Sunday, October 21, 2012

मध्यरात्री अवचित जाग आली कसल्याश्या घनगंभीर आवाजने.. खिडकिबाहेर डोकावले तर हा दिसला.. एका अनामिक ओढीने मातिकडे झेपावणारा...किती तीव्र होती ती भेटीची आस.... थोडावेळ नुसतचं अनुभवलं त्याचं कोसळणं..बरसणं.. तर पठ्ठा आला न लगेच गप्पा मारायला.. किती किती अन् काय काय बोलायचं होतं त्याला..थेंबा-थेबांची कथा..व्यथा.. त्या काळ्याकुट्ट ढगांआड आजवर दडवलेलं... लख्खकन चमकणार्या विजेची तगमग.. अन् गडगडणार्या त्या प
ोकळ ढगांचा त्रागाही.. बिनकामाचा शिक्का मारला होता नं त्यांच्या माथी... सारं सारं बोलायचं होतं त्याला... अविरत बरसत होत्या सरीवर सरी.. आणि उलगडत होता माझा पाउससखा.... किती रंगांनी, किती ढंगांनी व्यक्त होता वेडा रात्रभर.. त्याची एकेक अदा बघत, ऐकत कधी रात्र सरली समजलचं नाही.. पहटेसच हाही थकला बहुदा.. त्यालाही एका क्षणाची उसंत हवीच नं... अन् गेला बापडा आला तसाच... तो गेल्यावर मात्र उमगलं आता कसं सारं स्वच्छ, ताजं तवानं.. नुकत्याच जन्मलेल्या बाळासारखं निरागस...कसल्याश्या त्रुप्ततेने ती धरणीही सुखावलेली.. अन् मी? मी मात्र त्याच्या बरसण्यातच हरवलेली.. अजुनही..

काळभोर आभाळ

दिवसभरात साचून साचून घुसमटलेल काळभोर आभाळ ऐन मावळतीला जेंव्हा धाय मोकलून बरसायला लागत तेंव्हा कोण जाणे का पण मनात एका अनामिक, अस्पष्ट भीतीची रेष उमटते...नकळतच कुठल्यातरी अशुभाची चाहूल मनात काळजीच काहूर उठवत... उतरत्या सांजेचा हा पाउस मग रात्रभर रडत बसतो...एकट्या रात्री एकटाच मोकळा होत....
रिमझिम बरसती इन बुंदोंने भी इक किस्सा सुनाया था कभी...बादलों के बिच हुए गडगडाते झगडे का किस्सा.... इसी दौरान चंचल बिजली का चुपकेसे धरती मां के पैर छुनेका किस्सा....सात रंग मे नहाये सतरंगी का किस्सा.. और..और.. और हां कुछ दिवानो के किस्से भी तो थे उसमे.... एक किस्सा सुनाते सुनाते न जाने कितना कुछ बता गयी वो बारीश....और बहोत कुछ अनकहा भी शायद.. सहमे हुए दिलमे टपटपाते हजारो ख्वाईंशोंकी आवाज शायद इसी रिमझिम ने तो सुनी थी...शायद आज ये किस्सा भीसुनायेगी और कही..

श्रावण

एका टोकाला गच्च दाटलेलं आभाळ.... कोसळण्याच्या बेतात... अन दुसर्या टोकाला निखळ लख्ख उन्हाचे भास...दरवेळी निरोपाच्या क्षणी कसा रे हा श्रावण तुझ्या चेहऱ्यावर बहारायचा..
रात्रभराच्या मुसळधार पावसानंतर उगवणारी पहाट किती प्रसन्न वाटते न... नुकत्याच आंघोळ केलेल्या बाळासारखी..स्वच्च..निरागस.... सृष्टीच गात्रनगात्र ताजतवान...ओलीचिंब हिरवीगार धरती सूर्याची पहिली कोवळी किरण झेलण्यासाठी आतुरलेली..दूरवर कुठल्यातरी मंदिरातून ऐकू येणारी काकडारती... नकळतच नाकाला जाणवलेला धुपाचा वास... अन त्या दिशेला आपसूकच जोडलेले हात..सगळच विलक्षण...पुढे मांडून ठेवलेला अवघा दिवस सुंदर जाणार ह्याची ग्वाही देणारी पहाट..
खूप शहाण्यासारखं वागतो न आपण..तेही अगदी रोजच्या रोज... कधीतरी अगदी चुकुनही थोड वेड्यागत, निर्धास्त, नाहीच न जमत वागायला...काल 'बर्फी' बघताना नेमक हेच डोक्यात घोळत होत.. हा काय म्हणेल तो काय म्हणेल इस चक्कर मे साला खुदके दिल कि सुनना तो रह हि गया.... काहीतरी निसटत असत नेहमीच हातून..तरी हक्काच बरचस नाहीच सांभाळता येत न.... खर सांगायचं तर बर्फी अन झिलमीलचा हेवा वाटत राहतो पूर्ण वेळ तो ह्याचसाठी....... ह्याच जगात राहताना, दुनियादारी पाळताना, स्वत:चच एक खास विश्व उभारता आल तर किती बर होईल न....

म्रुण्मयी

पुस्तकाचं नाव-म्रुण्मयी
लेखक- गो.नी.दांडेकर
नुकतच गो.नि.दांडेकरांच ' मृण्मयी' वाचल.... अतिशय सुंदर अनुभव... एखाद पुस्तक वाचल्यानंतर येणार भारावलेपण मला तस सवयीच...पण हि मृण्मयी खूप खोलवर परिणाम करून गेली... कथा फिरते ती 'मनु' भोवती....गरीब,सोशिक, सध्या सरळ मनाची मनु ... तरी स्वाभिमानी, मानिनी मनु...तस तर कुठल्याही कादंबरीची नायिका अशीच असते न..एकदम आदर्श स्त्री? मग मनुत अस काय वेगळ? मनुच वेगळेपण सिद्ध करते ती 'ध्यानेश्वरी'... मनु म्हणजे चालती बोलती ध्यानेश्वरी... ध्यानेश्वरीच पठन करन आणि ती समजन ह्यात बराच फरक...पण मनु लहान वयातच ध्यानेश्वरी जगली..कदाचित तिथेच तीच दैवत्व उमगत.. दैवी वाटतानाच मनु सर्वसामान्यहि वाटते ते तिची जन्मभूमीची ओढ बघून, जोडलेल्या प्रत्येक नात्याला जपण्याची तिची धडपड बघून...कदाचित म्हणूनच मनु मनात रेंगाळत राहते...

जन्मठेप

पुस्तकाचं नाव- जन्मठेप
लेखिकेचं नाव- गिरिजा किर
गिरिजा कीर... आजपर्यंत ह्यांच्या लेखनापासुन मी कशी काय अनभिध्न्य होते कोण जाणे... त्यांचं 'जन्मठेप' वाचलं अन मी सुन्न..तुमच्या आमच्या जीवाचा निव्व्ळ ज्या शब्दानेच थरकाप उडतो त्या ज्न्मठेपेची शिक्षा झालेल्या कैद्यांचं भावविश्व किती सहज मांडलयं लेखिकेनी... सगळेच कैदी हे अट्ट्ल गुन्हेगार नसतात नं, मान्य आहे की एखाद्या रागाच्या क्षणी त्यांच्याहातुन चुक घड्ते.. सुधारता न येणारी चुक.. पण म्हणुन त्यांचा जगण्याचा हक्कच नाहीसा होतो का? आणि चुक कोणाच्याही हातुन होउ शकते नं?? खरे जन्मठेपेचे असे कितीतरी कैदी देशाचा कारभार चालवत आहेत.. प्रत्यक्ष कीवा अप्रत्यक्ष.. जाउ दे तो वेगळा विशय झाला.. शिक्षा व्ह्यायलाच हवी हे मान्य ( संविधान तसच सांगतं नं) पण जन्मठेपेच्या 14-15 वर्षांनंतरही त्यांना जगण्याचा हक्क असु नये.. एका चुकलेल्या क्षणाची आयुश्य ही किंमत??? समा
जाने नाकारलेल्या,कुटुंबाने हाकललेल्या ह्या तरुणांनी करायचं तरी काय? पश्चाताप तर त्यांना कधीच झालेला असतो अन त्याची शिक्षा पण भोगलेली.. मग पुढे काय?कैदेतुन बाहेर पड्ल्यावर जर मरेपर्यंत ही अशी वाळित टाकण्याची शिक्षाच होणार असेल तर पुन्हा गुन्हा करुन हक्काची कारग्रुहातली शिक्षा का नं भोगावी?? असा विचार ह्या 'जन्मठेपेच्या' कैद्यांनी केला तर खरच काय चुकलं त्यांचं?? त्यांनाही मन असतं.. जाणीवा असतात हे कधी समजणार समाज??? काराग्रुहात गुन्हे घडायला लागल्यावर बहुदा उघड्तील डोळे... गिरिजा किर नावाच्या ह्या माणुसकीचा मात्र अभिमान वाटतो.. उतारवयातही ह्या तरुणांना समजुन घेण्याची त्यांची माई बनण्याची जी जिद्द त्यांनी दाखवली त्याला तोड नाही... बाकि पुस्तकाची भाषा,व्यक्तीरेखा(खर्या), प्रसंग.. सारं सारं गौण ह्यापुढे..

Tuesday, August 28, 2012

रितेपण

कशी ही अवस्था 
कुणाला कळावी
कुणाला पुसावी 
कुणी उत्तरावी..
(संदिप खरे)
मुसळधार पावसातलं हे असं अव्यक्त अस्वस्थ साचलेपण....बघ नं भर दुपारचा तो असा कोसळतोय अन् माझा मात्र प्रयत्न एकवटण्याचा... असलेलं..नसलेलं.. सारं सारं....वहावत जाण्याला जणू अचानक ब्रेक लागावा तसं झालयं....
वाटेवर ह्या भविश
्याच्या
हवाहवासा सोबती भुतकाळ
डोळ्यात स्वप्न जिंकण्याची
मनी रेंगाळतो गतकाळ
रोजचं एक रुटीन... सकाळपासुन संध्याकाळ.. अन् त्यानंतरची रात्र...पण ह्या दोहोंच्या मधली ही मावळण?... अनामिक हुरहुरीची ही सायंकाळची वेळ मात्र उतरत जाते..साचत जाते मनात......आणि आपण सोडतो एक निःश्वास ह्या वाढलेल्या साचलेपणासाठी..की रितेपणासाठी रे?
वरवरचे भारलेपण
खरा रिकामाच गं गाभारा
डोकव तिथे जरा खोल
ऐक रितेपणाचा हुंदका
उगाचच आपलं मनात एक खुळ.. भर गर्दीत आपण एकटं असण्याचं.... लहानपणापासुनचे सखे अचानक ह्या गर्दीत जणु हरवुन गेलेले... पण जगाची रित गं कशी विसरायची? वाहत राहा.. थांबला तो संपला.. अन् माझं तर हे असं.. साचलेपण.... वेड्यागत सरल्या क्षणांना पुन्हा जगण्याची धडपड.... वरवर सगळं सामान्या..रुटिन जगणं.. अन् आत मात्र धगधगता ज्वालामुखी...थंडावण्याची वाट बघत...

"पाउसवेळा"

छपराआडुन कोसळणारा पागोळ्यांचा पाउस....
बरसुन बरसुन थकलेला अन् मग डबक्यात पहुड्लेला पाउस...
मातकट लाल पाण्यातल्या कागदी होड्यांमधला पाउस...
गच्च काळ्या रातीचा फ़क्त कानांनी झेललेला पाउस...
उनाड भटकत्या वार्याच्या ओल्या स्पर्शातला पाउस...
.
.
.
ह्या आणि अश्या असंख्य "पाउसवेळा" अगदी घट्ट जपल्यात उराशी..
..
पाउस हरवला तर रे????

Tuesday, June 12, 2012

वर्तुळ

प्रत्येक वाकल्या रेषेचं वर्तुळ होत नाही हेच खरं.. कितिही गोल गोल फिरलं तरी वळणांचं वर्तुळ थोडचं होतं.. वर्तुळास लागतो एक् मध्यबिंदु.. त्याला आपल्याशी जखडुन ठेवणारा..वरवर दिसते ती परिघाची एकनिष्ठता..केंद्रबिंपाशी जपलेल तिचा प्रामिणिकपणा.. की ह्या सगळ्यांच्या आड लपलेली असते लाचारी? पण जेव्हा वर्तुळाचं अस्तित्वच मुळात कंद्रबिंदुमुळे तेव्हा कसली आलीय मजबुरी?तसंही वर्तुळाची त्रिज्या काय किंवा व्यास काय.. वर्तुळाची सारी अंतरं येउन थांबतात ती केंद्राशीच..
खरतरं वर्तुळ म्हणजे तरी काय रे? असंख्या भल्या बुर्या बिंदुंचाच नं तो समुह.. पण मान मात्र केंद्राचाच.. कारण जगण्याचं हे वर्तुळ पुरं करायचं तर परिघावरच्या प्रत्येक थेंबाला झुकावं हे लागतचं.. प्रत्येकाचा कोन निराळा... अढळ मात्र फक्त एकच.. केंद्रबिंदु..नाही म्हणायला अनेकदा विचारांची भलीमोठी रांग येते हे वर्तुळ विस्कटायला.... कधी कधी विभागतं ते ही.. पण हे सारं क्षणिक... कारण परिघाचं अन् केंद्राचं नातंच मुळी अस्तित्वाला धरून..... विस्कटण्याच्या नेमक्या क्षणाला सापडतो एक नवा केंद्रबिंदु.. नव्या परिघाच्या शोधात.. अन् होतो पुन्हा एक जन्म नव्या वर्तुळाचा..
नक्की कुठल्या रे वळणावरची भेट आपली?
एका बाजुला जीव दडपवणारी दरी..अन् दुसरीकडे उरावर येणारा उंचच उंच काळा कातळ..आणि मी? मी ह्या दोहोंच्या अगदी मधोमध... स्रुष्टीच्या आसवांत नखशिखांत भिजलेली... अन् तुही तसाच... ओलाचिंब..त्या घनगंभिर श्रावणसरीत तसाच आनंदाने बहरणारा... तुझ्यामाझ्यातला फरक काय तो इतकाच.. आसवांचा अन् श्रावणसरीचा...
ओंजळी भरभरून मोत्यासारखी सुख ओतलीस माझ्या पदरात ..मी मात्र अनभिध्न्य .. ह्या सार्यापासून दूर .. माझ्याच कोशात बंदिस्त ... स्वखुशीने .. तू मात्र रित्या ओंजळी पुन्हा पुन्हा भरून घेण्यात गर्क...मी खिडकी पल्याडच्या त्या मुक्त आभाळात हरवलेपण शोधणारी .... स्वतःच्या दु:खाना कुरवाळत..नशिबाला दोष देत भकास नजरेने श्वास मोजणारी ...गमावलास तर तू हि होतस माझ्यासकट बरच काही ....पण...तू दिलेल्या सुखाने ओसंडून वाहत्या पदराकडे बघितलाच नाही रे मी कधी .... तू मात्र माझ्या मागेच ... नाही आधारासाठी नाही ... तू द्यायचास फक्त आश्वासक सोबत.. . माझ्या मीपणाच्या कोशाला कधी चुकुनही नाही दुखावालास तू ....लढायचं तर मलाच होत .. पण तू ढाल बनलास माझी .. इतका आपला असूनही नेहमी माझ्या डोळ्यातलं परकेपण कस रे साहलस? मुक्त तर कधीच झालास तू.. पण आजही माझ्यासाठी हि स्वखुशीची कैद का? कि तुला उमगलीय माझी शेवटची ओढ?कारण आताशा मला दिसते कधी कधी तुझी नजर सर्वस्व हरलेली... आणि पुन्हा तुझे तेच प्रयत्न माझ्यासकट नियतीवर मात करण्याचे...

जन्मगाव...

जवळपास 6-7 वर्ष झालीत आता घरापासुन दुर येउन.. आधी शिक्षण,मग नोकरी... चालायचचं..कुछ पाने के लिये कुछ खोना भी तो पडता ही है.. पण इतक्या वर्षांनंतर आजही जेव्हा घरुन निघते तेव्हा माझ्यातलं काहीतरी मागेच रहिल्याचं जाणवतं... गावाची हद्द ओलांडताना मागे वळुन पाहणं मी सहसा टाळते.. उगाच पाय अडखळला तर... पण पुदच्याच वळणावर हटकुन मागे बघितलं जातं.. डोळाभरुन हे माझं हक्काचं गाव मनात भरुन घेण्यासाठी....लहानपणी आजी सांगायची आपली नाळ जोडली असते गं आपल्या गावाशी.... तेव्हा काही कळायचं नाही... वाटायचं असं कसं मलातर आजीच्या गावी यायची किती घाई असते..कधी एकदा सुट्ट्या लागतात अन् मी आजोळी जाते असं व्हायचं.. मग माझी नाळ आजीच्या गावाशी जुळायला हवी नं.. पण सुट्या संपताना मनाला लागलेली घराची ओढ तेव्हा लक्षातच आली नाही... खरं सांगायचं तर तशी सगळीच शहरं सारखी.. पण प्रत्येकाच्या मनात स्वतःच्या गावाचं एक खास स्थान..निमित्त काहीही असो.. पण गाव सोडताना मनाची अशी काही कालवाकालव होते नं..मनावर प्रचंड दडपण... एक भिती.. असुरक्षितता.. उभं जग जणु खायला उठलयं..
तसं तर आजवर मला भेटलेल्या प्रत्येक गावानं मला आपलसं केलयं.. मला रमवलयं...नंदुरबारने माझं बालपण जपलं, नागपुरने मला माझ्या पायावर उभं केलं, अन् पुण्याने पोट्यापाण्याला लावलं... खरचं खुप दिलयं ह्या शहरांनी आजवर... पण तरिही जन्मगावाची ओढ तशीच... अन् गाव सोडतानाची दरवेळीची रितेपणाची जाणिवही सवयीची.. तरीही नवी..

Sunday, May 6, 2012

सरत्या काळानुसार लोकं बदलतात,त्यांच्यांशी जोडलेली नात्यांची समिकरणं बदलतात... भावना बदलतात... आणि खरच हा बदल एक अविभाज्य भाग बनत जातो आपल्या जगण्याचा..आपण ही सवयीचे गुलाम..स्वीकरतो हे सारे बदल... रोजचाच दिवस उगवतो अन् तसाच मावळतो...आपण पुढे सरकत राहतो..पण अचानक एक दिवस स्वतःलाच स्वतःची ओळख अनोळखी भासते..त्या नेमक्या क्षणाला बदलांची सवय झालेलं आपलं मन हा बदल मात्र स्वीकारायला तयार नसतं... आपल्या आप्तांकडुन जेव्हा ह्या बदलाला नाकारलं जातं तेव्हा खरतरं मुळापासुन हादरतो आपण.. आणि त्याच सुन्न मनस्थितीत विचारत बसतो स्वतःलाच.. नेमकं कुठल्या वळणावर हरवलं ते माझं हवंहवसं मीपण.. खरखुरं.. मुखवट्याशिवायचं... अन् मग सुरु होतो तो हा शोध.. भविष्याच्या वाटेवर चालताना भुतकाळात डोकावुन हरवलेलं गवसतयं का ते शोधायचा अविरत चालणारा खेळ.. तुम्हा आम्हा सार्यांचाच...
व्यक्त होणं..एक गरज बनत चाललीय आताशा... वरवर सारं शांत..पण..आत.. मनाच्या तळाशी एक अशांत खळबळ... एक ज्वालामुखी..कदाचित स्फोटाची वाट बघत.. की तोही असाच शांत होणार कोणाच्याही नकळत.. पुर्वीसारखा.. नाही आता बहुदा नाही तसं होणार..कारण व्यक्त होण जमतय थोडं थोडं... आपल्या प्रत्येकाचं एक माध्यम असतं नं असं व्यक्त व्हायचं... कदाचित तीही एक कलाच असावी.. किंवा कुठल्याही कलेचा मुळ उद्देशच व्यक्त होणं हा असेल.. हं असेल कदाचित.. चला तर मग आपण सारेच व्यक्त होउयात... कधीतरी मुद्दाम बंद केलेली मनाची कवाडं पुन्हा जराशी किलकिली करुन डोकाउ स्वतःच्याच मनात.. नाही दुसर्या कोणाशी पण निदान स्वतःच स्वतःशी तरी बोलुयात.. देउयात एक प्रामाणिक कबुली आजवर घडुन गेलेल्या चुकांची..येउ घातलेल्या आव्हानांची.. आणि कदाचित रात्री अपरात्री अचानक दाटुन आलेल्या भितीचीही.. माध्यम भलेही कुठलेही असो.. पण स्वतःशीच स्वतःचा संवाद सुरु असावा.. हो नं?
जीव लावावा तो तुझ्यासारख्या माणसावरच.... माणसातलं हे हरवत चाललेलं माणुसपण जेव्हा तुझ्या एका नजरेत दिसतं नं तेव्हा वाटतो एक विश्वास..ह्या प्रेतांच्या वस्त्य़ांमध्ये जिवंतपणा शिल्लक असण्याचा.. असंकसं रे सुचतं तुला नेमक्या वेळी नेमकं बोलत नेमकेपणाने नेमक्या व्यक्तीच्या मनात शिरणं..खरं सांगायचं तर तुला एकदा भेटल्यावर तुला विसरणं तसं अशक्यच.. तसंही तुला ओळखायला लागल्यापासुन तुझ्या तनामनात वसलेला तुझा सच्चेपणाच तर तुझी ओळख बनला होता..अन् माझी ओळख?हं..खरयं तुझं..काही नात्यांच्या ओळखीही त्यांच्या नावांप्रमाणे पुसट होत जातात आणि मागे उरतात काही सुगंधी आठवणींचे हळवे ओले ओरखडे.जाउ दे पुन्हा नकोच ते..पण हो जीव लावा तो तुझ्यासारख्या माणसावरच...कारण... कारण हे असलं जीवघेणं नातं तुच पेलु शकतो..तेही अगदी सहजच.. चेहर्यावरची रेषही न बदलता मनातली सारी अखंड वादळं लपवणं तुलाच शक्य...

प्रवासापुर्वीचा प्रवास..

गेल्या आठवड्यात मुंबईला निघाले होते.. बसची वाट बघत बरिचशी गर्दी त्या शिवनेरीच्या थांब्यावर.. बसला तसा उशीर होता म्हणुन माझं सहज आजुबाजुच्या लोकांचं निरिक्षण सुरु होतं..एक पहिल्यांदाच मुंबईला निघालेल्या काकु..थोड्या बावरलेल्या, थोड्या नर्व्हस.. आणि खुप उत्सुक..बाजुलाच बसलेल्या एका अमेरिकन मुलीशी देव जाणे काय काय बोलत होत्या..आणि तीही पठ्ठी कितीसं कळत होतं तिला कोण जाणे?... पण ऐकत होती.. भावनेला भाषा नसते हेच खरं..
दुसरं एक टिपिकल पुणेरी कुटुंब.. नुकतच लग्न झालेली मुलगी... बहुदा पहिल्यांदाच माहेरी आली होती..पुरेपुर माहेरपण उपभोगुन बहुदा मुंबईला पुन्हा सासरी निघाली होती.. तिला यायला जरा उशीरच झाल होता त्यामुळे जरा चिडचिड सुरु होती.. पण नशिबाने तिचीही बस लेट ह.. मग जरा ती निवांत झाली आणि मघाची स्वतःची वागणुक आठवुन स्वतःच खजील झाली..गोंधळली होती..हळुच जाउन आईच्या मिठीत शिरली.. भर गर्दीत त्यांचा हा निरोपसमारंभ मस्तच रंगला ... एकीकडे माहेर सोडण्याची हुरहुर आणि दुसरीकडे सासरची ओढ.. मोठं मजेशीर होतं ते सारं.. माझ्याही नकळत माझ्या बाजुला उभ्या दोन मुलींचं बोलणं माझ्या कानावर आलं.. दोघीपण मुंबईच्या अन् खुप मोडर्न.. ह्या कुठल्या लो-क्लास गर्दीत उभे आहोत आपण असा काहीसा भाव.. जरा मुद्दामच इंग्लिशमध्ये बोलत होत्या नकट्या... त्यांचं ते यु नो वालं इंग्लिश ऐकुन आम्हा सो कोल्ड यंग लोकांची मस्त करमणुक होत होती.. त्यांना हे बहुतेक लक्षात आलचं नाही... तेव्ढ्यात एक बस आली आणि एकच झुंबड उडाली.. जरा गर्दी कमी झाल्यावर माझं लक्ष एका प्रौढ जोडप्या कडे गेलं.. काकु बहुतेक मुंबईला मुलाकडे निघाल्या होत्या आणि काका मात्र पुण्यातच... काकु बसमध्ये बसलेल्या अन् काका खिडकीसमोर... काचा बंद असल्यामुळे त्यांचा मुक संवाद सुरु होता.. काळजी घ्या.. पोहचल्यावर फोन कर... तुम्ही गाडी हळु चालवा.. नीट जेवा.. आणि अजुन बरचं काही.. किंवा त्याहीपलिकडे न बोललेलं बरचसं.. किमान 25 वर्ष तरी झाली असतील नं त्यांच्या लग्नाला.. अजुनही तेच प्रेम तोच ओलावा... तिथल्या गर्दीतली आम्ही तमाम तरुण जनता आ वासुन पाहात होतो हे सगळं.. पण ती डोघं मात्र वेगळ्याच दुनियेत.. डोघांच्याही डोळ्याच्या कडा विरहाच्या कल्पनेने ओलावलेल्या.... खुप काही शिकवुन गेला हा प्रवासापुर्वीचा प्रवास..

Friday, May 4, 2012

अनोळखी वळणांशी झुंजणं हा खरतर स्वभाव नव्हता एकेकाळी.. अवघड वाटा.. नाविन्याची ओढ.. अन् ह्याच नवनव्या वाटांवर स्वतः बनवलेल्या ओळखीच्या काही खुणा.. सारं कसं माझं.. मी घडवलेलं... निर्मीतीचा आनंद काही निराळाच.. आताशा ह्या निर्मितीची एक नशा आहे डोळ्यात... काहीतरी नवीन, निराळं, अपरिचित गोष्टी खुणावताहेत... माझंच क्षितीज माझ्याही नकळत विस्तारतय.... आणि खुले होत आहेत अनेक नवे मार्ग.. माझेच मीपण पारखण्याचे..अन् कधी कधी स्वतःच्या अस्तित्वाबद्दल आश्चर्याचे सुखद धक्के सुद्धा देणारे.. हे असं स्वतःलाच तिर्हाईताच्या नजरेतंन जाणुन घेणंही मोठं मजेशीर होत चाललयं...

मावळतीचे रंग



क्षणा क्षणाला बदलत जाणारे हे मावळतीचे रंग... अनोख्या छटा, निराळ्या अदा... ढगांचे आकारही किती मोहक... लहान असताना ह्या ढगात आम्ही हवे ते आकार, प्राणी, वस्तू.. अगदी काहीही शोधायचो... आई म्हणायची हे सगळे नं तो बाप्पा बनवतो... त्याच्या लाडक्या लेकरनांच दिसायचे म्हणे ते आकार.... किती अप्रूप असायचं त्या छोट्या छोट्या गोष्टींचं... आताशा मात्र संध्याकाळ होते तीच दिव्यांच्या झगमगाटात... रंगाच्या त्या मोहक अदा बाप्पाने लपवून ठेवल्यात बहुदा... मावळतीचं ते मुक्त आभाळही जप रे बाबा ... नाहीतर ते हि हरवेल ह्या गर्दीत.. अगदी हरवलेल्या त्या निरागस बालापाणासारखं....

.निकाल दिन

१ मे... महाराष्ट्र दिन... कामगार दिन.. माझ्यासाठी मात्र अजून एक खास आठवण..निकाल दिन... शाळेत असताना परीक्षा संपली कि आम्ही उंडारायला मोकळे... भर उन्हात खेळायचं, आंब्याचा रस, मलई कुल्फी , सापशिडी, अस काय काय आठवत उन्हाळ्याची सुट्टी म्हटल कि... ह्या सगळ्यात भीती फक्त निकालाची...रोज १० वाजेपर्यंत लोळत पडलेलो आम्ही निकालाच्या दिवशी मात्र पहाटेपासूनच जागे... मनातल्या मनात देवाचा धावा..रात्री स्वप्नातदिसलेले आपलेच सोडवलेले पेपर.. गेल्या पूर्ण सुट्टीत साध्या विशायांचे नावही विसरले असताना , स्वप्नात हे दिसतच कस हे आजही न उमगलेलं... रोज आईचा ओरडा खाईपर्यंत जागचे न हलणारे आम्ही आजच्या दिवशी मात्र गपगुमान शाळेत जायची तयारी करायचो.. आणि मग आईच्या डोळ्यातली काळजी आणि बाबांच्या नजरेतली जरब चुकवत आमची स्वारी शक्य तितक्या लवकर शाळेत हजर... आज एकाच दिवशी शाळेतल चित्र पालटलेल असायचं... तमाम मुल शांत, बडबड न करता गप्प .... अन तमाम शिक्षक.. मस्तीच्या मूडमध्ये... अब आया उंट पहाड के निचे....असा काहीसा मिश्कील भाव...प्रार्थना, रांगा, मोठ्या बाईंच भाषण ( उपदेश)..ह्या सगळ्या सोपस्कारानंतर निकाल.... पास नापास.. एका मार्काची चढाओढ ..काही आनंदी तर काही पडलेले चेहरे... पण एकूणच सुटकेचा निश्वास.. आणि मनात चाहूल पुढच्या वर्गाची...
इतकी वर्ष लोटली... पण अजूनही निकाल पाठ सोडत नाही....प्रश्न निराळे... उत्तर वेगळी... शाळा कधीच सुटली ... हुरहुरत्या मनात निकालाची वाट मात्र अजूनही...

Saturday, March 24, 2012

जागतिक महिला दिन

राहुन राहुन आज एक विचार मनात येतोय.. जागतिक महिला दिन.. वर्षभर ज्या स्त्रीला अबला,दुय्यम म्हणुन वागवायचं आज एक दिवस तिचं गुणगान.. आणि हा एक दिवस तरी कोणासाठी हो..फक्त् तुमच्या आमच्या सारख्या उच्च मध्यम वर्गातल्या महिलांचा.. कारण हातावर पोट असणार्या मजुर बायकांना असले थेरं परवडणारे नाहीत आणि गडगंज श्रीमंत बायकांना असल्या दिवसांचं सोयरसुतक नाही... आणि आपण तरी काय असं करतो खास? बाप,भाउ,नवरा, मित्र ह्यांच्या आजचा दिवस मिळणार्या कौतुकाच्या नजरा झेलायच्या.. जरा आजचा दिवस तुमचा म्हणत सेल च्या नावाखाली शोपिंग करायची... आणि..आणि अजुन काय? काहीच नाही.. तुम्ही म्हणाल एक मुलगी असुन असं का बोलतेय? आणि तु असं काय गं वेगळं करते? तर खरच सांगते मीपण तुमच्यातलीच एक.. पण आज सकाळी ताईच्या एक मेसेजने विचार करायला भाग पाडलं...खरच जरा विसावुयात आपण सगळ्याजणी ह्या वळणावर... वर्षभर नुसती धावपळ असतेच नं मागे मग आज थोडावेळ माझा. माझ्या हक्काचा..काय करायचं आजच्या दिवसात? अगदी जे मनात येईल ते.. एखादी राहुन गेलेली गोष्ट... अर्धवट राहिलेली आवड..गप्पा-टप्पा स्वतःच्याच स्वतःशी..करुयात आजपासुन एक नवी सुरुवात...जसं जमेल तसं पण नियमितपणे आपला आपल्यासाठीचा वेळ काढण्याची सुरुवात... तसा एक क्षणही पुरेसा असतो नं गं सखे आपल्याला आपला हक्काचा? जरा सारुयात आपला आपणच हा कोश..आणि डोकाउ जरा ह्या जगात.. कोण जाणे आपल्यातच लपल्या असतील कित्येक लता, कल्पना, आणि अश्या कित्येक... कोणाला दाखवुन देण्यासाठी नाही गं काही.. हे सगळं फक्त माझं माझ्यासाठी... मग कराल नं एवढं? द्याल नं दुसर्यांना झोकलेल्या आयुश्यातला फक्त एक क्षण स्वतःच्या विसाव्यासाठी? 

आभाळ

माझ्या गावातलं हे स्वच्छ मोकळं आभाळ..असंख्य तार्यांनी गच्च भरलेलं ..टिमटिमणारे..लुकलुकणारे... काही आपल्याच मस्तीत आपल्याच तेजाने चमकणारे.. अन् काही ह्या मस्तवाल तार्यांच्या खाली मिणमिणणारे... पण मला मात्र हे सगळे सारखेच वाटतात.. हे सगळे तारे नं बोलत असतात आपल्याशी..त्यांचं हे लुकलुकणं काहितरी सांगत असतं आपल्याला..काहीतरी खास..मनातलं..जरा कान देउन ऐकलं नं की कळतात त्यांच्या कथा..त्यांच्या व्यथा...ह्या एकाकी रात्री ज्यांना खायला उठतात त्यांनी बोलावं ह्या चांदण्यांशी..ह्या खुळ्या ऐकत्तात सगळ्यांची गार्हाणी ..आणि देतात साथ ह्या रात्रीला..बघा जमलं तर..एका रात्री तरी ह्या वेड्या चांदण्यांशी बोलुन बघा..खुप् खुप् मोकळं वाटतं..त्या खुल्या आभाळासारखं.. 

Friday, March 2, 2012

असचं काहीसं..

आयुष्याकडे बघण्याचा अन्गल जरा बदलला की आपणच आपल्यासाठी आखलेल्या जगण्याच्या चौकटीसुध्दा खरच बदलतात का? कदाचित फ़क्त हे कोन बदलतात.. चौकट काही सुटत नाही.. बंधनं झुगारण्याच्या नादात उलट कधीतरी  मुक्त होण्यापेक्षा घुसमटच वाढते.कोणी म्हणतं जगणं हे चौकट नसुन वर्तुळ आहे पण त्या वर्तुळालाही अर्थ तेव्हाच जेव्हा त्याचा केंद्रबिंदु स्थिर असतो.. इथे तर नेमकं तेच हरवलयं..परिघ तरी कसा  शोधायचं मग? कधीतरी वाटतं की ह्या सगळ्याचाही काही अंत असेलच.. एकदा भरारी घेतली की क्षितीजपर्यंतचं अवघं मोकळ आकाश माझच.. पण क्षितीज काय किंवा आकाश काय..दोन्ही आभासीच नं.. खोट्या गोष्टींचा खर्या जगण्याला दिलासा कसा मिळेल? आपल्याही नकळत लहानपणापासुन आपण बांधत असतो स्वतःचं मीपण एका चौकटीत... आणि मोठं होता होता विसरत जातो त्या चौकटीचे नियम.. मग अशा एखाद्या वळणावर ही चौकट टोचायला लागते.. मनाला दिसतं ते शुन्याचं रिंगणं.. पण म्हणुन चौकट मोडायचीच का?इतकं साधंसोपं असतं का गं सगळं? चौकट काय किंवा वर्तुळ काय... सीमारेषा आल्याच नं.. त्याच झुगारायचा प्रयत्न असतो..आणि शेवटी जर एक चौकट तोडताना दुसर्या चौकटीत अडकणार असु तर पहिली काय वाईट? आता फक्त त्या आभाळाचीही चौकट व्ह्ययला नको म्हणजे मिळवलं..किती प्रश्न  ह्या सार्या अनुत्तरीत प्रश्नांची कधीतरी सुंदर वीण होईल.. कदाचित कधीतरी आपलंच आपल्याला हसु येईल.. पण आत्ताचं काय? पण आत्ताचं काय?नुसतं लढत राहायचं? तसं लढण्याला ना नाहीच माझी.. पण श्वासाचीही उसंत नको का ? कारण इथे जो तो शर्यतीत जगण्याच्या... जरा थांबुन जगण्याचा आनंद घ्यायचाही हक्क नाहि का? मला तर वाटतय.. कदाचित ह्या शर्यती जिंकण्याच्या नादात ध्येयही आपल्याला कळणार नाही... कदाचित ते कधिच गाठलं असेलही..एकदा क्षणभर थांबुन मागे वळुन बघायला हवं..भुतकाळात डोकावलं की मला कधी कधी हेवा वाटतो.. त्या प्रत्येक बर्या-वाईट क्षणांचा... कारण त्या हरेक क्षणाची भली-बुरी का होईना पण एक आठवण असते.. आणि असं भुतकाळात रमताना अचानक जाणवतं.. अरेच्चा हा आजचा क्षणही उद्याचा भुतकाळच की.. ह्या नुकत्याच जन्मलेल्या क्षणाचीही एक ताजी आठवण आपल्याही नकळत आपण बनवतोच नं... त्या नुसत्या विचारानेही नवा जोम येतो.. आणि मनं उत्साहानं नव्या आठवणी जमवायला सुरु करतं.. उद्याच्या भुतकाळासाठी वर्तमानाच्या आठवणी बनवणंच तर उरतं नं आपल्या हाती?

Saturday, February 25, 2012

हळवेपण

आताशा हे हळवेपण वरचेवरच छळायला लागलय...काही काळ-वेळ न बघाता मन उगाच अस्वस्थ..नकोनकोशी ती हुरहुर...आणि मग निर्णयाची ओढ..की शोध रे शेवटाचा? हे असं काही झालं नं की माझ्याही नकळत ओलावतात डोळ्यांच्या कडा..आणि फुरफुरणारं नाकं.. अगदीच रडायला वैगरे नाही रे येत तसं.. पण दिवसभर हा पाठलाग चुकवला तरी रात्री उशी भिजतेच...जराशीच हं...कारणांचा शोध अजुनही चालुच आहे..हो आणि आरोप-प्रत्यारोपांचा खेळही..पण कसं कोण जाणे  ही वेडी संध्याकाळ उतरायला लागली नं की मलाच कळत जातं हा शोध...हा खेळ.. काही खरा नाही..खरंच काही असेल तर ते असतं फक्त एकटेपण..भरल्या घरातलं..गर्दीतलं..माझ्यातल्या मलाच खाणारं हे एकटेपण..हे एकटेपणही मोठं विचित्र रे..एकटं मुळी येताच येत नाही ह्याला...सोबतीला असतात असंख्य आठवणी, तुझ्या-माझ्या क्षणांच्या,विसरलेल्या त्या अलवार स्पर्शांच्या,अन् कधी कधी तर न बोललेल्या त्या मुक्या अबोल्याच्याही...आतापर्यंत सावरलेला हा खोटा खोटा मनाचा डोलारा कोसळतोच रे मग..अन् मग अवचित कधीतरी बांध फुटतो मनाचा..चढ्त्या रात्री मग उशाला असतो एकाकी चंद्र..चांदण्या रात्रीतही एकटा..अगदी आपल्यासारखा..की फक्त माझ्यासारखा... तुझा शोध तर अजुनही चालुच नं रे... जाउ दे कशाला पुन्हा तेच वाद..तेच प्रश्न...उत्तरं नसलेली..तसेही  आताशा तुझे प्रश्नच बदलले सगळे.. तरी एक शेवट्चं... आजकाल हा हळवेपणा तुलाही छळतो का रे?

Thursday, February 16, 2012

मनाचा खेळ

कधी कधी आपण स्वतःबद्दलच अनेक भ्रामक कल्पना करुन घेतो. मी सुंदर्, मी गुणी ते अगदी मी स्वर्थी, मी वाईटही.. अश्या टोकाच्या विचारांनी खरतर आपण आपल्यालाच गोंजारत असतो. आणि त्यला नेत असतो एका वेगळ्या जगात तेपण अगदी दुसर्या टोकाच्या जगात...खरतर काय् मिळतं ह्या सगळ्यातुन? मुळात मनाला असं फसवायचं का? कदाचित सतत समोर येणार्या प्रश्नांमधुन तेव्ढीच उसंत..पण ही खरच विश्रांती असते का? की असतो एक थांबा विरंगुळ्याचा पुढच्या अनेक संकटांना तोंड द्यायला ताकद आजमावायचा थांबा... म्हणजे आतापर्यंतचे सगळे प्रश्न संपले असं नाही नं होत.. मग त्या अनुत्तरीत प्रश्नांचं काय?मनाला असं भुलवुन प्रश्न थोडीच संपतात न त्यांची उकल होते... हे सगळं राहतच मनाच्या तळाशी नेहमी साचलेल्या चिवट शेवाळा सारखं.. आजही मागे वळुन पाहिलं तर दिसतो विविधरंगांनी नटलेला भुतकाळ.... काळा रंग अगदीच नावाला बाकी सगळ कसं रंगबेरंगी..स्वतःच्याच मस्तीत रमलेला भुतकाळ..आणि समोर बघितलं की दिसतो मिट्ट् काळोखाचा भविष्यकाळ..वर्तमानात इतकं झटुनही भविष्य इतकं अंधारं कसं..पुन्हा प्रश्नच... सगळा गुंता होत जातो..ह्या समाजाचा, ह्या माणसांच्या गर्दिचा, ह्या प्रश्नांचा अन त्यांच्या न् सापडलेल्या उत्तरांचाही.. मग ह्या अशा आड्वळणावर थकतच मन् ..तसे त्याला मिळतात अनेक संकेत..भविष्याचे..भुतकाळाशी जोडलेल्या वर्तमानाचे आणि मग सुरु होतो पुन्हा खेळ ह्या संकेताचा पाठलागचा अन त्यातच ह्या वेड्या मनाला गोंजारण्याचा....
कधी कधी आपण स्वतःबद्दलच अनेक भ्रामक कल्पना करुन घेतो. मी सुंदर्, मी गुणी ते अगदी मी स्वर्थी, मी वाईटही.. अश्या टोकाच्या विचारांनी खरतर आपण आपल्यालाच गोंजारत असतो. आणि त्यला नेत असतो एका वेगळ्या जगात तेपण अगदी दुसर्या टोकाच्या जगात...खरतर काय् मिळतं ह्या सगळ्यातुन? मुळात मनाला असं फसवायचं का? कदाचित सतत समोर येणार्या प्रश्नांमधुन तेव्ढीच उसंत..पण ही खरच विश्रांती असते का? की असतो एक थांबा विरंगुळ्याचा पुढच्या अनेक संकटांना तोंड द्यायला ताकद आजमावायचा थांबा... म्हणजे आतापर्यंतचे सगळे प्रश्न संपले असं नाही नं होत.. मग त्या अनुत्तरीत प्रश्नांचं काय?मनाला असं भुलवुन प्रश्न थोडीच संपतात न त्यांची उकल होते... हे सगळं राहतच मनाच्या तळाशी नेहमी साचलेल्या चिवट शेवाळा सारखं.. आजही मागे वळुन पाहिलं तर दिसतो विविधरंगांनी नटलेला भुतकाळ.... काळा रंग अगदीच नावाला बाकी सगळ कसं रंगबेरंगी..स्वतःच्याच मस्तीत रमलेला भुतकाळ..आणि समोर बघितलं की दिसतो मिट्ट् काळोखाचा भविष्यकाळ..वर्तमानात इतकं झटुनही भविष्य इतकं अंधारं कसं..पुन्हा प्रश्नच... सगळा गुंता होत जातो..ह्या समाजाचा, ह्या माणसांच्या गर्दिचा, ह्या प्रश्नांचा अन त्यांच्या न् सापडलेल्या उत्तरांचाही.. मग ह्या अशा आड्वळणावर थकतच मन् ..तसे त्याला मिळतात अनेक संकेत..भविष्याचे..भुतकाळाशी जोडलेल्या वर्तमानाचे आणि मग सुरु होतो पुन्हा खेळ ह्या संकेताचा पाठलागचा अन त्यातच ह्या वेड्या मनाला गोंजारण्याचा....

Thursday, January 19, 2012

जीव द्यावास वाटतोय्...


जीव द्यावास वाटतोय्...
काय येतं मनात हे वाचुन? की हे कोण्या असध्य रोग झालेल्या व्यक्तीचं मनोगत असावं..हो नं.. पण नाही हे आहे आजच्या माझ्या पिढीचं वाक्य.बरेच दिवस हा विशय डोक्यात घोळत होता.आजकालची ही माझी तरुण पिढी इतकी एकाकी का?असं नक्की काय वेगळं शिजत असतं मनात की आम्ही ते सहन नाही करु शकत आणि शेवटाचा विचार करतो?असं काय नेमकं कारण असतं कि आमचे टेंशन आम्ही कोणाशीच वाटुन नाही घेउ शकत? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे असं काय असतं जे आम्हाला सरळ मरण हा एकच रस्ता ठेवतं...
      तसं पाहायला गेलं तर हे सगळं थोड्याफ़ार फरकाने आपल्या आई-बाबांच्या काळात पण होतं(आता तुम्ही म्हणाल तो काळ वेगळा होता). घर् आणि ओफिस ते पण सांभाळायचे(अगदी आपल्या सगळ्या अनावश्यक "गरजा" पुरवत)मग आज काय असं बदलयं?
     थोडा विचार केला तर लक्षात येतो तो एक महत्वाचा फरक...'तुटलेली घरं'.. आज थोडं आजुबाजुला बघितलं की दिसतात ती परगावात एकटीच राहणारी मुलं.. एकाकी..अस्वथ..अचानक आलेल्या ह्या जबाबदार्या न पेलता येणारी.... आणि खरं सांगायचं तर रोज एका नव्या दिव्यातुन जाणारी..पण म्हणुन जीव संपवणं हा एकच उपाय?
     जरा आपल्या पालकांच्या बाजुने विचार केलाय कधी ह्या गोश्टिचा? त्यांचं हे बाळ जे कालपर्यंत कोलेजच्या मौजमस्तीमध्ये गुंग होतं..हसत खेळत होतं.. ते आज अचानक असं गप्प..घुमं..सतत ताणाखाली.. काय होत असेल त्यांच्या काळजाचं? कालपर्यंत कान किटेस्तोवर मोठ्ठ्याने गाणी ऐकणारा आपला मुलगा  आज साध्या सुरांनेही हळवा होताना बघितलं की त्यांना धक्का बसणारच..  त्यांचं फक्त एकच मागणं असतं की बाबारे आमच्याशी नको पण कोणाशीतरी बोल..मोकाळा हो...बाप जरा तरी समजु शकतो ही परिस्थीती(बोसची अरेरावी,कामाचं ओझं,ओफिस मधलं पोलिटिक्स..सगळं त्याने पण अनुभवलं असतं) पण आई..ती बिचारी मात्र काळजीने अर्धमेली होते आणि त्यातच रोज पेपरात नवीन बातमी.."आय.टी. कंपनीत गलेलठ्ठ पगारावार काम करणार्या तरुणाची आत्महत्या"...एक क्षण विचार करा काय वाटत असेल त्या माउलीला...असा तरुण पोरगा गमावलेल्या बापाच्या नजरेत कधी बघितलंय..तिथे सापडतो फक्त भकासपणा.. आणि भल्या मोठ्या प्रश्नांचं भेंडोळं.. ज्याची उत्तरं तो उरलेलं सार् आयुष्य शोधत बसतो...प्रत्येक क्षण त्याला एकच प्रश्न सतावतो..माझं कुठे चुकलं माझ्या बाळाला समजुन घेण्यात..अर्ध आयुष्य मुलांना वाढवण्यात घालवायचं आणि उरलेलं त्यांच्या मरणाची कारणं शोधत..हा कुठला न्याय?
   आता तुम्ही म्हणाल आम्हाला पटतय हे सगळं..पण आम्हाला रोज काय काय भोगावं लागतं हे बाबांना काय सांगणार?सतत समोर राहण्याची धडपड,बोसने सगळ्यांसमोर केलेला पाणऊतारा,कितीही मन लावुन काम केलं तरी हात रिकामाच.. कोणाला अन् काय काय सांगायचं असचं नं..
     
खरतर आई-बाबा तुम्हाला हे सगळं सांगावं असं खुपदा वाटतं.पण तुम्ही काळजी करता हो..आणि तसं बघितलं तर असं मुद्दाम सांगण्यासारखं पण नसतच काही...असते ती फक्त अनिश्चितता..आणि त्यातुन येणारं हे फ़्रस्ट्रेशन...आता हे सगळं मित्रांशी बोलवं तर आम्ही चार मित्र जगाच्या चार टोकांना..इथे आमच्या साध्या रात्र-दिवसाचा मेळ जुळत नाही तर बोलणार कधी आणि कसे? आता ह्यावर आम्ही एक उपाय शोधलाय तसा...मायाजाल..इंटरनेट..च्याटींग... तुम्हाला वाटतं हा समोरासमोर आमच्याशी दोन शब्द बोलत नाही आणि तिथे तासनतास बोलत काय बसतो.. आणि ह्या गोश्टीचं तुम्हाला कुतुहल कमि आणी रागच जास्त असतो.ः) पण खरं सांगु हे जग आवडतं आम्हाला.(कसलं मेलं हे व्हर्च्युअल जग आवडतं,खरं खरं काहीच नको ह्यांना-इति आई).कारण इथे नसतो अस्तित्वाचा पडदा..नसते भिती गुपितं कोणाला कळायची... फक्त व्यक्त होणं हिच तर गरज असते नं आम्ची? इथे पण मिळतातच कि आम्हाला नविन नाती..अगदी काका,मामापासुन ते ताई, मित्र, यार पर्यंत...आम्हाला कळते हो तुमची काळजी..
  पण आमचं जगच इतकं अस्थिर झालयं नं..सतत हलत राहतं सगळं आतपर्यंत...मनाच्या तळापर्यत..जरा कुठे श्वास घ्यायला थांबवं म्हटलं की संपतच सगळं..अन् हरवतो असचं ह्या गर्दीत..आणि मग शोधत बसतो स्वतःला ह्या प्रचंड पसार्यात..आमच्यातलेच काही हा शोध पण घेत नाहीत सरळ संपवतात हे सगळं..हा गोंधळ..काही सापडतात कोण्या बाबाच्या आश्रमात..शांतता शोधत.. अन् काही...अचनक स्वतःच शांत होत जातात..बसतात आभाळाकडे नजर लावुन..


       

नवं वर्ष...

2012..नवं वर्ष..नवी ध्येय .नविन आशा अन् नवी स्वप्न...आणि ह्या सगळ्य़ांना पुर्ण् करण्याची जिद्दही नवी नवी..सारं कसं नवंकोरं..ताजतवानं... ह्या अश्या नव्यावर्षाच्या तुम्हा सगळ्यांना खुप खुप शुभेछा... ह्या नवीन वर्षात प्रत्येकाचे काही संकल्प..काही उघड उघड जाहिर..तर काही फ़क्त आपल्या मनाशी बांधलेले खुणगाठीसारखे... हे संकल्प तसा ज्याचात्याचा प्रश्न..पण आज गेल्या वर्षाकडे वळुन बघताना एक संकल्प आपण सगळ्यांनी करावा असं वाटतं..संकल्प एक माणूस म्हणुन जगण्याचा..ह्या प्रचंड गर्दित हरवलेलं ते वेडं माणूसपण शोधण्याचा..अन् जपण्याचा.. कराल ना हा संकल्प?..