Sunday, October 11, 2015

कागदावर लिहिण्याची सवय तशी आता तुटण्यातच जमा... हे असं लिहिताना नं मागे सुटत जाणारा प्रत्येक शब्द न शब्द गोठत जातो.. तो बदलता येत नाही.. सोबतच गोठतात त्याचे अर्थ, संदर्भ, अन त्या क्षणाच्या आठवणीसुद्धा.. हवाबंद डब्यात बंद केल्यागत.. त्यांचं ताजेपण हे असं बाहेरून दिसत असतं.. पण पुन्हा मागे जाऊन अनुभवता मात्र येत नाही..किंवा हवं तसं बदलताही येत नाही.. आहे हे असं आहे हे स्वीकारावं लागतच.. नाही म्हणायला खाडाखोड हा पर्याय आहेच म्हणा.. पण तेही ठिगळ लावण्यासारख... कितीही आपलं म्हटलं तरी उपरं... एकसंधता मोडली कि अस्वस्थता येणारच... मग ते लिखाण असो कि नातं... लय सांभाळता यायला हवी नं..
........................................................................................
काय नाकारत असतो आपण हे कधी कधी आपल्यालाच कळू नये रे..कारण ते तेवढ्यावरच थांबत नाही... आणि कारणांचा शोध असा न कळून संपत नाही... नाकारणं तेवढं आपलं आपल्यापुरता.. आपण आखलेलं... कारणांची सक्ती नसलेलं
...........................................................................................
कोरडं होत जातो रे आपण.. आपल्याही नकळत.. इतके कोरडे कि कधीकाळी आपणही भळभळायचो यावर आपलाही विश्वास बसू नये..पण म्हणून का हे असं एका रात्रीतून होतं? अचानक? नाही रे... हि सुद्धा एक प्रोसेस च.... फक्त विरुध्द दिशेने नेणारी.. कशाचाच काही न वाटण्याची प्रोसेस... कुठल्याच शब्दाला, घटनेला, ..व्यक्तीला react न होण्याची प्रोसेस... कोरडं होण्याची प्रोसेस... अरे पण हे आपण मान्य करतो का? कोडगेपणाचा मुखवटा अन हे असं आतून कोरडं होणं खूप फरक असतो रे.. आटत जातो आपण... सुरुवात अगदी एका क्षणाला अन शेवटही एका क्षणातच... प्रवास मात्र क्षणाचा नसतो न..पण खरंतर आटणं हा शब्दही चुकलाच नं रे.. कारण त्यासाठी मुळात प्रवाही असावं लागतं.. नदीसारखं.. अन आपला तर इथे डोह झालेला . तळ हरवलेला.. कि गवसलाय रे..आत्ता.. नेमका तळ .... ओल हरवलेला... कोरडा तळ...
...................................................................................................

movie marathon day

तुम्ही केलंय का असं कधी? एकाच बैठकीत सलग 3-४ मुव्हीज बघितलेत.. मी केलंय ...बरेचदा ...एक रिकामा शनिवार निवडायचा .. सुट्टीचा ...म्हणजे सकाळी उठायला साधारण ९ -९ .३०...निवांत मस्त मग भरून आलं घातलेला चहा करून घायचा ..आणि सोबतीला पार्ले जी चा बम्पर प्याक ... आणि पहिला मुव्ही सुरु...फास्ट फोरवर्ड करत... गाणी कापत १-२ मुव्हीज निपटवायच्या.. ह्या मुव्हीज कशा.. तर खूप इंटरेस्ट नसलेल्या.पण फक्त हिट झाल्या म्हणून बघायच्या असलेल्या...पण म्हणून अति फास्ट नाही पण स्पीड नॉर्मल...संपवायच्या मात्र पूर्ण..मग एक ब्रेक.. पटकन फोन उचलायचा आणि खायला काहीतरी ओर्डर करायचं..लाईटच हं .. म्हणजे पिझ्झा किंवा रोल वैगरे ... ते येईपर्यंत आवडती प्लेलिस्ट ऐकायची.. अगदीच वाटलं तर फेबु,व्हात्स एप वैगरे चेक... आणि एकदा का ओर्डर आली की ३ रा मुव्ही सुरु..
लोळत रेंगाळत .. मस्त खात पीत.. हा मुव्ही मात्र नीट बघायचा असलेला.. नो फोरवर्ड..नो कट...२ -.२ .३० तास ह्यात नीटच घालवायचे ... मग पुन्हा एक लहानसा ब्रेक...आजूबाजूला पडलेल्या खाण्याच्या डिशेस, कप सिंक मध्ये टाकायचे..बिस्किट्सचे पुडके उचलून बिन मध्ये... ह्या एवढ्यानेही डोक फ्रेश होतं आणि नेक्स्ट मुव्ही साठी प्रीपेर सुद्धा ...आता हा लास्ट मुव्ही …खूप जवळचा … खूप आवडणारा … कितीही वेळा बघितली तरी नव्याने कळणारा ... पुन्हा एकदा चहाचा मग आणि लपटोप…आता संध्याकाळ पर्यंत हा मुव्ही पुरवायची असतो ..पुरवून पुरवून साठवायचा असतो ...रिवाईण्ड पॉज करत …एखदा सीन फोरवर्ड करत … नव्याने जगायचा असतो .. एखदा सीन रडवतो …पण तरी बघायचा असतोच …हळूच पाणावायचं असतं …रेंगाळत राहतो आपण त्या मुव्ही मध्ये ..डोळ्यात पाणी असतं .. हसू असतं …पण आपल लक्ष ..आपलं लक्ष तिथे नसतं . आपण हरवलेलो आपल्यातच …तितक्यात ...तितक्यात आपली रूम मेट येते ..दिवा लावते आणि आपण सटकन भानावर …ती बिचारी काही बाही विचारत असते …पण आपण आपल्याच तंद्रीत सरळ उठून गच्चीवर किंवा घराबाहेर..तो भारावलेला क्षण मनस्वीपणे जपत असतो आपण... कोणाशीही शेअर करायचा नसतो..कोणाला सांगायचा नसतो...बाहेरची मोकळी हवा हळूहळू मोकळ करत असते आपल्याला …आपण रीलेट करत असतो दिवस..पहिल्या मुव्ही पासून शेवटच्या मुव्ही पर्यंत …थकलेलो असतो..कधीतरी मग रूम मध्ये येतो …लक्षात येत अंघोळ नाहीच केलीय आज...गरम पाण्याच्या शोवरची गरज आत्ता अचानक जाणवते...जडावलेलो असतो नं .. तो शोवर मग हलकं करत जातो आपल्याला …डोळे बंद करून बराच वेळ आपण तिथेच..रिकाम होत …भानावर येत …अश्यावेळी रूम मेट खूप महत्वाची ठरते ..तिला नूर कळतो.. ती न विचारता गरमागरम खिचडी लावून ठेवते आपली …आणि laptop वर तिचा मुव्ही माराथोन सुरु करण्या पूर्वी आठवणीने पण सहज सांगून जाते …गरम गरम खाउन घे गं आणि शांत झोपून जा .. जास्त विचार नको करू …मी लाईट बंद करतेय …
तर असा असतो movie marathon day .. मोकळा तरी भारलेला...
स्तब्ध तळ्याच्या देहावर उठणार्या अलवार तरंगांसारखंही असतं एक नातं .. एका क्षणी थेट काळजात घुसणारं .. ह्या वलयांना जन्म देणार्या खड्यासारखं .. अन् दुसर्याच क्षणी हे सल शिवत पुर्वरत होणारं ... असून नसल्यासारखं क्षणभंगूर तरंगांचं नातं..
...........................................................
अशी एक टळटळीत निवांत दुपार.. काम नसलेली..रिकामी..एखादा बस स्टोप बघायचा.. सहसा गर्दी नसलेला..आणि बसायचं तिथे...दांड्याला रेलून..समोरचा तुरळक गर्दीचा रस्ता न्याहाळत..रस्त्यापल्याड्च्या इराणी हॉटेलचा दुष्ट सुस्त मालक.. पोर्यांवर ओरडणारा...त्यापल्याड कोलेजची एक दोन जोडपी.. एकमेकात गुंग.. कोपर्यावरून वळणारी हिशोब करून घरी निघालेली भाजीवाली मावशी.. पोरांना घरी ठेऊन शोप्पिंग ला निघालेल्या टापटीप तयार गृहिणी.. एक न दोन...तुरळक गर्दीतली नमुनेदार लोकं..मजा असते रे त्यांना असं एका कडेने बघणं.. अरे हो त्यात तुझ्यासारखाही असतो बरं एखादा...एक मिटिंग आटोपून दुसर्या मीटिंग साठी पळणारा...पण मधल्या वेळात .. "च्यामारी, आता पुन्हा तो गर्दीचा प्रवास "म्हणत वैतागत टपरीवर एक कटिंग मारणारा...एखाद्या टकाटक आजी असतात भजनी मंडळाला जाणार्या..रस्त्याच्या कडेने पुटपुटत पण लगबगीनी पावलं उचलणाऱ्या.. तरतरीत आजी.. आणि एक आजोबा पण.. आजीपाठोपाठ घराबाहेर पडलेले.. निवांत..आपल्यासारखेच.. तेही त्या बस स्टोप वर येतात..सहज बाजूला येउन बसतात आपल्या .. "काय रे पोरांनो, काही काम धाम नाही का ?"अस दटावून विचारणारे.. पण खरतरं आयुष्यभर जोब केला असतो नं त्यांनी ..या मोकळ्या दुपारची लज्जत त्यांना नीटच कळलेली असते.. त्यामुळे आपण असे मोकळे बघून असूया वाटणारच.. आपल्या उत्तरावर मात्र जम खुश होतात हं ते "ऑफिस तर रोजच असतं हो आजोबा .. अशी निवांत दुपार अभावानेच कधीतरी मिळते.. हो नं "...इतरवेळी दहा प्रश्न विचारणारे.. शंभर चौकशा करणारे हे अनोळखी आजोबा आता मात्र गप्प तिथून निघून जातात..आपण पुन्हा तिथेच.. रस्ता न्याहाळत..एकही शब्द न बोलता अखंड बोलत असतो आपण.. सतत.. दुपारच्या भाजक्या उन्हात आपल्याशीच संवाद सुरु.. पण कशाच्या तरी सुगंधाने माझी तंद्री मात्र चाळवते.. कसला बरं हा सुगंध.. हा मोगरा.. नाही ...जाई.. नाही रे हा ताज्या गुलाबाचा...संध्याकाळी गजरे विकणाऱ्या मावशी बस स्टोपच्या मागच्या सावलीत गजरे विणत कधी आल्या कळालेलं हि नसतं नं..त्यांची ती तल्लीनता.. एकाग्रता..कामातली लय.. एकेक फुल गुंफतानाची काळजी अन गजर्याची गाठ मारताना चेहऱ्यावरचं सुख.. जगाशी काही देणं घेणं नसत त्यांना.. त्यांचं विश्व त्या फुलांमध्ये..अन आपलंहि...मनभरून फुलांचा टवटवीतपणा अन श्वासात त्यांचा गंध भरून आपण पुन्हा पूर्वरत... ताजे तवाने .. रिकाम्या दुपारची झोळी हवी तशी भरल्याच्या समाधानात..
..................................................................................
घाट चढताना एका बाजूला मोठ्ठा डोंगर अन दुसरीकडे खोल दरी... कधीतरी ह्या दरीत पहुडलेले निपचित गाव....दिवसाच्या कुठल्याही प्रहरी बघा, हे गाव स्तब्धच दिसतं... शांत.. अधून मधून आकाशात झेपावणारा पक्षीच काय तो त्या गावाची तंद्री मोडणारा... रंगीबेरंगी छप्पराआड मात्र असते जाग.. मग्न असतो कोणीतरी नेमून दिलेल्या कामात... रात्रीच्या मिट्ट काळोखात लुकलुकत्या दिव्यातून करत असतं कोणीतरी प्रार्थना त्या आभाळातल्या देवाला... अश्यावेळी काय करावं आपण..तर देऊन टाकावा गं बयो अशिर्वाद...हवे ते मिळू दे.. हे समाधान टिकू दे.. आभाळाकडे लागलेल्या डोळ्यातले देव नसतो गं आपण... दरी ओलांडणारा घाट फक्त आपल्याला आभाळाच्या जवळ नेत असतो... त्या क्षणाला उंचावर असण्याचा अशिर्वाद पोहोचवायला हवा नं आपण.. ज्याचा त्याला...
............................................................................................
मैसूर सोप आणि शेगाव काही सुगंधांचं काही जगांशी, घटनांशी, व्यक्तींशी एक खास नातं असतं.. म्हणजे जोन्सन बेबी पावडरचा वास अगदी भर गर्दीत आला तरी समोर गुटगुटीत स्वच्छ बाळ येतं... आईच्या आजीच्या ओलसर पदराचा वास तर कुठेही ओळखू शकतो... काही लोकं तर त्यांच्या खास अत्तरांमुळे ओळखले जातात... तसंच मैसूर सोप आणि शेगाव.. अगदी लहान असल्यापासून मी शेगावला जाते.. kind of routine... मंदिराच्या जवळचं ते भक्तनिवास...त्यातली ठराविक एक खोली आणि नेमकी त्याच्याच जवळून धावणारी धडधडती आगगाडी...थंडीतली पहाट आणि मैसूर सोपचा सुगंध... तेंव्हा न ती खुप महाग असायची.. मोती साबणा सारखी.. म्हणून अश्या खास वेळी वापरली जाणारी ... त्याचा तो मस्त कागदी खोका... आत कागदात लपेटलेली ती चंदनाची वडी... अहाहा... तो कागद कित्येक दिवस पुस्तकात जपला जायचा... अन दरवर्षी नेमाने तो बदललाही जायचा.. एक दिवस वापरलेला साबण मग कित्येक दिवस सोबत करायचा... सणासुदीला पुन्हा पुन्हा निघायचा... पण वर्षभरात दुसर्यांदा काही आणला जायचा नाही .. कदाचित म्हणूनच...ती पहाटेची वेळ.. भक्तीने भारलेलं सभोवताल आणि श्रीमंत मैसूर सोपने केलेली आंघोळ... पावित्र्य.. मंगलमय... शुध्द... ह्या शब्दांचा अर्थ आजही माझ्यासाठी ह्या सगळ्याशीच जोडलेला आहे...
काल काही कामासाठी बाजारात गेले होते.. टिपिकल रिपेअर मार्केट... लहान मोठ्ठ्या एलेक्ट्रीकल, मेक्यानिकल, इलेक्ट्रोनिक्स गोष्टी, त्यांचे स्पेअर पार्ट्स, त्यांचे सर्विस वोर्कशोप्स... असा सगळा माहोल... काल पहिल्यांदाच आले इथे असं नाही पण नेहमीच जाणवणारी एक गोष्ट पुन्हा जाणवली.. ह्या फिल्ड मधलं पुरुषांचं वर्चस्व... ह्या भागात कधीही गेलं तरी मोजून 3-4 बायका दिसतात माझ्यासारख्या... आणि जाणवते ती आपल्यावर खिळलेली नजर पुरुषाची... नाही दरवेळी ती घाण नसते, इथे तर नाहीच...हि नजर असते कौतुकाची, आदराची, आणि कुतूहलाची सुद्धा... खोटं वाटेल कदाचित पण नं कामाची तत्परता सर्वात जास्त मला इथे दिसते... किंवा मी मुलगी म्हणून असेल कदाचित .. पण कधीच इथे मला वाट पहावी लागत नाही... आणि जितका वेळ असते तिथे तितका वेळ मला माझ्या मुलगी असण्याची जाणीव खूप चांगल्या पद्धतीने होत राहते.... thanks to these male dominated industries...बाहेरचं जग मुलींसाठी इतकही वाईट नाही हे पुन्हा माझ्यात रुजवल्याबद्दल....
.................................................................................................................
BRT... आमच्या ह्या भागात गेले वर्षभर हे BRT चं काम सुरु आहे... रस्त्याच्या मधोमध एक मोठ्ठा नीट कुंपण घातलेला रस्ता... आणि मुख्य म्हणजे त्यावर कुठे खोदकाम नाही कि रेतीचे ढिगारे नाही.. मस्त मोकळा गुळगुळीत रस्ता.. चारपदरी.. तर ह्या रस्त्याचं मेन प्रयोजन काही का असेना, लोकांनी त्याचे जे उपयोग शोधून काढलेत त्याला तोड नाही.. म्हणजे सकाळी त्यावर मोर्निंग वॉक होतं, योगासनाचे क्लासेस होतात, हास्य क्लब तर प्रत्येक चौकात... पहाटेच्या वेळी रहदारीच्या मधोमध भर रस्त्यात प्राणायाम कसं काय करतात लोकं हा प्रश्नच आहे म्हणा.... दुपारी हि जागा कामगारांची... कामवाल्या बायका, फेरीवाले, बिनधास्त तिथल्या BRT बस stop च्या शेड मध्ये विसावतात.. आणि जवळपासच्या ऑफिसेसची हि हक्काची पार्किंग स्पेस बरं का.. ऐसपैस.. संध्याकाळच्या वेळी मात्र ह्या जागेचा नूर बदलतो.. दिवसाच्या गुढतेची कात टाकून हा रस्ता रंगीबेरंगी होतो..यंगिस्तान चा कट्टा होतो.. मस्ती मज्जेने गजबजून जातो... त्या पिवळ्या प्रकाशाच्या खाली कधी वाढदिवस साजरा होतो तर कधी फेअरवेल.... एखाद्या गाडीच्या टपावर चढून कधी नाचत असतं कोणी तर कधी बाईकवर कोणीतरी स्टंट मारत कोणाला तरी इम्प्रेस करत असतं... धमाल असते एकूणच.. रात्र चढत जाता बाजूचा मुख्य रस्ता हळूहळू शांत होत जातो... आणि गप्पांमध्ये रंगलेला हा BRT लेन त्या चहाच्या कपात विरघळत जातो...
........................................................................................................
टाळायचा म्हणत जाणून बुजून बदललेला रस्ता जेव्हा पुन्हा त्याच नकोश्या मुक्कामी पोहोचतो नं... तेव्हा लागत जातात अर्थ सवयींचे.. पावलांच्या... मनाच्या... सवयींचे अर्थ...
.......................................................................
काल बरेच दिवसांनी ऐन घाईच्या वेळी भर रस्त्यात फतकल मारून बसलेलं हट्टी पिल्लू बघितलं... शाळेचा ड्रेस, गळ्यात waterbag , पाठीवर दप्तर आणि हे ध्यान रस्त्यात पाय पसरून भोकाड पसरतंय... त्याची आई बिच्चारी कानकोंडी आणि रागावलेली... पिल्ल्याची नेमकी डिमांड नाही कळली पण अजूनतरी आईला त्रास देण्याची, हट्ट करण्याची जुनीच पद्धत हि पोरं वापरताहेत हे बघून बरं वाटलं...
..............................................................................

म्हैस

म्हैस.. अहं हि पुलंची म्हैस नाही.. ह्या म्हशी.. काळ्या तुकतुकीत अंगाच्या, वेलांटीदार शिंगांच्या आणि कळकट्ट शेपटीच्या... तर ह्या म्हशींच घर माझ्या ऑफिसच्या वळणावर.. आणि ते वळण म्हणजे बॉटल नेक... रोजचा ट्राफिक जॅम... आणि त्यात ह्या म्हशींची ही मोर्निंग वाक ची वेळ... झोपाळलेल्या डोळ्यांनी, शेपटीने चिप्पाड काढत आल्सवात ऐन मोक्याच्या वेळी ह्या म्हशी रस्त्यावर उतरतात...बर एका बाजूने चालावं नं तर नाही त्या आपल्या मधोमध... चालली वरात ऑफिसच्या वेळेत रमत गमत... ... गब्दुल म्हशी हॉर्न वाजला कि बिथरणार...दुडूदुडू पळणार.. आज नेमकी मी फ्रंट ला... समोर गुटगुटीत म्हैस.. मी हंड्ल डावीकडे केलं कि तीपण शिंग वळवणार.. अन मी जर गाडी रेज केली कि तिच्या घाऱ्या डोळ्यांनी असं काही बघणार कि मी आहे त्याजागी गाडी बंद करून उभी.. तिच्या बाजूची तिची मैत्रीण अजूनही जर झोपेत अन माझ्या डोक्यातला प्लान चेंज.. आता मी ह्या प्रेमळ झोपाळू म्हशीच्या बाजूने गाडी टाकणार.. मी आगेकूच करणार इतक्यात.. इतक्यात हिची झोप उडवायला त्या तिच्या गलेलठ्ठ मैत्रिणीने हंबरडा फोडला... हम्माआ... त्याचा मला लागलेला अर्थ असा " अग ए उठ, ती सटवी तुला घासून जातेय बघ, तिला जाऊ देऊ नको".. कारण नेमक्या त्या क्षणी मी बरोबर त्यांच्या मध्ये.. खिंडीत अडकल्यासारखी.. दोन्ही बाजूला काळ्या म्हशी अन मध्ये माझी काळी गाडी.. त्या दोन पावलं पुढे.. मी चार चाकं मागे.. त्यामागे मी पुढे... कासवगती सारखं मी म्हैस गतीने समोर सरकत होती. अन सवयीने लक्ष घड्याळाकडे... च्यायला ह्या म्हशींमुळे लेटमार्क? खपणार नाही.. खिंडीत अडकल्या मुळे अंगात बाजीप्रभू संचारले .. अन हंड्लरुपी तलवारीचे चहुबाजूनी वार करत मी शत्रूपक्षावर तुटून पडले... शत्रुपक्ष बिथरला... अचानक झाल्या हमल्यामुळे वाट फुटेल तिथे घुसायला लागला.. पण आमची एकी होती.. माझ्या मागे माझ सैन्य होतंच.. मी धैर्याने पुढे सरकत होते.. आणि ऐन मोक्याच्या क्षणी मला सुटकेचा मार्ग दिसला..नेमका तोच त्या ढूस म्हशीला पण दिसला.. मी गाडीचा वेग वाढवला तसा ती जॉगिंग मोड वर..मी पुढे ती मागे..ती पुढे मी मागे.. चुरशीचा लढा.. त्वेष.. इर्षा.. अन डोक्यात लेटमार्क...टिंग... लेटमार्कच्या विचाराने मी मुसंडी मारली.. एक हात होर्न वर आणि दुसरा स्पीडवर...डोळ्यासमोर लेटमार्क ... अन खिंड पार...हुश...मी जिंकले होते.. विश्वास बसत नव्हता म्हणून मागे वळून बघितलं तर तिच्या डोळ्यात बघून घेईन तुला असा भाव. अन ते बघून घाबरलेल्या माझं ऑफिसकडे प्रयाण...
कोई ख्वाब था शायद , तेरे जाने के बाद मेरे होने का ख्वाब... भला ऐसे ख्वाब कभी सच भी होते है ? और न ही होती है इन ख्वाबोंकी कोई उम्र…… इनसे लम्बी उम्र तो उस कड़कती बिजलीकी थी … पिछले साल बारिश जो तुम्हे अपने साथ ले गयी …… नहीं तो ये ख्वाब .... तेरे जाने के बाद मेरे होने का ख्वाब…दिन दहाड़े ऐसे ख्वाबोंका आँखोंतले पनपना कही उनके सच होने का सबुत तो नहीं .... वैसे भी ख्वाबोंके सच होने का कोई समय नहीं होता और न ही तुम्हारे न होने का… हो सके तो ये वक्त अपने साथ ले जाओ...ये ख्वाब मै रख लुंगी....
.................................................................................................................
पाउलवाटा अशाच तर रेखाटल्या जातात नं ... पावलापावलावर काहीतरी नवीन असतं... टाळता न येणारं अन् म्हणून भिडायला शिकवणारं..कधी उत्सुर्तपणे कवेत घेणारं तर कधी झिडकारणारं..पण नवीन .. कोणाचाही स्पर्श न झालेली पाउलवाट
...........................................................................................................
दरवेळी कारणं असावीच असं नसतं रे.. म्हणजे तू विचारात राहतोस काय झालं ? कोणी काही केलं का ? कोणी काही बोललं का? पण कोणी बोलायची वाट आपण खरंच बघतो का रे ? कधीतरी आपलं मनंच बोलतं आपल्याला आणि विलक्षण दुखावले जातो आपण.. तसं तर मनातलं सगळं आपल्याला ठाऊकच असतं नं.. मी खर्या खोट्याची शहानिशा नाही करणार पण खरं सांगायचं तर हे मनाचे बोलच सगळ्यात जास्त लागट.. म्हणूनच म्हटलं सगळ्याच गोष्टीना कारणं नसावीत आणि असली तरी सांगण्यासारखी नसावीत हो नं
................................................................................................................
शाम की किसी कोनसे आ जाती है रात.. तब याद आते हो तुम.. हाथसे फिसले रेत जैसे वक्त जब दरवाजेपे आके रुक जाता है.. तब याद आते हो तुम.… कही कभी तो ये रात काले बादल ओढ़े आती है.. जैसे कभी तुम आया करते थे.… रंगीन सपने ओढ़े..... ना ये तब बता पायी न अब.… या शायद फिर कभी नहीं.… पर रात की चौखट पे सवेरा अपना पहला कदम रख मुस्कुरा देती है.… तुम अब भी वही उस चौखट पे याद आते हो.……
.....................................................................................................
तळ ढवळला गेला नं कि पाणी गढूळ होणारच रे.. पण म्हणून पाणी वाईट नसतं नं...अवघड असते ती वेळ.. जर ती निवळू द्यावी..वरवरची कील्मिषं निपटून काढावी 
अन तो वर्षानुवर्ष जुना गाळ? त्याचं रे काय करायचं? तोही निपटून काढावा? कि बसू द्यावा त्यला पुन्हा तळाशी... असंच कधीतरी ढवळून यायला... हो नं.. बाकी 
पारदर्शी मन तसंही नकोच नं...
.........................................................................................
एखाद्या क्षणाचं थबकलेलं असणं स्वीकारू शकतो का गं बयो आपण? म्हणजे असा खास वैगरे नाही.. अगदी कुठलाही क्षण..आत्ता तुझ्या माझ्यात घर करतोय तो किंवा असा पटकन निसटतोय तोही... तिथेच थबकला तर... आपण असे राहू शकतो का गं.. त्या क्षणाशी गोठलेले... कदाचित नाही.. कितीही हवेसे असले तरी थांबलेली.. गोठलेली वेळ नाहीच सहन होणार आपल्याला... हो generalise करतेय, कारण ह्या किमान बाबतीत तरी अजून भेदभावाच्या कसोट्या नाहीत... मनुष्य स्वभाव अजून तरी हवा तसा नाही नं मोडता येत.. किमान ह्या बेसिक गोष्टीत तरी...असो.. तर.. तर ह्या वेळेचं थांबणं... का सहन होत नसेल? मी सांगू? म्हणजे चुकीचं असेलही.. पण आपण नं ह्या थांबण्याचा अर्थ सरळ मरणाशी लावतो.. अन घाबरतो...मुळात घाबरणं नं ह्या मरणाला असतं गं , वेळेला नाही.. हो नं? मग विसावायचं का गं ह्या क्षणाशी.. क्षणभर?

सिग्नलपासून साधारण 100 मी वरचा गाड्यांचा वेग हा बघण्यासारखा असतो... हिरवा दिवा पिवळा आणि पिवळा ते लाल होईपर्यंतची त्यांची धावपळ विलक्षण... पण खरा कस कुठे लागतो माहितेय? सिग्नल लाल होताना योग्य ठिकाणी थांबण्यात... करकचून ब्रेक मारावा लागतो.. धक्का बसतो.. चार शिव्याही निघतात..पण अति घाईत होणारा पुढचा अपघातही टळतो... आपले बरेचसे निर्णयही असेच असतात नं ... नेमक्या क्रोसिंगला थांबलेले... नाहीतर अपघात अटळ
..........................................................................................
उत्स्फुर्तपणे लिहिता लिहिता अचानक शाई संपत कागदावर चर्रर कोरडा ओरखडा उमटावा तसा संपतो एखादा दिवस.. भर दुपारी...
..............................................................................................
इथून तिथून सारंच तसं सारखं असतं.. दिवस अन रात्र त्यामधल्या दुपारसकट...एकेकटी ... धावपळ सगळी फक्त वेगळेपण शोधण्याची अन हे सारखेपण टाळण्याची...हो नं?
............................................................................................
समाधान म्हणजे नेमकं काय असतं गं बयो? खूप दिवसांपासून मेहनत घेऊन आपल्या मनाप्रमाणे एखादी गोष्ट घडते तेंव्हा मिळतं ते? कि ध्यानीमनी नसताना कोणाच्या तरी असण्याने कुठल्या तरी एका क्षणाचं सोनं होणं म्हणजे समाधान?? नाही नं सांगता येत? हम्म... ठाऊक आहे मला.. जसं कोणाच्या असण्यावर.. नसण्यावर... एखाद्या क्षणाच्या त्या घटनेच्या घड्ण्यावर आपला ताबा नसतो नं.. तसच असतं समाधान...
.........................................................................................
पहिला पाऊस पडून गेल्यानंतरचा फुललेला मोगरा काही औरच... आसमंतातल्या प्रसन्न ओल्या वातावरणात मोगऱ्याचा नितळ गंध... हा गंध न ऋतू नुसार बदलतो रे...उन्हाळ्याच्या सुरुवातीला कोवळा नाजूक गंध... भर रणरणत्या उन्हाळ्यातल्या तापलेल्या रात्रीचा मादक मोगरगंध...अन हा असा पावसाळ्याच्या तोंडावरचा परतीचा गंध.... समजूतदार.... मला मात्र नेहमी गोंधळात टाकणारा... नुकत्याच उमललेल्या ओल्या मातीच्या मृदगंधाचं स्वागत कि ह्या मोगऱ्याला निरोप...
..........................................................................................
पाउस म्हटलं कि कविता येणार.. नको नको म्हटलं छतावरून ओघळणार्या पागोळ्यांतुन शब्द तळहाती येणार... हाती कॉफीचा मग..त्यात पावसाचा एखादा थेंब.. अन पुढ्यात कुर्कुर्णारी भजी...एक कोरा कागद.. आखीव रेखीव रेघ हरवलेला.. सोबत तितकंच रिकामं पेन..आसुसलेलं... पावसाची शाई करण्याची आयडिया तशी तितकीही वाईट नाही नं... ऐकू येणारा समोरच्या तळ्यातला तो पावसाचा ऑर्केस्ट्रा.. अन त्यात जर पाउस रात्रीचा असेल तर स्ट्रीट लाईट मध्ये रंगलेला त्या सरींचा लाईट शो... पाउस म्हटलं कि ग्यालरीतल्या कठड्याला रेलून उभा ध्यानस्त तू अन तळहाती साचलेल्या शब्दांना मुक्त करणारी मी.. अन नुकत्याच जन्माला आलेल्या ह्या नव्या कवितेसोबत.. आपण...एकरूप..
.................................................................................................
क्षण म्हणजे नक्की काय रे असतं? हे वेळेचं परिमाण म्हणावं तर ह्याचं मोजमाप काय? किती सेकंदांचा, मिनिटांचा, तासांचा एक क्षण? सांगू शकतोस? नाही नं.. मी सांगू? क्षण म्हणजे सकाळच्या कोवळ्या उन्हासोबत सारवलेल्या ओल्या अंगणात उतरलेली भूपाळीची मंतरलेली ओळ... क्षण म्हणजे श्वासांच्या अंतरावर घुसमटलेली अन तरी निसटलेली ती नितळ पावसाची सर... क्षण म्हणजे दव भारल्या धुक्यातली ती गर्भरेशमी ऊब...क्षण म्हणजे... खरं सांगू ? क्षण म्हणजे अनुभव... जिवंत असण्याचा जिवंत असण्याला आलेला जिवंतपणाचा अनुभव !

मावळतीच्या पाउलखुणा काही तितक्याश्या बऱ्या नसाव्या.. कुठेतरी काहीतरी निसट ल्याची हि बोच कोरत बसते मनाचा कोपरा न कोपरा... एक शोध अखंड मागे ठेऊन जाते हि सांज... शोध परतीचा... शोध ' मी' चा... अंधुकश्या वाटेवरचा अंधुक प्रवास अधोरेखित करणारी मावळण... माझी...

....................................................................................................
त्येकाला एक काठ नेमून दिलेला असतो बयो अन जो तो तिथूनच घेत असतो अंदाज तळाचा.. त्या स्तब्ध डोहाच्या.. प्रश्न इतकाच कि ज्याला तळ गवसला त्याचा काठ कोणता..
..................................................................................................
काय नाकारत असतो आपण हे कधी कधी आपल्यालाच कळू नये रे..कारण ते तेवढ्यावरच थांबत नाही... आणि कारणांचा शोध असा न कळून संपत नाही... नाकारणं तेवढं आपलं आपल्यापुरता.. आपण आखलेलं... कारणांची सक्ती नसलेलं
..................................................................................................
खूप बोलायचं असतं बरेचदा ... पण घशातून आवाज मात्र शून्य ... नाही म्हणजे अडखळायला वैगरे नाही रे होत पण ओठांवर उमटलेले शब्द तुझ्यापर्यंत पोहोचतील का? हि धास्ती .. भीती नाही रे .. insecurity सुद्धा नाही... फक्त धास्ती.. अन ती ह्या पोहोचू न शकण्याची... धास्ती तुझ्यापर्यंत न पोहोचलेले माझेच शब्द माझ्याकडे परत आले तर हि...पेलवेल का रे ? मीच मला...
...............................................................................................
जसं जन्मापासून कोणी वाईट नसतं तसंच कोणी इतकंही चांगलं नसतं गं बयो... पहिल्यातली गरज अन दुसऱ्यातला स्वार्थ तेवढा समजून घे...
.....................................................................................................
सुंदर सुग्रास जेवणाने सजलेलं ताट समोर यावं आणि नेमका त्यातच एक केस दिसावा.. तसा असतो एखादा दिवस...अन एखादा क्षण त्या केसासारखा... लगेच निपटून काढला तरी मनात रेंगाळणारा... दिवसभराची धावपळ दगदग संपवत रात्र अशी उशाशी आली न कि अनाहूतपणे तो क्षणही येतो... खरतरं इतकं काही नसतं त्या क्षणात...न प्रश्न न उत्तर... पण मन गढूळ करण्याचं सामर्थ्य मात्र नक्कीच... असे किती साचलेले गाळ.. हे क्षण... किती काळ जपायचे रे
.....................................................................................................
तळ्याच्या काठाकाठाने फिरताना अंदाज घेत राहावा त्याच्या खोलीचा... स्वतःला जपत.. हळुवार सावधतेने पावलं उचलत कुतूहलाने डोकावावं अन अचानक तोल निसटून सरळ तळ गाठावा..बस इतकाच सहज असतो प्रवास .. मनापासून...मनाचा
.........................................................................................................
काहीतरी छान वाचायचं यार.. एखादा छान मूवी बघून जमाना झालाय रे... ए एक छान गाणं ऐकव नं... कितीदा वापरतो आपण हा छान शब्द... पण हे छान म्हणजे नक्की काय हे कळतं का रे आपल्याला कधी... कि नुसताच पाठलाग... मला काय वाटतं माहितेय? छान म्हणजे काय वाईट नाही ह्याची जाणीव... ती जाणीव अनुभवातून निर्माण झालेली.. शेवटी काय.. काय नको हे कळलं कि काय हवंय हे नेमकं कळतं.. नाही का?
............................................................................................................
काही गाणी काही सुरावटी वेड्याच असतात नाही.. एखादा साधासाच प्रसंग तर कधी एखादी खासमखास कुणीतरी नकळत विणत जातात त्यांच्या सुरात.. मग भर गर्दीत अगदी कुठूनही नेमक्या कानावर येतात अन् अख्ख्या पब्लिकच्या नजरेत वेडपट ठरवतात रे ..नकळत उमटलेलं एक निसटतं हलकं स्माइल..एक लाजलेली पापणी..उगाचच एक उसासा..तर कधी एक ओघळता थेंब.... अन् सुखावलेलं एक बावरं मन..खरंच येडीच असतात रे काही गाणी .स्थळाकाळाचं भान सोडलेली...

मित्रा,
हि दिवेलागणीची वेळ आणि रिमझिमता पाउस.. संततधार.. उसंत अशी नाहीच.. तसंही कलत्या दिवसाबरोबर थांबायला तो तुझ्या-माझ्यासारखा चाकरमानी नाही नं..तो मुक्त.. मोकळा.. स्वत:च्या धुंदीत हरवलेला..आपली मात्र धांदल.. सांज आणि पाउस ह्या दोघा साख्यंचा मनासारखा मेळ घालायची धांदल...दिवसभराच्या कामाने शिणलेला देह अन पावसाच्या ओल्याचिंब स्पर्शाने फुललेलं मन.. कशी रे सांगड घालायची? .. ह्या अश्या गडबडीत हे मन नं गावाची वाट पकडतं..
अशा पावसात हटकून गावाकडची संध्याकाळ आठवते.. आषाढ लागला नं कि अचानक एक दिवस संपर्क तुटायचा गावाचा... हे चार महिने गाव म्हणजे स्वत:तच मिटलेल एक स्वप्नं असावं... हिरवंगार स्वप्न.. अन अख्खं गाव ह्या स्वप्नात रमलेलं.. जो तो घरात बंद..कारण बाहेर पडायचं म्हटलं तरी पावसाचा हा पडदा कोणं नं बाजूला सारणार? संध्याकाळ मात्र हे धाडस करायची..वेशीवर उभ्या दिवसाला ओलांडून सांज अंगणात यायची..उंबरठ्यावरून हाक मारत रात्र ओटीत ठेवायची..नेहमीची कलतीची सोनसळी उन्हं नसायची म्हणा सोबतीला, पण न चुकता एखादी लख्ख वीज मात्र देऊन जायची.. इवल्या रात्रीला सोबत म्हणून... देवघरात तेवणाऱ्या मंद नंदादीपाच्या प्रकाशात मग पावसाची सर न सर उजळून निघायची.. आणि शुभांकरोतीच्या सुरात हि सांजवेळ नकळत पसार व्हायची..
मिट्ट काळोख्या रात्री मनभर ऐकलेला तो गावातला पाउस कधी शहरात आलाच नाही रे..
बयो, 
संवाद साधायचा असतो की नकळत साधला जातो? म्हणजे बघ नं वर्षानुवर्षं गप्प तू अन अख्ख्या जगाची अखंड बडबड सोबतीला घेऊन वणवण भटकणारी मी.. आपल्यात संवाद आहे का गं ? स्पर्शाला भाषा नसते म्हणतात तसं संवादाचंही असतं नाही का? .. मौन हासुद्धा संवाद असतोच नं.. अन ह्या मौनाची जी भाषांतरं होतात तो संवाद तर निव्वळ विलक्षण...
. बयो, मृत्युशी घडलाय कधी संवाद तुझा? अशी हसतेय काय ? त्याच्या इतका बोलका जन्मही नसतो गं.. वेळोवेळी खुणावणारा, तरी चकवणारा मृत्यू सतत जाणीव करून देत असतो, सांगत असतो 'मी आहे बरं का' .. त्याचं बोलावणं येईल म्हणून तर इतकं घाईत जगत असतो नं आपण..
. बयो वेग हवा गं जगण्याला.. शक्य तितकं अनुभवता आलं पाहिजे.. जगता आलं पाहिजे.. नाहीतर श्वास घेण्यातच सरायचा अख्खा जन्म...
. ह्या जगण्याशी अन पर्यायाने आपल्यातल्या स्वतःशी हरवलेला संवाद नव्याने सांधायचा का गं ?
बयो,
सगळं कसं स्तब्ध... हे भरून आलेलं आभाळ, एकसुरी पाउस,वाहणं विसरलेला वारा, तेच शहर, तीच घरं, तेच रस्ते अन तीच माणसं.. सगळं तेच.. वर्षानुवर्ष जिथल्या तिथे... कशातच बदल नाही... सवयीचं झालंय आताशा पण तरी एक अस्वस्थता मनात घर करून बसलीय.. आणि त्यात भर म्हणजे कानात रुंजी घालणारं हे गाणं.. 'दिल-ए-नादान तुझे हुआ क्या है'... कारणं कळायला हवीत गं.. ह्या अस्वस्थतेची.. ह्या रितेपणाची.. कारणं ह्या जाणिवांची... नाहीतर हे असं नुसतं वेळी अवेळी पाणावणं काही बरं नाही.. खूप जुन्या ओळखीच्या डोळ्यात अनोळखीपण कसं काळजाला हात घालतं तसं काहीसं हे...
बयो, जीव कसा गं जडतो? सवयीतून? सोबतीतून? कि कोणीतरी अगदी आपल्यासारखं असतं, त्या त्याच्या /तिच्या असण्यावर जीव जडतो? हि जाणीवच मुळात विलक्षण असावी नं.. सुखावणारी... मालकी हक्क सांगणारी.. पण मग हक्क संपल्यावर ही जाणीवही विरायला हवी नं... हम्म.. तसं होत नाही .... बरोबर नं..
जब कि तुझ बिन नहीं कोई मौजूद
फिर यह हंगामा ए खुदा क्या है?
वेस हरवल्या गावासारखा भरगच्च प्रांत हा.. रोज नव्या जाणीवेचं नवं घरटं .. अन जुन्या जाणिवेकडे दुर्लक्ष....
पण जाणीवा मरत नाही गं.. गोठतात फार तर.. तुझ्या माझ्यात गोठ्ल्यात तशा.. अन म्हणूनच हे जाणीवांचं अस्वस्थपण मिरवत आपल्यातलं जिवंतपण म्हणतंय

दिल-ए-नादाँ तुझे हुआ क्या है?
आख़िर इस दर्द की दवा क्या है?
बयो, 
संवाद साधायचा असतो की नकळत साधला जातो? म्हणजे बघ नं वर्षानुवर्षं गप्प तू अन अख्ख्या जगाची अखंड बडबड सोबतीला घेऊन वणवण भटकणारी मी.. आपल्यात संवाद आहे का गं ? स्पर्शाला भाषा नसते म्हणतात तसं संवादाचंही असतं नाही का? .. मौन हासुद्धा संवाद असतोच नं.. अन ह्या मौनाची जी भाषांतरं होतात तो संवाद तर निव्वळ विलक्षण...
. बयो, मृत्युशी घडलाय कधी संवाद तुझा? अशी हसतेय काय ? त्याच्या इतका बोलका जन्मही नसतो गं.. वेळोवेळी खुणावणारा, तरी चकवणारा मृत्यू सतत जाणीव करून देत असतो, सांगत असतो 'मी आहे बरं का' .. त्याचं बोलावणं येईल म्हणून तर इतकं घाईत जगत असतो नं आपण..
. बयो वेग हवा गं जगण्याला.. शक्य तितकं अनुभवता आलं पाहिजे.. जगता आलं पाहिजे.. नाहीतर श्वास घेण्यातच सरायचा अख्खा जन्म...
. ह्या जगण्याशी अन पर्यायाने आपल्यातल्या स्वतःशी हरवलेला संवाद नव्याने सांधायचा का गं ?
मित्रा, 
गेला तासभर ह्या एका शब्दाशीच अडखळलेय... लिहावं न लिहावं ह्या कन्फ़ुजन मध्ये...तसंही न लिहिलेलं पोहोचेलच तुझ्यापर्यंत.. हे टाइप करणं काही खरं नाही रे, ओलावा हरवतो... त्यापेक्षा कागदावर उमटलेली थरथरती अक्षरं बरी... काळजात उठलेली कळ ती अक्षरांची धार नेमक्या जागी पोहोचवते ... आता ह्यात कसं नं,मला पोहोचताच येत नाहीये तुझ्यापर्यंत.. 
स्वतःचा स्वतः पर्यंतचा प्रवास दमवतो नं रे... अश्यावेळी प्रत्येकाची रिअक्ट होण्याची पद्धत वेगळीच.. जशी तुझी, कोशात जाण्याची...किमान श्वास घेण्यासाठी एक फट उघडताना समोर मला बघताच क्षणार्धात पुन्हा कोशात गुडूप होणारा तू तसा सवयीचा .. तुझ्या डोक्यातला चिखलही ओळखीचा..तुझा त्रागा ओळखीचा ...अनोळखी फक्त तुझी घालमेल.. तू तुझ्यात असताना माझा माझ्याशी झालेला संवाद तुझ्यापर्यंत पोहोचवण्याची माझी अधीरता... अन वाट पहाणं तुझा ओळखीचा तू होण्याची ... सवयीचा तरी दरवेळी नव्याने समृध्द करणारा हा प्रवास तू तुझ्यात परतशील तेंव्हा सांगेल
नक्की

सई


........................................................................................