जाते.
................................................................................
लपाछपीचा खेळ तर सूरुच आहे अव्याहतपणे.. अजूनही..फक्त डाव कोणावर अन् लपतोय कोण कोणापासून हेच कळत नाहीये..की एकच आहेत रे दोघंही..नियतीकडे पाठ करुन आपल्याच नादात म्हणतोय आपण १०,२०,३०...१००..येउ का?आपल्यातच लपलेल्या मीपणाला शोधायला...अन् एका गाफील क्षणाला नियती म्हणते ये..अन् निघतो आपण शोध तसाच अर्धवट टाकून...डाव पुढच्या जन्मावर ढकलून..
...........................................................................
कितनी बार कहा हैं ऐसी बारिश में अपने सारे ख्वाब संभाल के रखा करो...किसी ऐसी जगह जहाँ वो उन्हें छू न सके...बड़ी मिन्नतों के बाद धूप ने चुना था इन्हें..बताया तो था न तुम्हें...अब भला तुम ही बताओं कौन खरीदेंगा ऐसे गिले ख्वाब...सड ही जाएगें न... हरसाल की तरहा... नई फसलों के नये ख्वाब...
.............................................................................
पावासानं कसं समुद्रावर कोसळावं..उंचच उंच डोंगरावर पडावं..दर्या खोर्यात रमावं..पण हे असं ओसाड माळरानावर? ...माळरानावरचा पाऊस अनुभवलायस का रे कधी? नजर जाईल तिथवरच्या आभाळाचं काळंपण भिनंत जाणं.. प्रत्येक सरीचं ते असोशीने कोसळणं अन् तितक्याच निकराने काळ्या कातळाने ते नाकारणं..नाही म्हणायला ४-२ चुकार थेंब झिरपतही असतील कातळाच्या रंध्रारंध्रात अन् होतही असेल जन्म आशेचा.. मृत्यू निश्चित करुन..पण हरेक कोसळत्या थेंबाचा हिशोब जेव्हा तो परतवायला लागतो नं तेव्हा पाऊसही पाणावत असेल का रे?
.........................................................................
अर्धवट असतं सगळं.. रेघोट्यांच्या नात्यांसारखं..धड गुंतताही येत नाही अन् अलगद पाय काढताही येत नाही..हवं तर असतं त्यातलं सगळंच.. प्रेम..ओढ..पण नकोसं असतं ते हवं तेव्हा हवं तिथे तत्पर असणं..
नात्याला expiry date असायला हवीशी वाटते ती ह्यासाठीच रे... निदान नातं विषारी होतं कधीहे तरी कळेल.. अन् कदाचित तसं होण्याआधी तरी गुंता सोडवायचा प्रयत्न करु..घुसमटलेला गळफास तेव्हा तरी सुटेल
......................................................................................
हातचा घ्यायचा म्हणून बाजूला ठेवलेली नाती हिशोबातून सुटलीच तर रे काय करायचं... उत्तरांची टाळाटाळ... कि प्रश्नांचा फेरविचार...
......................................................................................
पावसाळी रंगाचं भरगच्च आभाळ त्याचा हक्काचा पाउस मिरवत असतं..वरवर सारं शांत शांत...एकसंध... तरी आतून सगळंच हललेलं असतं..अगदी कुठल्याही क्षणी तुटेल आता इतकी कवाडं तटतटलेली....पण आभाळ मात्र तटस्थ..थिजलेलं.. जागच्या जागी..
किती वेळ..किती काळ..कोणास ठाउक...विरतही नाही अन् मोकळंही होत नाही हे मळभ... 

पावसाच्या डोळ्यात डोळे घालून त्याचा ठाव घेत राहीलं की हे असं होतं ... नजर लागून पाऊस मग जागीच मिटत जातो
तनहां सी एक शाम कल रात के मेले में आई थी... सहमीसी घाबरायीसी... जरासी डरी भी थी वो ... पर भला मेले में कोई खुदको कैसे रोक पाये... हा अब अरामानो कि बहोत भीड थी वहा... लेकिन वो देखो वो दूर उस सबसे उंचे झुले के सबसे आखरी मुक़ामसे कुछ परेशानियाँ भी तो झाँक रही थी.. पागल थी बेचारी ... आज नही तो कल उन्हे मिट्टी में तो मिलना ही हैं पता नही उन्हे शायद ...ठीक भी ही... उसके ठीक बगलमें में यादोकी मिठी दुकान जो थीं ... हर एक याद बडी दिलचस्पी से सजाके ..चाशनी में घोले.. इस कडवे मुंहकी मुस्कान बनती ये यादोंकी दुकान ....हाँ हाँ अब जरा संभलके...जरा आगे बधोगे तो सपने मिलेंगे... कहीं कुचल न देना उन्हें कांच के ये रंगीन ख्वाब...नहीं नहीं इन्हे यहाँ तो बेचा नही जाता... हाँ पूजा ज़रूर जाता हैं .. हर सपना यहाँ बेशक़ीमती माना जाता हैं .... इस मेले कि जान ही तो हैं ये सपने... हर और बिखरें ऐसे अनगिनत लम्हे बटोरें जब वो शाम गुजरी यहाँसे तो वो भी भूल गयी अपनी तन्हाई और सुबह कि पहली किरण का हाथ थामे पगली निकाल पड़ी ... नये ख्वाब चुनने .. बस तबसे रातका ये मेला मुस्कराने लगा हैं
......................................................................................
पावसासारखा पाऊस तरी रोज नवा नवा...स्थळाकाळाचे संदर्भ बदलले की पाउसही बदलतो हो नं...ठराविक लयीतली त्याची तीच ती रिपरिप तरी दरवेळी एक नवा सुर गवसतोच अन् निदान त्या क्षणाचा पाऊस तरी वेगळा होऊन जातो नाही का?असा पाउस सखा होणं जमेल का रे तुला ?...
.......................................................................................
जीव विसावण्याचं एक एक ठिकाण काळाच्या ओघात जसंजसं दृष्टीआड होत जातं तसंतसं नकळत insecurity वाढत जाते का रे आपल्या जिवंत असण्याची....
......................................................................................
तु मघा खिडकी म्हणालास नं तर मला माझी गच्ची आठवली..प्रत्येकाची असते नं आपआपल्या घरातली एक खास जागा..तशी ही माझी गच्ची..माझं घर म्हणजे बंगला catagory आहे त्यामुळे छान मोठ्ठ्या गच्चीचं सुख अगदी चालत आलंय.. पण लहान असताना धडपडायच्या भितीने मोठ्यांनी तिकडे जाउ दिलं नाही इतकंच..मोठं होता होता मात्र गच्ची आपली वाटायला लागली..Just college मध्ये जायला लागले तेव्हा ही खर्या अर्थाने भेटली...10 वी 12वी असल्यामुळे अभ्यास अती..अन् त्यामुळे बाहेर फिरायला जाणं व्हायचं नाही मग पावलं आपोआप गच्चीवर वळायची.. नव्याने उमजलेलं तारुण्य,नवीन college..freedom,मैत्रिणी, मित्र(?) gossip.. secrets..First crush , braek up..काय न काय इथे ह्या गच्चीशी share केलंय..कारण काय नं तर तिथे प्रत्युत्तर नसायचं ..प्रतिप्रश्नही नसायचे..खरंतर insecurityचा काळ होता तो..सुरवंटाचं फूलपाखरु होण्याचा..तो ह्या गच्चीने जपला...माझी स्वप्नं जपली..मला जपलं..त्या वयात जे कोणालाच सांगता येत नाही ते सारं ह्या गच्चीने ऐकलं..
आजही इथे घरी आली की मी काही नं काही निमित्ताने जाते गच्चीवर..तिच्या कठड्यावर हात फिरवला नं की काहीतरी जाणवतं खास... तसं तिला सांगण्यासारखं अजूनही आहेच बरंच काही..

............................................................................
रात्रीच्या मिट्ट अंधारात.. दूर दूर... गावा गावांचे सारे संदर्भ जिथे संपतात, तिथे चोरुन भेटतं म्हणे ते आभाळ ह्या जमिनीला.. कशासाठी??चांदण्यांच्या लिलावासाठी..चंद्राच्या उधारीसाठी...अन् असं बर्याच कशाकशासाठी..स्वप्न वैगरेच्याही पल्याडचं जे असतं नं बहुतेक त्यासाठी...असण्या नसण्याच्या सीमेवरचं.. शेवटी काय तर अंधाराच्या ह्या व्यवहारासाठी अवसेची एक रात्र पुन्हा एकदा गहाण.. ठरल्याप्रमाणे..,
.......................................................................................
रडणार्याला खांदा देण्याची किती घाई असते नं लोकांना... आपण स्वत: भलेही किती का हळव्या नाजूक मनाचे असो, कोणी आधार शोधायला आलं कि लगेच आपला खांदा पुढे... सवय होत जाते रे मग असं वरवरचं strong असण्याची... सगळं आहे तसं सहन करण्याची नशा चढत जाते... आपल्याही नकळत मग हे लोकांनी आपल्याकडे आधार म्हणून बघणं, आपल्याशी सगळे problem share करणं हवहवंसं वाटायला लागतं.... पण एक दिवस.. फक्त एक दिवस असाही येतोच नं, जेव्हा आपल्यालाही हवं असतं कोणीतरी...काहीतरी भयंकर उलथापालथ झाली असते तळाशी... अन सावरायला कोणीतरी हवं असतं... तेव्हा रे काय करायचं? आधारवडाचा आधार कोणी होतं का रे?

Monday, August 25, 2014

कित्येक दिवसांनंतर भरकटलेलो आपण पुन्हा आपल्या घरी परतून येतो ..घरादाराच्या पल्याडहून त्यातलं हरवलेलं घरपण शोधत फिरतो ..सगळं कसं जागच्या जागी..तुझ्या माझ्यासकट.. गोठलेल्या काळासारखं अगदी आपल्या निकट..धुळीच्या जाडच जाड थराखाली तरी जुनंच वादळ लपलं असतं ..डोळे भरुन येता अंधूक अंधूक सारं सारं आठवत राहातं.. कसं कोण जाणेआपल्याच घरात त्या क्षणी कसं उपरेपण दाटून येतं..परकेपणाच्या कुशीतून घर वाकूल्या दाखवूनजातं.. इतक्यात कुठून एक झुळूक वार्यावरती स्वार होते.. तुला स्पर्शुन माझ्यामध्ये हलके हलके विरत जाते... बाल्कनीतल्या मोगर्यापासून परसदारातल्या लिंबापर्यंत गंधांचे अवशेष पुसटसे पुन्हा नव्याने गुंफून जाते..बंद पापणीआड अखेर तेव्हा रंगते जुन्या ओळखींचे द्वंद्व...पुराव्यादाखल अन् पाझरत जातं ओल हरवलं नातं .. इथवर आलो कसं म्हणताना मन नकळत भानावर येतं.. सराईत पाऊल अन् अचानक उंबर्याला अडखळतं... निर्जीवतेचे टाकून उसासे जीव सजीवतेत गुंतत जातो..नेमक्या क्षणी शोकेस मधला जीव अलगद फडताळामध्येअडकत जातो..पडवीमध्ये ओथंबलेलं अस्तित्व मग माजघरात विसावतं..काय काय म्हणून सावरायचं असतं अन् काय काय विस्कटत जातं...थबकलेल्या पावलांवर घर जेव्हा नवा डाव मांडत जातं...ऐन सांजेला हे अर्घ्य उन्हाचं अंगणातल्या तुळशीत विरजतं जातं...खुल्या ओंजळीत खुळ्या घराचं घरपण रुजत जातं..

' ये तो एक आदतसी लग गयी थी कि , फोन की घंटी बजे और सिर्फ तुम्हारा नाम फ्लँश हो....
कीतनी ही देर तक तो बस ताकती रहती उसे ..जैसे तुम्हे ताकती रहती कभी, जैसे अभिन्न सी जुडी हु, .. . .
फोन उठाने की जल्दी तो तब भी नही थी और आज..आज भी उठाने को मन नहीं करता, ..
पर कल जब वही नाम कई अरसों बाद फोन ने पुकारा , तो झपट कर उठा लिया था फोन मैंने ..
शायद डर गयी थी, कही नींद न टूटे फिर इस आवाज से और ये सपनाही न टूट जाए ..
फोन तो उठा भी लिया पर बात?
बात तो अब भी वही ठहरी, अटकी सी थीं...
ठीक दो साँसों के बीचो बीच..
किसी अर्ध-सत्य सी।
तूम समझ तो गये थे नं ……


"कसं असतं नं प्रत्येक नात्यात नं एक जण स्थिर हवाच रे... तरच तर दुसरा त्याच्याभोवती नि:संकोच एक नातं विणू शकतो मुक्तपणे... एक comfortable अंतरावर..space म्हणूया हवं तर त्याला....केंद्रबिंदू ते परिघापर्यंतच्या त्रिज्येची space.. हि space तशी बरीच लवचिक रे पण एक क्षण येतोच असा कि जराशी ताणली किंवा सैलावली कि उसवत जातं रे नात्याचं ,वर्तुळ.... सुलगत जातो एक एक बंध... मागे उरल्या वेड्यावाकड्या नागमोडी गुंत्याला मग नातं तरी कसं रे म्हणायचं? म्हणून हवा असतो एक स्थायी कोपरा नेमकं अंतर जपणारा...." ती बोलत होती अविरत... तिच्या त्याच्या नात्यातल्या त्या अचल केंद्राशी...एका श्वासाच्या अंतरावरून...
आठवण..आठवण म्हणजे असतं तरी काय रे... घडून गेलेल्या एका क्षणात असंख्य ठोक्यांचं विनाकारण गुंतणंच ते ..भलं बुरं असं बरंच काही असतं त्यात..आठवतं मात्र जे नेमकं असतं तेच..तुला गम्मत माहीतेय, काही आठवणी नं ह्या पल्याडच्या असतात जरा वेगळ्या..काळाच्या ओघात आपण त्या विसरत असतो किंवा त्या प्रयत्नात तरी असतो..आणि एखाद्या गाफील क्षणी त्या अश्या अचानक समोर येतात...भांबावतं रे मन...अन् शरमतंसुद्धा..मग लागतं स्वतःला कोसायला..जे विसरायचं ठरवलं होतं ते विसरलोच कसं म्हणत जळत राहातं..आठवणी तर ह्याही असतातच नं आठवणीने विसरायच्या तरी आठवणीत जपलेल्या..

लपाछपीचा खेळ तर सूरुच आहे अव्याहतपणे.. अजूनही..फक्त डाव कोणावर अन् लपतोय कोण कोणापासून हेच कळत नाहीये..की एकच आहेत रे दोघंही..नियतीकडे पाठ करुन आपल्याच नादात म्हणतोय आपण १०,२०,३०...१००..येउ का?आपल्यातच लपलेल्या मीपणाला शोधायला...अन् एका गाफील क्षणाला नियती म्हणते ये..अन् निघतो आपण शोध तसाच अर्धवट टाकून...डाव पुढच्या जन्मावर ढकलून..

खोल खोल तळाशी पक्क ठाउक असतं आपल्याला आपण कोण ते...आपल्या जगण्याचे नियम तिथे आपणच असतात कोरलेले..अन् इमानेइतबारे आपण ते पाळतही असतो..अगदी न चुकता..पण कुठल्यातरी एका वळणावर ह्या खोल तळाशी लक्कन काहीतरी हलतं..एक झुळूक होऊन कोणीतरी त्या तळाचा ताबा घेतं..आपल्याही नकळत..आपलेच नियम आपल्यापुरतं मग बदलत जातात..त्या झूळकेच्या तालावर ठरते श्वासांची लय..अन् काळजाच्या ठोक्यावरही जाणवतं त्याचं अधिराज्य..सवयीची होत जाते मग एक खोलवरची जखम अन् त्यावरचा उतारा...भिनत असतं कोणीतरी रंध्रारंध्रात तरी हवीशी असते ती नशा...ह्या धुंदीवर स्वार होउन मध्यावर येता येता मात्र सवयी काचत जातात..हवेहवेसे उसासे सारे उगा मग टाळले जातात.. हरवलेल्या मीपणाची जाणीव जेव्हा अचानक लख्ख होत जाते.. खोडलेल्या जून्या नियमांचा खडबड्या स्पर्शावर अलगद नवे मीपण कोरले जाते..

 अश्या पावसात सकाळ वैगरे होत नसते रे वेड्या..भ्रम आहे तुझा भ्रम..कसंय नं रात्री झोपताना पाउस दिसलेला नसतो नं म्हणून थोडासा उजेड पाडतो देवबाप्पा...डोळे किलकिले करुन खिडकीतून तो बघायचा मनभरुन अन् पून्हा झोपून जायचं..गुडूप..

मनमोहक रागदारीत बरसणारा मंत्रमुग्ध पाउस..

असंख्य संदर्भ असले तरी एकाही स्पष्टीकरणात कधी गुंफताच नाही आलं रे आपलं नातं .. पावसा..
      आठवतंय तुला,माळरानावरच्या त्या आमच्या वाड्याच्या पहील्या मजल्याला एक लहानशी खिडकी होती..आडवे उभे लोखंडी गज लावलेली..पडदा नसलेली..तरी बाहेर रस्त्यावरनं बघितलं की कायम अंधारच दिसायचा तिथे ..अन् आतून तिथे उभं राहीलं की.. बाहेरचं अख्खं माळरान डोळ्यात उतरायचं..हरेक ऋतुतल्या त्याच्या अदा निराळ्या..मोहक...गुंगवून टाकणार्या..उन्हाळ्यातलं पिवळंजर्द ऊन ,हिवाळ्यातलं गुलाबी धुकं..अन् पावसाळा..पावसाळ्यात तर दूरवर पसरलेला त्याचा हिरवा रंग अक्षरशः जादू करायचा...त्या माळरानावरचं काही म्हणजे काही सुटायचं नाही त्या खिडकीच्या नजरेतनं... तासंतास रमायचे तिथे मी... . हरखून जायचे..बाहेरच्या जगापासून अनभिज्ञ...एका अनामिक जादूच्या ग्लानीत..
      भर गर्दीत माझ्या शोधात भिरभिरणारी तरी मला टाळणारी तुझी हळवी नजर बघितली नं की मला हटकून ती खिडकी आठवते..अगदी तुझ्या डोळ्यांसारखीच होती रे ती..गुढ..समोरच्याच्या मनाचा तळ गाठणारी पण स्वतःचा थांगपत्ता कळू न देणारी..


कसंय नं बयो खरंतर आपल्यापुरतंच असतो आपण..आपल्यातलीच गुंतागुंत एव्हढी मोठी असते की सोडवता सोडवता अवघं आयुष्य सरुन जातं..तरी..तरी का गं धडपड आपली कुणा एकात सामावून जायची किंवा उलट कोणाला आपल्यात एकरुप करुन घ्यायची... एकटेपणाची भिती म्हणून..पण ते तरी कुठे नीटसं समजलंय..म्हटलं नं आपल्यातलीच गुंतागुंत मोठ्ठीय फार...

कसला मस्त पाउस सुरुये नाही..अशा पावसाळी दिवसात कुठल्यातरी आडवाटेला असलेल्या माळरानाआडच्या खोल खोल दरीत गेलाय कधी...वर वर दिसतं तिथे सगळं शांत पण असतं तितकंच अस्थिर... हो पण तिथे भय नसतं रे निसरड्या वाटांचं...किंवा शेवाळल्या आधाराचं...आणि आंधळ्या धुक्याचं?..किंवा पागोळ्यांच्या सरींचं??? नाही भीती नसतेच तिथे...असतो तो आजूबाजूला भारलेला हिरवागर्द प्रकाश अन् मनात हळुवार झिरपत जाणारी एकाग्र शांतता.....एव्हढंच काय ते तिथे आपल्या उण्यापुर्या साथीला..एकटंच असावं तिथे खरतरं अन् स्वीकारावं आव्हान मनाला सावरण्याचं..समोरचं काही दिसत नाही म्हटल्यावर मागे न वळण्याचं... सुरुवातीला नाही जमणार कदाचित..गोंधळ उडेल तुझा ..कसल्यातरी अदृश्य धुक्याच्या गर्दीत तू घुसमटशीलसुद्धा... पण तरी रेंगाळशील मात्र तिथेच...खात्री आहे मला... हो कारण अशा प्रत्येक खोल दरीत हमखास असते अशी एक जागा जिथे सहज सोपं पोहचता येतं..परतून येणं मात्र तितकाच अवघड...जीव अडकून पडावा अशी लावून दरी...
तुझ्या माझ्या नात्यातली दरी अशी नाही का रे ?


खुप खुप दिवसांनी अचानक तुझा फोन येतो..मी कामाच्या रगाड्यात गुंगलेले अन् तु..तु माझ्यात(हो नं?)..किती किती बोलायचं असतं इतक्या दिवसाचं साचलेलं...तरी..तरी नेहमीच सुरुवात होते ती "पाउस आहे का गं तुमच्याकडे"ह्या tricky प्रश्नाने.. नाही म्हणावं तर माझ्या आवाजातला गहीवर खरं सांगून जातो अन् हो म्हणावं तर तुझा कोरडा आवंढा मला उसवून जातो..मग टाळतेच मी ते हवामानाचे अंदाज अन् घसरते आपल्या पुढच्या topic वर...विचारत बसते घरचे हाल-हवाल..आई बाबा, दादा वहीनी,छोट्या..अगदी शेजारपाजारचीसुद्धा चौकशी होते..वेळ काढुपणा दोघांचाही...सण वार, जन्म मृत्यू..कोणाची परीक्षा अन् कोणाचे निकाल..काय काय विचारात बसतो..जे विचारायचं असतं ते शिताफीने टाळून.. तू कसा आहेस हा प्रश्नहि शेवटी त्यातच विरुन जातो..उत्तर माहित असलं तरी प्रश्न असतोच नं रे...एकेक करत सगळे विषय संपतातच शेवटी..आणि उरते नेहमीची निरोपाची स्तब्धता...न आवडणारी...पलिकडून येणार्या आवाजाचा वेध घेत, ठेवावा आता फोन म्हणत दोघंही शांत होतो...किती वेळ कोण जाणे दोघंही तिथेच असतो तसेच आजमावत ..अंदाज घेत..खरंखुरं बोलणं तिथे आत्ता कुठे सुरु होतं असतं ..शेवटाकडे सुरु होणारं मौनाचं नवं संभाषण तिथेच रुजू होतं असतं..लक्षात येतंय नं तुझ्या?

तिन्हीसांज अशी झाकोळून आली की एक विलक्षण कालवाकालव होते..घराच्या चार भिंतीतही असुरक्षितता दाटून येते.. आणि सहज एक विचार सलतो..कोणी आपलं घर सोडून कसं काय जात असेल? सकाळी वाणसामान घ्यायला म्हणून गेलेला माणूस परतून आलाच नाही तर...नाही मरण ही वेगळी शक्यता आहे...पण कुठल्यातरी एका क्षणाच्या ओढीने कोणी आपल्या सगळ्या ऐहीकतेचा त्याग कसा करत असेल...दारावर आलेला फकिर म्हणुनच मला नेहमीच त्याचा माग काढायला भाग पाडतो..तो असतो त्याच्याच धुंधीत..विरक्तीच्या.. अन् मी..मी त्याच्या मागे त्याची वाट पहाणार्या त्याच्या माणसांच्या मनात..तिथल्या प्रश्नांमध्ये... जाणारा एका क्षणात सगळ्यांकडे पाठ फिरवून जातो पण मागे राहणारा मात्र आयुष्यभर शोधत राहतो जाणार्याच्या पाउलखुणा... जाणार्याला त्याचं काहीच नसेल?..गुंतवणूक काहीच नसेल त्याची...? की हे बंध सोडवणं नेमकं जमलं असेल त्याला? एखाद्या साधूबाबाला गाठून विचारावंच त्याची घर सोडण्याच्या क्षणाची कथा... उगाचची कालवाकालव थोडीतरी शमेल..

आजकल रोज रात पलकोंतले हडबडीसी मची होती है...हा वही वो कुछ बिगडे ख्वाब.. छोटी छोटी खुषीके बडे बडे ख्वाब..पर पता नही क्यों आजकल रोज आपसमें झगडते हुए ख्वाब...ध्यानसे देखो तो शायद दो संघटनाए बनी है उनमे...एक मेरे और एक तुम्हारे सपनोंकी संघटना...और दोने में एक समान ख्वाब.... बस अब गिनेचुनेही जिंदा है लेकीन..हां पर नेता बने हुए वो दो ख्वाब.. अब भी वैसे के वैसे...कुछ बदला भी तो नही...ना ना याद मत करों उन्हे..भूल नहीं पाओगे फिरसे.. रातभर झगडतेें वो दो प्यारे ख्वाबा... बेमतलब.. बेवजह.. ठीक हमारे तरह..पता नही क्या हासील करना था..
अरे हाँ याद आया..एक बात बताओ,हमनें भी तो साथ बुने थे कुछ ख्वाब..सतरंगी जिंदगी के..वो कही मिले नही..कही तुम अपने साथ ले तो नही गए..."वो"ख्वाब..अपनी यादोंके साथ..


स रात साथ देखे सारे सपने, आज लगातार तिसरे दिन.. दिनदहाडे ..जब फिरसे मुस्कुराने लगे.. तब जाके ये एहसास हुआ..हमारे बीच कुछ तो बाकी रह गया है शायद...है ना?

कल रात पता नही क्या था
पल्कोंके नीचे कुछ बडी तेजीसे चुभ रहा था
हा कुछ यादे हो सकती है
पर उन्हे तो भूलना था...
तुम्ही ने तो बताया था...
या फिर थे वही खुशनसीब ख्वाब..
गिने चुने... साथ देखे हुए...
पर...पर ख्वाब तो कभी चुभते नही...
ये भी तुम्ही ने तो कहा था...
फिर...फिर क्या था ...
पुरी रात बस इस सोचमें गुजर गयी...
और पलकोके नीचे दर्दभारी फिर एक रात सो गयी...
ठक जो गायी थी संभलते.. संभालते...

कल तेरे ना होने कि सालगिराह थी ..
तुम्हे याद तो है नं???