Tuesday, January 18, 2022

माऊली

खरेपणाची प्रत्येकाची व्याख्या वेगळी असते ना बयो... म्हणजे बघ पुढची दिशा सापडेपर्यंत तुझ्या घरात रेंगाळतेय मी हे माझं खरं ,पण जगाच्या मते मी तुझ्या घरावर हक्क सांगतेय.. हेही त्यांच्यासाठीचं खरं आहेच ना...कोणाच्या घरावर खरंच असा हक्क सांगत येत असेल का गं? म्हणजे त्या वास्तू वर गाजवता येत असेलही कदाचित पण घर?? ते तर तुझं च असले न कायम.... नक्की हसशील हे वाचून आणि म्हणशील, अगं तुझं माझं असं काही वेगळं असतं का... आणि इथवरच्या प्रवासात इतकं सारं गमवल्यावर अजून कशा कशावर हक्क सांगायचं सोस उरेल का गं.. नकोच ते..  हे घर म्हणजे फक्त आसरा..काही क्षणाची विश्रांती.. भिरभिरल्या मनाला वाटेला लागेपर्यंतचा थांबा एक.. इथे कायमचा मुक्काम कोणाचा नाही.. जिथे उद्याचा भरोसा नाही तिथे कसल्या ग हक्काच्या बाता... बघ तुझ्या घरात अगदी तुझ्यासारखं बोलायला लागले.. तुझ्यासारखं लिहायला लागले.. आस एकच.. कधीतरी तू परतून आल्यावर माझ्या ह्या असण्याला तुझा स्पर्श व्हावा.. तू म्हणायचीस बघ... रिकाम्या वास्तुतही शब्द असतात आवाज असतात... सूर असतात.. ऐकणारा फक्त एक कान हवा....
अरे हो तुला सांगायचं राहिलंच काल पहाटेस जाग आली ती मधुर सुरांनी..अगदी जवळ आपल्या अंगणात कोणीतरी अवीट भक्तीने गात होत बहुदा.. सुरुवातीला जरा गडबडले, घाबरले सुध्दा म्हणजे बघ ना मी इथे तुझ्या आडोशाला इतके वेळा आले की आता नाही म्हणाले तरी हा परिसर ,शेजार ओळखीचा झालाय. आणि त्यापैकी आजवर  असं इतकं आत कोणीच आलं नव्हतं..अंगणाची वेस सहसा कोणी ओलांडली नाही हो नं?म्हणून तर गोंधळलेल्या मनाची नीट उस्तवार करायला तुझ्या घरी कायमच एकांत मिळत आलाय आणि आज पहिल्यांदा हा आवाज... आवरून बाहेर आले आणि समोर दिसला तो.. पोरसवदा किंवा त्याहीपेक्षा लहानसा तो.. आणि कानावर आली त्याची हाक.." माऊली".. 
माऊली घाबरु नका पहाटेसच आलोय.. तुमच्यासारखाच मीपण एक वाटसरू.. माऊलींच्या घराचा आसरा घ्यायला आलोय... गंमत वाटली बघ मला... म्हंजे बघ ना मघशी तुला हक्काच्या गोष्टी सांगत होते आणि हा आला तुझ्या.. माझ्या बयोच्या आणि त्याच्या माऊलीच्या घरावर हक्क सांगायला... हसूच आलं एकदम तसा तोही हसला.. निर्मळ हसू... म्हणतो कसा, माऊली वाट दिसेल तिथे माझा मार्ग, आभळातल्या देवावर श्रद्धा आणि त्याच्याच कृपेने ही भटकंती.. हा उत्सुकतेचा प्रवास...वहीवाटेचा मार्ग आहेच हा मार्ग हरवला तर मग तोवर नवे मार्ग शोधायला काय हरकत.. माऊली प्रवाही असायला हवं जगणं हो नं.... नाविन्याची ओढ असायला हवी.. विसावा हवा प्रवासात मान्य पण त्यालाही वेळेचं बंधन हवं माऊली.. कौतुक वाटलं गं आणि नकळत तुलना ही आली मनात... हो स्वत :शीच तुलना...
 सकाळ झालीय बयो आता... निघायला हवं आता... विसावा संपवून नवी वाट शोधायला हवी आता... उत्सुकतेेची पाऊलवाट... येतेस??

Saturday, April 6, 2019

वाडा

हिरव्याकंच रानातलं काळंभोरं दगडी घर....घर कसलं वाडाच म्हणायला हवा.. नितळ काळ्या पाषाणांचा  भलाथोरला वाडा...आषाढातली पावसाची संततधार ह्या लाल कौलांच्या वाड्याला प्रेमाने न्हाहू घालायचा... अन त्याच्या स्वच्छ गोंडस रुपाकडे बघत तो पाउसही खुळावायचा... नेमका होता तरी कसा हा वाडा?
           तर हा भलाथोरला वाडा होता नेटक्या दिंडी दरवाज्याचा... बाहेरच्या कोणालाही, प्रवेशालाच ह्या वाड्याच्या मोठेपणाचं दडपण नको म्हणून मुद्दाम हा दिंडी दरवाजा असा..हिरव्यागार आंब्याच्या पानांच्या तोरणांनी सजलेला.. बाप्पाची गोंडस मूर्ती ल्यालेला.. स्वागतच मुळात कसं प्रसन्न व्हायला हवं .... तर अश्या ह्या दिंडी दरवाजातून आत जाताच भली थोरली ओसरी... अन ओसरी पल्याड सुंदर चौक... तुळशीवृन्दावनाचा .. अहाहा!! नुकत्याच लावलेल्या ताज्या उदबत्तीचा कसा मस्त सुवास अख्ख्या  चौकात दरवळतोय नं ... हं  तर हा चौक ह्या अख्ख्या वाड्याचा आत्मा बरं का .... काय नाही व्हायचं म्हणताय  त्या चौकात..अगदी वाळवण, कांड्णापासुन ते अभ्यास,गोष्टी, कवितांपर्यंत सगळं .. आखीव रेखीव..काळ्या सुपीक मातीचा चौक ....त्याच्या चारही बाजूंनी स्वछ पडवी नेमक्या खांबांवर तोललेली...दगडी फ़रश्यांनी मढवलेली... अन हो ह्या पावसाळ्यात पागोळ्यांच्या दागिन्यांनी सजलेली पडवी... ह्या पडवीतून वरच्या मजल्यावर जायचा अंधारा जिना.. लाकडी कोरीवकामाचा.. कोणी म्हणे परदेशातून आणला होता तो..तर  कोणी म्हणे पेशव्यांच्या काळातला आहे...होताच तसा भारी म्हणा तो.... वरच्या मजल्याला कौलारू छप्पर.. उन्हाळ्यात त्यातून कवडश्यांची सुंदर रांगोळी बनायची जमिनीवर.... तासंतास निरखत बसावी अशी रांगोळी...वरच्या निजायच्या खोल्या ह्या अश्या भल्यामोठ्या.. पण मोकळ्या.. त्यांना प्रत्येकालाच  डोंगराकडे उघडणार्या लोखंडी गजांच्या खिडक्या.. वाड्यातल्या नव्या सुनांचं दड्पलेपण ह्या मोठ्या खिडक्यातच तर अलगद  विरून जायचं...तासंतास बघत बसलं तरी कंटाळा येणार नाही आणि नजर ठरणार नाही असा लांबच लांब पसरलेला आसमंत....हरेक ऋतूत बदलणारा आसमंत... प्रत्येक खोली म्हणूनच नेहमी प्रकाशाने भरलेली.... खालच्या चौकातून पडवीत आलं की उजव्या हाताला देवघर... नुसत्या नावानेच नतमस्तक व्हावं असा सगळा तिथला कारभार...मोजकेच देव.. गंध फुलात सजलेले.... अन मंद समईच्या प्रकाशात उजळलेले... आरतीच्या स्वरात डोलणारं देवघर बघितलं की हात नकळत जोडले जातात... देवघराच्या बरोबर समोर कोठीघर.. हे काही विशेष नाही... पण तिथे डोकावतो न डोकावतो तो नाकात एक दरवळ जाणवतो... वहिनीनी टाकलेल्या हिंग कडीलिंबाच्या फोडणीचा...उन उन शिजणार्या भाताचा..खरपूस भाजल्या जाणार्या भाकरीचा.. अन सोबतच कानावर येतो आवाज किण्किण्नार्या बांगड्यांचा,टचटचणार्या जोड्व्यांचा.. अन हलक्या आवाजातल्या कुजबुजीचा..सगळा घरातला आतला मामला.. पण तरी ऐकत राहावा असा... अरे हो हे स्वयंपाकघर बरं का...अन त्याआधी माजघर होतंच.. पण ते कायम अंधारं.. स्वयंपाकघराच्या पल्याड मात्र हा असा मोठ परस..फळाफुलांनी लगडलेला..तरी नीटपणे राखलेला... अन त्या पल्याड खोलच खोल विहीर.... हि मात्र कायम गुढ राखत आलेली....

            तर हा असा वाडा... भलाथोरला तरी आपलासा....कोणालाही सामावून घेणारा...
कधी कधी काही फ्रेम्स डोक्यात फिट्ट बसलेल्या असतात नं... डोळे बंद करताच आपोआप सरकत जाते अशी एकेक फ्रेम.. सहज.. अलवार...

Wednesday, July 26, 2017

अंदाजानेच तर आलोय इथवर

अंदाजानेच तर आलोय इथवर
चुकत माकत, ठेचाळत... 
अंदाजानेच शोधल्या वाटा ... 
तसे तर जन्मापासूनच सारे अंदाज.. 
अगदी मरणापर्यंत सोबतीला... 
तळपत्या वैशाखाचे अंदाज 
बहरत्या श्रावणाचे अंदाज...
पावलापावलावर आजमावणारे अंदाज
तरीही चुकलेलेच बरेचशे..
इतके सवयीचे झालेत हे कि
आताशा नकळतपणे मनात
अनोळखी मनाचेही अंदाजच ...
ठीकच आहे म्हणा....
पण म्हणून ...

एका अवघड क्षणी जोडलेलं नात
वर्षानुवर्ष अंदाजानेच खेचायचं ..????
का???

Friday, July 21, 2017

उसी गली के उसी नुक्कड पे-3

कोर्नर का वो लंबासा लम्पपोस्ट
और उसके निचे खडा छोटासा वो..
अपने सपनोंकी उंचाई नापता हुआ..
कुछ अजीबही चमकति थी उसकी आंखे
उस उंचे लम्प की पीली रोशनीमे..
एक अलगही चाह थी उसे..
और..
और..
हा और शायद इंतजार था उसे..
ना ना... कोई मेहबुबा ना थी
ना ही ये कोई आशिक़ था..
वो इंतजार तो बस अपने मौत का था..
कहने को तो पागल कह भी देते लोग उसे..
उलझे हुए सवालोंमे सुलझा हुआ पागल..
सतरंगी ख्वाब देखनेवाला जिद्दी पागल...
हर एक पल मर्जीसे जीनेवाला पागल...
और्..
मौत की चाह मे सांसे गिनता वो पागल..
.
.
.
.
.
.
लेकीन किसी ने कुछ ना कहा..
शायद उन मे भी कही छुपा था
वो पागल.......
और शायद इसीलिये.....
.
.
.
.
.
उसी गली के उसी नुक्कड पे
वो आज भी खडा है..
सपनो से भरा उसका हर पल
उस इंतजार मे जीता हुआ

उसी गली के उसी नुक्कड पे-2

वैसे तो हमेशा ही भीड होती थी
उसी गली के उसी नुक्कड पे
वो फिरभी रहा अकेला
अपनेमे ही खोया हुआ..हमेशा..
कभी हसता था..
कभी गाता भी था..
अपने ही धुन मे ना जाने
क्या क्या छुपाता था..
दर्द तो देखा है 
हरेक ने उसकी आंखोमे
गम का वो आसु लेकीन
न जाने कहा छिपाके रखा था
उसे मिले हर शख्स के मन मे 
रहा हमेशा एक सवाल
उसकी हसी मे छिपे उस सन्नाटेका
दर्द से भरी उन मुर्दा आखोंका..
और्..और् ...
उससे जुडे उसके खालीपनका..
किसीने पुछा होता तो शायद जवाब मिलता..
पर..शायदही.. क्योंकी..
.
.
.
.

उसी गली के उसी नुक्कड पे
वो आजभी खडा है
थोडा घबराया...थोडा सहमासा.

उसी गली के उसी नुक्कड पे

उसी गली के उसी नुक्कड पे
वो दिखता था कभीकभी
थोडा घबराया…थोडा सहमासा..
न जाने क्या खोया है उसने
जो ढूंढता है दिनरात
कभी खुले आसमान मे
तो कभी कोने मै फ़ैली उस रेत मे
आते जाते लोग देखते थे उसे
कुछ हसते थे..कुछ रोते भी थे
पर ना पुछा किसिने के
“बाबा क्या ढुंढ रहे हो?
खोया हुआ बचपन
गुजरी हुइ जवानी
या…या…आनेवाला कल?”
पुछते तो शायद जवाब मिल जाता
उन खाली आंखोमे छिपे सवालोंका
जिसे वो अक्सर ढुंढा करता था
उन टुटे तारोंमे..पत्थर की लकिरोमे…
लेकिन्….
.
.
.
.
.
उसी गली के उसी नुक्कड पे
वो आजभी खडा है
थोडा घबराया…थोडा सहमासा..

Thursday, July 20, 2017

वस्ती

लाल पिवळ्या भिंतींची ,
थेंब थेंब गळत्या छपरांची
चिंब ओल्या शेंबड्या पोरांची
अन कातावलेल्या आयांची
.
.

अस्वस्थ चिखल वस्ती....

 एका रात्रीत उगवणारी
दुसर्या रात्रीत विझणारी
अन तरी सवयीचीच भासणारी
 जुन्या जाणत्या रस्त्यांवरची
.
.
.पावसाळी वस्ती...

भर पावसाळी पहाटे 
निद्रीस्त रस्त्याच्या कडेला तेव्ह्ढी जाग
 दाराशीच निर्धास्त पहुडलेली
कळकटल्या चेहर्यावरची गोंडस 'निरागसता'
 काळ्याकुट्ट आभाळाला छेदत जाणारी
खरपुस खमंग धुरांची 'वलयं'
उगवत्या दिवसाच्या चिंतेने 
तारटावलेले लाल डोळे आणि..
आणि तीन आडोश्यात
स्वत:ला लपवणारी तरी डोकावणारी लाज
.
.

.....अन....
.....अन...
नेमकं निरागसता, धूर, चिंता टाळत
 फक्त ह्या लाजेच्या शोधात 
रस्त्याच्या 'त्या' टोकावरची
 हपापलेली वस्ती.....ह्म्म....सभ्य वस्ती...

Monday, May 2, 2016

खरंतर फार मोजक्या लोकांना उत्तरं देण्यास बांधील असतो आपण... पण तरी विचारल्या गेलेल्या प्रत्येकच प्रश्नाने मनात काहूर उठणं काही सुटत नाही... नेमकी उत्तरं शोधताना निरर्थक प्रश्नांना सोडून देता यायला हवं बयो..
....................................................................................
मित्रा अंतरं अशी अचानक नाही नं रे वाढत.. कणाकणाने दुरावत असतो आपण एकमेकांपासून.. अन अगदी हाकेच्याही पल्याड गेल्यावर एकदम भानावर येतो.. अंगावर उमटतो शहारा.. भीतीचा.. तुला गमावल्याच्या भीतीचा.. helpless ला मराठीत असहाय्य म्हणतात ना रे.. बरोबरच मग.. तूला गमावल्यावर मागे उरतं ते हेच सोबत नसलेलं ...असहाय्य... एकटेपण....
..................................................................
काहीवेळा टाळता न येणाऱ्या असतात... सांजवेळ हि त्यातलीच एक... मुळात ती हवीहवीशी असते... तिची ती हुरहूर जीवघेणी असली तरी जिवंत असते आणि दिवसभराच्या मरणात ती एक जिवंतपणाची खुण जपावीशी वाटते.... गुजरते वक्त का एक लम्हा चुराना हो तो याकिनन वो शाम होगी...
...................................................................
ह्या अशा जीवघेण्या कळेचे सोहळे साजरे करणारीही जमात असते बायो .. हो जिवंत जमात.. कळ आयुष्याला पुरून उरणारी हवी फक्त अन तिची वेदना मिरवताही यायला हवी.. हो नं ?
.........................................................................
बयो,
. सगळं कसं स्तब्ध... हे भरून आलेलं आभाळ, वाहणं विसरलेला वारा, तेच शहर, तीच घरं, तेच रस्ते अन तीच माणसं.. सगळं तेच.. वर्षानुवर्ष जिथल्या तिथे... कशातच बदल नाही... सवयीचं झालंय आताशा पण तरी एक अस्वस्थता मनात घर करून बसलीय.. आणि त्यात भर म्हणजे कानात रुंजी घालणारं हे गाणं.. दिल-ए-नादान तुझे हुआ क्या है... कारणं कळायला हवीत गं.. ह्या अस्वस्थतेची.. ह्या रितेपणाची.. कारणं ह्या जाणिवांची... नाहीतर हे असं नुसतं वेळी अवेळी पाणावणं काही बरं नाही.. खूप जुन्या ओळखीच्या डोळ्यात अनोळखीपण कसं काळजाला हात घालतं तसं काहीसं हे...
बयो, जीव कसा गं जडतो? सवयीतून? सोबतीतून? कि कोणीतरी अगदी आपल्यासारखं असतं, त्या त्याच्या /तिच्या असण्यावर जीव जडतो? हि जाणीवच मुळात विलक्षण असावी नं.. सुखावणारी... मालकी हक्क सांगणारी.. पण मग हक्क संपल्यावर जाणीवही विरायला हवी नं गं ? हम्म.. नाही नं होत तसं.. one way route हा.. परतीच्या पाउलखुणा पुसलेला... वेस हरवल्या गावासारखा वाढता हा जाणिवांचा प्रदेश.. रोज एक नवं झोपडं नव्या जाणीवेचं... पसारा वाढताच... तरी
तुझ्या माझ्यात आत्ता उमटलेली हि अनामिक जाणीव मिटत पाटी कोरी होईल का गं बयो ?

................................................................................

सावळा अभंग

सावळ्या रूपाचा | सावळाच छंद |
एकरूप देहभान | वेणूनादी.. 

उरी दाह लक्ष | सुखी एक क्षण |
जीवितांचे श्वास | विसंवादी...

उमलण्यास जिच्या | नसे मोहबंध |
इच्छा पोटी एक | रुजवावी...

फकिरी भ्रमंती | निर्मोहीच ध्यास |
नवी शून्य वाट | गवसावी...
जगावेगळे असे काहीसे वेड म्हणू कि ध्यास म्हणू
अंधुक अंधुक हजार वाटा, एकीला का पळवाट म्हणू 
.......................................................................................
मनातल्या असंख्य प्रश्नांसोबत राहणं ज्या क्षणी सुसह्य होईल त्या क्षणी शांतता शोधणाऱ्या अखंड वाटांना पूर्णविराम मिळेल बयो...
............................................................................................
मावळतीच्या उन्हाची एक तिरीप टेबलवर येतेय... सोनेरी रंगात हा करडा टेबल top झळाळतोय.... माझा हात मात्र ह्या सोनेरी उन्हातून कोऱ्या कागदाकडे... कधीकधी हे कोरेपणसुद्धा आश्वस्त करतं नं...
...............................................
मधुनच आठवतं काही.. तळाचा गाळ पुन्हा ओठांवर आणणारं.. अलगद भिजते पापणी अन् ओघळतेच एखादी सर.. खरंतर तेव्हा कोणीच नको असतं ... कारणं विचारणारं ... अनामिक ओझं उतरवत हलके होत असतो आपण..हळुवार... आभाळाच्या गाण्यांचा सुर मिळावा अन् नेमका समेवर ठसा उमटावा तशी थांबते सर.. अवचित..आवर्तन पुर्ण करणारी..
........................................................................
एकेक दिवस असाही येतोच कि... काम असतं..त्याचा डोंगरही असतो.. आणि पुन्हा सोमवारही असतो... पण तरी, कुठल्याश्या मुठीतून( कि मिठीतून )मन हळूच पसार होतं... भर उन्हाचं तळ्याकाठी एकटंच उसासत बसतं... स्तब्ध तळं सुसाट मन.. कशाकशाचा संबंध नसतो तरी कसं कोण जाणे तळं मनाला गोंजारत असतं... गरम झळा गार पाणी सगळंच तसं विचित्र... इवल्याश्या मनाचं इतकं मोठ्ठं बहरणं... एकेक पळ सरत तळं मावळतीला येतं , गजबजलेल्या मनातलं नेमकं तेंव्हाच ओठांवर येतं... तळ्याच्याही तळाशी जात जात मनं हलकं होत जातं... कामाच्या आठवणीने अन पुन्हा भानावर येतं... एकेक दिवस असाही जरा जरा वेगळा असतो सोमवार असला तरीही तोइतका वाईट नसतो...
..........................................................................................
अंगणातल्या वेली मोगऱ्याला बिलगून एक बंगई असावी कुई कुई आवाज करणारी.. पितळी कड्यांची अन शिसवी दिमाखदार पाटाची... उन्हाळ्यातली निरभ्र रात्र अन सोबतीला चांदण्यांची आरास.. ह्या बंगई वर उताणं झोपून वेली मोगर्याच्या गंधावर हलके झोके घेत मला एकदा हे काळंभोर आभाळ निरखायचं...
.....................................................................................
टाळायचा म्हणत जाणून बुजून बदललेला रस्ता जेव्हा पुन्हा त्याच नकोश्या मुक्कामी पोहोचतो नं... तेव्हा लागत जातात अर्थ सवयींचे.. पावलांच्या... मनाच्या... सवयींचे अर्थ...
.......................................................................................
हवं तेव्हा हवं तिथून माघारी फिरता यायला हवं... इतकं विनापाश जगणं जमेल बयो?
..............................................................................
पाचोळ्याच्या गर्दीत एखादंच हिरवं पान बघितलं कि कसं चर्र होतं नं .... तसंच काहीसं मला भर गर्दीत तुला बघितलं कि होतं... हि हिरवीगर्द ओल झिरपत नाही रे आताशा.. खोल खोल
............................................................................
उन्हाळ्यात आभाळाचा रंग जास्तच निळा होतो का रे?? आज तर आभाळ असं दिसत होतं जसं काही कोणीतरी नीट आवरून घडी घालून ठेवलंय...ढगांची सुरकुतीही नसलेलं कडक निळं आभाळ...
......................................................................
शाम की किसी कोनसे आ जाती है रात.. तब याद आते हो तुम.. हाथसे फिसले रेत जैसे वक्त जब दरवाजेपे आके रुक जाता है.. तब याद आते हो तुम.… कही कभी तो ये रात काले बादल ओढ़े आती है.. जैसे कभी तुम आया करते थे.… रंगीन सपने ओढ़े..... ना ये तब बता पायी न अब.… या शायद फिर कभी नहीं.… पर रात की चौखट पे सवेरा अपना पहला कदम रख मुस्कुरा देती है.… तुम अब भी वही उस चौखट पे याद आते हो.……
आपल्या माणसाची... त्या नात्याची... काळजी वाटण्याचा हक्कही कमवावा लागतो का गं बयो??
..............................................................
छोट्या छोट्या सध्या अपेक्षा बाळगून असतो रे माणूस.. दरवेळी पूर्ण होतीलच असं मागणं नसतंच.. उलट त्यातल्या काही अपेक्षा अवास्तव आहेत हेही कुठे न कुठेतरी मान्य केलं असतं मनाने.. पण तरी दुखावले जातोच नं .. वाईट वाटतंच नं .. ते नाहीच रे नाकारता येत...

सोबत असताना संवाद घडावा हि फार मोठी अपेक्षा नव्हती न रे ?
.........................................................................
नावडतीच्या गोष्टीतही आवडणारं असतंच कि काहीतरी.. फक्त ते ओळखता यायला हवं.. जपता यायला हवं हो नं बयो...
.............................................................................
तू एक निरागस स्वप्न ह्या काजळ काळ्या राती 
मी होऊन काजव माळ ते क्षितीज गोंदवत असतो
.............................................................................
माणसाचं अनुभवणं थांबलं कि त्याचा पुतळा व्हायला वेळ नाही लागत गं बयो...
........................................................................
जरासं समजूतदार शहाण्यासारखं वागावं अन समोरून त्याची वारेमाप दखल घेतली जावी इतकं साधं सोपं असतं कौतुक... हवंहवंसं... ह्या अखंड गर्दीत कोणीतरी असं नोटीस करणंच किती खास असतं नं... अन त्यात जर हे शहाणपण नोटीस करणं असेल तर क्या कहना... आपल्या आतलं एक पिटुकलं लहान मुल ह्या कौतुकासाठीच तर जपलेलं असतं... एवढ्याश्या शहाणपणाचं एवढं मोठ्ठं कौतुक... मज्जाच नं
.......................................................................................
आपलं हक्काचं माणूस असो किंवा त्याच्याशी असलेलं तितकंच हक्काचं नातं...त्यांच्यातलं नेमकं काय जपायचं हे स्पष्ट असावं बयो.. कायम...
..................................................................................
आपलं हक्काचं माणूस असो किंवा त्याच्याशी असलेलं तितकंच हक्काचं नातं...त्यांच्यातलं नेमकं काय जपायचं हे स्पष्ट असावं बयो.. कायम...
..........................................................................
ह्याच एका ओळीसाठी जन्म असावा अन तिच्या पाठलागात थेट शेवट व्हावा इतकंच काय ते आयुष्य एका लेखणीचं
.........................................................................
रात्र नं कायम प्रौढ वाटत आलीय..तिला जोडल्या गेलेल्या संदर्भामुळे असेल कदाचित, पण तिचं असणं कायमच समजुतीच्या पातळीवरचं...अल्लड असण्याचा अधिकार तिला नाहीच जणू.. पण तरी.. क्वचित कधीतरी अपवादानेच का होईना एखादी बाल्यावस्थेतील रात्र अचानक सापडते.. निरागस नितळ रात्र.. अवखळ हसू पांघरलेली मोकळ्या माळरानावरची रात्र...मिट्ट काळी रात्र... चांदण्याचं गोंदण, गर्भगार शांतता, गूढ ओढ.. अशा विशेषणांची तिला गरजच नाही...तिला असतं फक्त लाघवी वेडाचं वरदान.. जे ती जपत असते... न जाणो कित्येक युगं लोटली.. पण आजही वयात येण्याआधी एक रात्र अशीच हळवी होते.. हो नं
......................................................................................'
तुटायला नं बयो एक क्षण पुरेसा असतो.. किंवा कदाचित तो saturation point येईपर्यंत आपण दुर्लक्ष करतो.. सगळ्याकडेच... अन हा शेवटचा point... सगळंच संपवणारा... ह्या तुटण्याची intencity नं त्यानंतर होणार्या त्रासावर अवलंबून असावी का गं... तसं असेल तर जोडले गेले होतो कधीकाळी ह्यावर विश्वास तरी कसा गं ठेवावा...
काहीतरी नवीन मिळेल ह्या आशेने आपण जुनंच चाळत बसतो बयो कित्येकदा... बाकी काही नाही पण फक्त कधीकाळी जे हट्टाने नाकारलं होतं त्यात पुन्हा गुंतायला होतं....
....................................................................................
मौनातल्या त्या स्वराने डोळा पूर हळवा यावा 
क्षण तो भाळण्याचा बस इतकाच कातर व्हावा
...............................................................................
सोडून दे सखे तू हा हट्ट बहरण्याचा 
ऋतू पानगळीचा अशाने टळणार नाही
...................................................................................
नेहमीच्या restaurant मधला maneger आज सहज रस्त्यात भेटला.. साध्या कपड्यात होता... ओळखताच आला नाही.. म्हणजे दरवेळी त्याच्या युनिफोर्म मध्ये भेटतो आम्ही अन सवयीने ओळखही दाखवतो पण आजचा हा वरवरचा वेगळा अवतार अनोळखी वाटला रे.. 
नेहमीच्या कडवटपणाची सवय झालेली असताना कोणी अचानक गोडवे गाऊ लागलं कि असंच अनोळखी वाटतं नं अगदी तसं
.......................................................................
आताशा स्वत:चं स्व असणं अलगद मिटून घ्यावंसं वाटतंय ... कोणाचं नसणं इतकंही अधोरेखित होऊ नये गं बयो...
..................................................................
समोरच्याच्या अवघड प्रश्नांच्या फैरीत अचानक आपलं एक हरवलेलं उत्तर सापडावं असंच काहीसं
...............................................................
हे एक विलक्षण घडतंय… उतरणीचं ऊन असं थेट व्हरांड्यातून रेंगाळत पावलांपाशी निजलंय. हातात एक पुस्तक अन डोक्यात त्या पुस्तकाचं मोहोळ… अंगभर पसरलेली सुस्ती अन टक्क डोळ्यांनी चाललेली पारायणे... त्या गुंत्यांची… गुंता त्या ऊन्हाचा… त्या रेंगाळण्याचा… पुस्तकाचा… त्यातल्या संदर्भाचा अन गुंता या निवांततेचा !
....................................................................
तुला नाहीच कळणार गं म्हणताना... एक संधी... समजून घेण्याची.. चाचपडून बघायला हवीच नं गं... शब्द न शब्द समजेलच असं नाही गं जगण्यातला...पण हे अनुभावांचं वाटून घेणं तरी जमायला हवं बयो.... जमायला हवं...
....................................................................
कुठल्या ओंजळीतून झिरपते अद्वैताचे देणे
रित्या किनारी फकीर गातो अंधाराचे गाणे
...................................................................................
पाझरत्या पन्हाळीच्या टोकावरून ओघळणारी ती एकसंध ओली सर जशी अलगद विसावते नं तळहातावर.. तशी असते सोबत तुझी.. नितळ... पारदर्शी...
..............................................................................
न घडलेल्या गुन्ह्याचे दुखरे परिणाम विनाकारण भोगावे लागले नं बयो कि 'अगतिकता' ह्या शब्दाचा खरा अर्थ कळतो.

समईच्या ज्योतीत अस काय असतं रे जे खोलवर शांत करत जातं... दिवे सगळीकडेच लागतात.. प्रकाश तर तसाही नवा नाहीच पण हि ज्योत नं वेगळी असते.. तिचं प्रतिबिंब डोळ्यात उतरलेलं बघितलं आहेस नं .. देव असाच असतो ना रे
..........................................................................................................
खरंतर खुप साधं सोप्पं असतं नातं.. पण गुंता नं आपण वाढवतो.. हौस मोठी नं गुंत्यात अडकायची... त्यापेक्षा प्रवाह करु रे नात्याचा.. वाहता..हवं नको सारं सामावणारा
........................................................................
काही स्वप्न उगाच अर्धवट राहतात ना रे.. म्हणजे हेच बघ नं... खुपदा वाटतं ह्या अशा हुरहुरत्या संध्याकाळी स्वत:च्या घरी बाल्कनीमध्ये बसावं.. सीडी प्लेअर वर एखादी हळवी रागदारी असावी... हातात एखादं पुस्तक... अन चहा... गार झालेला... गाणं कि पुस्तक..नेमकं कशाने ठाऊक नाही पण डोळा पाणी दाटलेले... चित्त भरकटलेले... अन हळूहळू गडद होत जाणाऱ्या अंधारात विरघळण्याची अनावर ओढ... हि वेळ टाळायला नको... नकोच... स्वप्नवतच वाटतं हे सगळं... अगदी ह्या सगळ्यानंतर येणाऱ्या दिवेलागणीपासून ते देवघरात समई उजळताना त्या प्रकाशात शांत होणाऱ्या मनापर्यंत सारंच... स्वप्नवत...
........................................................................................................
इक भिनी मीठी खुशबू ओढे मिलती है सुबह आजकल... नर्म धूप हथेलिपे आके कुछ यू मुस्कुराती है मानो जैसे अपना करारापन पिछली बारीश में भूल आयी हो... हर और जैसे कोई खुशियाँ बाट रहा हो ऐसी ताजगी भरी सुबह.. सर्दियोंकी सुबह...
.............................................................................................................
आपल्या जवळच्या माणसांना समजून घेता न येण्याचा guilt सगळ्यात मोठा गं बयो ..
..............................................................................................
खळखळून हसता यायला हवं बयो... समोरच्याच्या मनातली बहुतांशी जळमटं त्यात बेमालूम विरघळून जातात...
.............................................................................
घ्या बघता बघता 31 डिसेंबर पण आला.. आपल्याकडे नं फक्त निमित्त हवं असतं celebration चं.. नाहीतर अगदी गौरी गणपतीला लागलेल्या झगमगीत दिव्यांच्या माळा पार ह्या year end पर्यंत उजळल्या नसत्या.. आषाढाच्या पहिल्या सरीत फ्रेश झालेलं मन थेट 31st च्या थंडीत उधाणलं नसतं... मस्तय नं पण हे... उत्सव साजरे करणं... आनंद वाटून घेणं... कसलंही बंधन नसलेलं हे साजरीकरण... निमित्त काय मिळत जातात.... सुख मिरवण्याची इच्छा हवी.. हो नं ?
..............................................................................................
ये उन दिनों की बात है जब अनजान था ये शहर... यहां की गलियां... यहां के चौराहे.. अनजान थे हम... हा और थोड़ेसे पागल भी.. एक दूजेका हाथ थामें जब पहला कदम रखा था इस जमीन पर, तो याद है रुह का एक कतरा हमने वहीं बो दिया था... उन दिनों भी इस शहर ने उस रुह को पनाह दी थीं.. ओर आज भी उसे अपने आपमे समाये है...उस दिन यहाँ का हर चौराहा अजनबी था हमारे लिये.. और आज देखो ऐसी एक भी छत नहीं यहा जिसने हमें अपनाया नहीं... ये बात उन दिनों की हैं और आज की भी.. ये बात हैं उस सफर की..अजनबी शहर के अपनेपन के ओर बढ़ते सफर की बात... अपनी बात
........................................................................................................
बयो.... अख्ख्या दुनियेसमोर I dont care attitude मध्ये वावरताना खोलवर जपलेलं हळवेपण जिथे दिलखुलासपणे मांडता येईल असं एकतरी नातं असावं... हो न..
...............................................................................................................
प्रवाह आटला कि वाहत्या नदीचा डोह होत असेल का गं बयो...
..............................................................................
परतीच्या वाटेवरचा हा मंजुळ घुंगुरवाळा
दिवसाला उलटून येती संध्येच्या कातरवेळा
..................................................................

हि वेळ अशी एकाकी अंगणात घुटमळणारी
लेऊन लाजरी स्वप्ने उंबऱ्यात गुणगुणणारी
कोई अपनी मुस्कुराहट आपसे बांटना चाहे तो उसे मना नहीं करते बेटा...
................................................................................
सिग्नलपासून साधारण 100 मी वरचा गाड्यांचा वेग हा बघण्यासारखा असतो... हिरवा दिवा ते पिवळा आणि पिवळा ते लाल होईपर्यंतची त्यांची धावपळ विलक्षण... पण खरा कस कुठे लागतो माहितेय? सिग्नल लाल होताना योग्य ठिकाणी थांबण्यात... करकचून ब्रेक मारावा लागतो.. धक्का बसतो.. चार शिव्याही निघतात..पण अति घाईत होणारा पुढचा अपघातही टळतो... आपले बरेचसे निर्णयही असेच असतात नं ... नेमक्या क्रोसिंगला थांबलेले... नाहीतर अपघात अटळ
........................................................................................
याद है.…? 
शहर के बीचोंबीच एक पुराना बरगद का पेड़ हुआ करता था ...

हराभरा पेड़ ...

एक शाम यूँही बातों बातोंमें तुमनेही कहाँ था, 

कुछ सौ साल की होगी उम्र इसकी शायद ...

जरासा डरसी गई थी में... बुढा बरगद कहीं टूट पड़ा तो ...

तब तुमने दिखाया था मुझे

उसके हर टेहनी पे बसा एक नया शहर ...

नन्हे परिंदों का प्यारा शहर.…

सुरीले सुरोंमे चहचहाता शहर....

ख्वाबोंका शहर …

भला अब टूटने का डर किसे ...

सुना है कल रात की बारिश का उस बरगद से झगड़ा हुआ.…

बूढ़ा था बरगद..... हार गया.....

सुना है अब वहा कुछ भी नहीं बचा.....

ना नीव ना शाख.... ना ही अकेली कोई जड़.…

फिर वो

परिंदे ??... उनके घर ??...उनके सुर ??.... उनके ख्वाब ??....

एक शहर के ग़ुम होने की रिपोर्ट कही तो दर्ज होगी ना.… 
कुठे एका ठिकाणी असं तिचं मूळ कधी रुजलंच नाही गं बयो... सततची फरफटच नशिबी.. अन तरी 
बहरण्यास सोडच पण साधं अंकुरण्यासही ह्या वांझोट्या नशिबाची साथ लागते हे फार उशिरा कळालं गं तिला...बस इतकंच..
...................................................................................
दडवून दु:ख त्यांचे जे सोहळ्यात मग्न
कर्जात त्या सुखाच्या अस्वस्थ चेहरे
...................................................................
जराशा स्वराने उभा देह कातर
असे दिव्यदान ओंजळी पडू दे 
वेदनेचा ज्याच्या नसे डोह डोळा 
असा निष्पाप क्षण ओठी वसू दे

मिळे ज्यास शिक्षा जिता मृत्युदंड
असा सांग होता गुन्हा कोणता तो
उतरणीस ज्या शाप एकलपणाचा
असा कोणता जन्म गर्भात रुजतो
.............................................................................
कुण्या अज्ञाताने अडवावी वाट तशी लागते ठेच जीवघेणी
................................................................................
कोऱ्या करकरीत शुभ्र कागदावर अनवधानाने पडलेला शाईचा एक ठिपका म्हणजे कविता.
.......................................................
आपण आपलं फक्त निमित्तमात्र असणं स्वीकारावं बयो..
...............................................................
लाघवी क्षणांचा मोह रे नश्वर
निरंतर फक्त मोहोळ आठवांचे
.......................................................
तळ दिसेल इतका नितळ नसावा रे डोह डोळ्यांचा

ज़िंदगी जीने के लाख बहाने शायद 
एक बहना तो ये भी होता 
आधे अधूरे बेबस जवाबों को 
उनके सवालों के हाथ सौपना होता 

इक तिनकेसी लगती जिंदगी तब 
जब सारे सवालोंके ख़त्म होते भी 
एक जवाब फिरभी बाक़ी रहता
अनचाहा .. अटपटा .. अटकसा जवाब ..

कुछ नहीं तो एक सवाल ही उधार दे दे मौला
काहीही कारण नसताना एखादा क्षण अचानक अधोरेखित केला जातो… कुठले संदर्भ, कुठले प्रसंग कशाचीच परवा नसलेला हा क्षण न सांगताही ध्यानीमनी जपला जातो. 
सामान्यांचं असामान्य असंच होतं नं…
.....................................................................................................
खूप दिवसांनी खूप कौतुक..मन आनंदाने ओतप्रोत.. त्यातूनच चेहऱ्यावर रेंगाळणारा आत्मविश्वास.. आणि डोळ्यात? डोळ्यात तेच निरागस हसू.. ओळखीचं..
...................................................................................................
सोसवेल तेव्हढंच वेडं असावं गं बयो... निसटलेल्या एक एक क्षणाचं हसं व्हायला नाहीतरी वेळ लागत नाहीच हो नं
...........................................................................................................
घरं मोठी होत गेली कि त्यात स्वतःशी स्वतःला जोडले जाण्याच्या जागाही वाढत जातात...आपसूक..
..................................................................................................................
आभाळाला आभाळाचं आभाळ होता येत असेल का रे ?
.............................................................................................................
सवय वाईटच... कोणाच्या असण्याची.. नसण्याची...प्रेम करण्याची ..अव्हेरलं जाण्याची..टाळण्याची .... टाळलं जाण्याची.... टाळलं जाण्याची?ह्याचीही खरंच सवय होते का रे?
...............................................................................
अंधार म्हटलं कि हरवणं येतं ओघाने... पण हि रात्र मात्र हरवलेलं काहीतरी अलगद ओंजळीत ठेऊन गेलीय.. हि जादू अंधाराची कि शांततेची रे... बाहेरचं जग शांत होत गेलं कि आतला कोलाहल ऐकू यायला लागतो.. एकेक आवाज स्पष्ट होत जातो.. सूर सारेच निराळे.. तक्रारीचा, बंडाचा, प्रेमाचा, रागाचा, काळजीचा... उजळ होत जातो अन नकळत विझतही जातो an शेवटी उरतो तो शांततेचा सूर... ओळखीचा..... रात्रीच्या मिट्ट गाभाऱ्यात उमटलेला मीपणाचा सूर.. पवित्र..नितळ सूर माझा...
...............................................................................................
चहुबाजूंनी वेढून येता अंधारालाच घर म्हणावे...
...............................................................................
भर उन्हात निर्मनुष्य रस्त्याच्या पार टोकाला चमकलं काहीतरी... आणि सोबतच त्या माणसाचे डोळे ही... वाट सापडल्यागत... बाईचं चित्त मात्र अजूनही शून्यात.... रस्त्यालगतच्या माळरानाला पिंगा घालणारी नजर... लक्कन चमकलं काही आणि माणूस हपापला.. केविलवाण्या जगण्याला सन्मान मिळावा तसा.. झेपावणार तिकडे इतक्यात.. थबकला... बाईने न बघता ओळखलेले मृगजळाचे भास माणसाला कळायला वेळ गेला इतकचं...
........................................................................................
काय नाकारत असतो आपण हे कधी कधी आपल्यालाच कळू नये रे..कारण ते तेवढ्यावरच थांबत नाही... आणि कारणांचा शोध असा न कळून संपत नाही... नाकारणं तेवढं आपलं आपल्यापुरता.. आपण आखलेलं... कारणांची सक्ती नसलेलं
..............................................................................................
नक्की किती ठोकरा खाल्ल्या कि शहाणपण येतं... बयो..
.................................................................................................
बयो पूर्वी ज्या वेगाने एखाद्या अनोळखी शहराची, जागेची अचानक ओळख पटायची.. ती आपलीशी वाटायची.. नाळ जोडली जायची.. त्याच वेगाने आताशा ओळखीची माणसं अनोळखी व्हायला लागलीत... त्यांना चिकटलेल्या संदर्भासहित....
.............................................................................................
एखाद्या क्षणाचं देणं आपण फेडू शकत नाही म्हणून लगेच हारतो का रे आपण ? मग अनाहूतपणे ओंजळीत अनपेक्षित सुख ओतणाऱ्या क्षणांना रे काय म्हणायचं ? नाही नं असं वेगळं वागता येत. मग कशाला उगाच या क्षणांचे सल बाळगायचे. जगुयात नं आला प्रत्येक क्षण भरभरून… येतोस सोबत?